Jump to content

ॲमेझॉन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अॅमेझोन नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲमेझॉन
दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर ॲमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. ॲमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.
उगम ॲण्डिज पर्वतराशीत नेवाडो मिसमिल
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश ब्राझील, पेरू, कोलंबिया
लांबी ६,४०० किमी (४,००० मैल)
उगम स्थान उंची ४,२६७ मी (१३,९९९ फूट)
सरासरी प्रवाह २,०९,००० घन मी/से (७४,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ७०५००००
उपनद्या मॉरेनोन, जॅपुरा, कॅकेटा, रिओ निग्रो, ग्वाइनिआ, पुटुमायो, उकायाली, पुरुस, मदीरा, झिंगु, टोकॅंटीस

अ‍ॅमेझॉन नदी (पोर्तुगीज: Rio Amazonas; स्पॅनिश: Río Amazonas) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसऱ्या क्रमांकाची लांब) नदी आहे. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ॲण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

‍ऍमेझॉन नदीचे मुख

ॲमेझॉन नदीची एकूण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले ॲमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे. ॲमेझाॅन ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी  व अलिकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक, सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर आहे. यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ॲमेझाॅनला "समुद्रनदी" म्हणतात. पेरु, कोलंबिया व मुख्यत्वे ब्राझील देशातून वाहणाऱ्या या नदीचे पाणलोट क्षेत्र व उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अद्भुत क्षेत्र आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ पाच पट आहे. पाण्यात सूर मारून बुडी घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे ऑस्प्रेसारखे पक्षी आपणास माहीत आहेत, पण ॲमेझाॅनच्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या जंगलात पाण्यातून वर हवेत आठ दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मत्स्यजाती आहेत. पिरान्हा मासा, ४० फूटापेक्षा जास्त लांब ॲनाकोंडा सर्प यांसह कोट्यावधी वैशिष्ट्यपूर्ण जीवजातींची धारणा करणाऱ्या या ॲमेझाॅनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता व प्रति घन मीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता आहे.

दक्षिण अमेरिका खंडातील या नदीचा वेगवान व बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत, वळणे घेत पूर्वेकडे वाहतो व नदीमुखातून जवळजवळ २०० किलोमीटर पर्यंत अटलांटिक महासागरात आत शिरतो व तेथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्त्व दाखवतो.

ॲमेझाॅन नदीचे उपग्रहाद्वारे घेतलेले चित्र