आनन्दवर्धनाचार्य
आचार्य आनन्दवर्धन हे संस्कृत साहित्यशास्त्रात ध्वनिसिद्धान्ताचे प्रवर्तक आचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत. राजशेखराच्या राजतरङ्गिणि नुसार ते काश्मिरतील राजा अवन्तिवर्म्याच्या दरबारातील राजकवी होते. या उल्लेखामुळे आनन्दवर्धनाचा काळ ९व्या शतकाचा उत्तरार्ध ठरवता येतो.
मुक्ताकणः शिवस्वामी कविरानन्दवर्धनः।
प्रथां रत्नाकरश्चागात् साम्राज्येsवन्तिवर्मणः।।[१]
आचार्यांचे पाच ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
१.विषमबाणलीला २. अर्जुनचरित३. देवीशतक ४. तत्त्वालोक ५. ध्वन्यालोक
वरीलपैकी ‘ध्वन्यालोक’ सुप्रसिद्ध व महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथात काव्याचा आत्मा हा ‘ध्वनि’ म्हणजेच व्यंग्यार्थ हा होय, असे स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे.
काव्यस्यात्मा ध्वनिरिति बुधैर्यः समाम्नातपूर्वम्
-स्तस्याभावं जगदुरपरे भाक्तमाहुस्तमन्ये ।
केचिद्वाचां स्थितमविषये तत्त्वमूचूस्तदीयं
तेन ब्रूमः सह्रुदयमनःप्रीतये तत्स्वरूपम्।।[२]
या ग्रंथात एकूण ४ उद्योत आहेत. कारिका, वृत्ति, उदाहरण अशा शैलीत विवेचन केलेले आहे.
प्रथम उद्योतात ध्वनिसिद्धांताची स्थापना, द्वितीय उद्योतात ध्वनि भेदांचे सविस्तर वर्णन, तृतीय उद्योतात ध्वनिचे महत्त्व तर चतुर्थ उद्योतात कविच्या प्रतिभेचे विवेचन केलेले आहे.
या ग्रंथावर दोन टिकांची माहिती मिळते. ‘चंद्रिका’ आणि ‘लोचन’ यापैकी सध्या अभिनवगुप्तांची लोचन टिका उपलब्ध आहे. ही टिका नावाप्रमाणेच समर्पक आहे.
पूर्वापार भरतमुनींपासून चालत आलेल्या अलंकार संप्रदायाच्या प्रभावातील संस्कृत साहित्याला आचार्य आनन्दवर्धनांनी नवा आयाम दिला.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |