कर्णेश्वर मंदिर
कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये ह्या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.[१]
हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे.हे तारकापीठावर स्थित आहे.मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुख आहे.पश्चिम आणि उत्तर दिशांनासुद्धा मंदिराला प्रवेशद्वारे आहेत.मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत.भूमीज शैलीप्रमाणे मंडप,महामंडळ,अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची परिपूर्ण रचना आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूवर विष्णूचे दशावतार,कमल वेलींच्या मालिका,महिषासुरमर्दिनी, नृसिंह,गणपती,सरस्वती,कीर्तिमुख,सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत.मंदिराचा कळस दगड-माती-विटापासून बनविलेला असून त्यावर गूळ-चुन्याचा गिलावा आहे.मंदिराच्या आतमध्ये ब्रम्हदेव,शेषधारी विष्णू आणि वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंडी असून पार्वतीची मूर्ती आहे.मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिर आहे.सात घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती विराजमान आहे.[२]
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य.