ऋतुस्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऋतुस्तर मातीचा किंवा बारीक गाळाचा सापेक्षतः अधिक भरड कणी व अधिक जाडीचा थर आणि सापेक्षतः बारीक कणी व कमी जाडीचा थर नियमितपणे एकाआड एक रचिले जाऊन तयार झालेला स्तरित खडक.

या खडकातील शेजारी शेजारी असणाऱ्या भरड व बारीक कणी थरांची प्रत्येक जोडी मिळून एक एक ऋतुस्तर होतो. प्रत्येक जोडीपैकी एक थर एका ऋतूत व दूसरा दुसऱ्या ऋतूत तयार झालेला असतो, म्हणजे प्रत्येक ऋतुस्तर एका वर्षात तयार झालेला असतो. जेथे उष्म ऋतूत जमिनीवरील बर्फाच्या थरांचे बर्फ वितळून नाहीसे होते त्या भागाच्या लगत असणाऱ्या सरोवरात ऋतुस्तरित खडक सामान्यतः तयार होतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून तयार झालेले पाणी व बर्फाने बाहून आणलेला बारीक गाळ लगतच्या सरोवरात शिरत असतो.

गाळातील भरड कण पाण्याच्या तळाशी लौकर जातात. सूक्ष्म कण मात्र दीर्घ काळ पाण्यात निलंबित (तरंगत्या) स्थितीत राहतात. मागोमाग येणाऱ्या थंड ऋतूत बर्फ वितळणे जवळजवळ थांबते, सरोवराचा पृष्ठभागही गोठतो व सरोवरात गाळाची भर पडणे थांबते. पण सरोवराच्या पाण्यातील निलंबित गाळ मात्र हळूहळू तळावर साचून सूक्ष्म कणी गाळाचा अत्यंत पातळ थर तयार होतो. अशा रीतीने साचलेल्या ऋतुस्तरांच्या एकूण राशीचा छेद घेऊन त्या छेदातील ऋतुस्तरांची संख्या मोजली, तर ती राशी साचण्याला एकूण किती वर्षे लागली हे अचूक सांगता येते.