ॲना शूल्ट्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अॅना शूल्ट्झ या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. ॲना शूल्ट्झ या जन्माने अमेरिकन असून मराठी-इंग्रजीत कीर्तन करणाऱ्या स्त्री-कीर्तनकार आहेत.

चापूनचोपून नेसलेली नऊवारी, कपाळाला लावलेला बुक्का आणि गळ्यामध्ये असलेल्या टाळांचा नाद करणाऱ्या ॲना शूल्ट्झ या मराठी आणि संस्कृतमध्ये पदे गात कीर्तन रंगवतात. गायलेल्या पदांचे विवेचन करणारे आख्यान मात्र त्या इंग्रजीमध्ये करतात.

महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तनाच्या परंपरेमध्ये हा अभिनव प्रयोग करणाऱ्या कीर्तनकार डॉ. अ‍ॅना शूल्ट्झ यांनी कीर्तन या विषयातल्या पीएच.डी. आहेत.

मूळच्या न्यू यॉर्क येथील अ‍ॅना या 'इंडियन स्टडीज' म्हणजेच 'भारतीय संस्कृती' या विषयाचे अध्यापन करीत आहेत.

महाराष्ट्राची कीर्तनपरंपरा[संपादन]

टाळ-मृदंगाच्या गजरात आळंदी-देहू येथून विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीला जाणारी वारी, राष्ट्रपुरुष आणि दैवतांच्या चरित्राचे आख्यान कथन करीत केले जाणारे कीर्तन ही महाराष्ट्राची आगळीवेगळी वैशिष्ट्ये आहेत. या राष्ट्रीय कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅना शूल्ट्झ या अमेरिकेतून भारतामध्ये आल्या.

कीर्तन विषयातल्या पीएच.डीसाठी[संपादन]

कीर्तन विषयाचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅना तीन वर्षांसाठी पुण्यामध्ये आल्या. हरिदासी, नारदीय आणि वारकरी कीर्तन परंपरेची वैशिष्ट्ये आणि सादरीकरणातील वेगळेपण याविषयी अ‍ॅना यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये, पूर्वाश्रमी कीर्तनकार असलेले करवीरपीठाचे माजी शंकराचार्य आणि राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तन सादरीकरणाविषयी माहिती घेतली. त्यानंतर गोविंदस्वामींची कीर्तन परंपरा पुढे नेणारे चारुदत्त आफळे, कीर्तनकार वासुदेवराव कोल्हटकर यांच्यापासून ते युवा पिढीतील श्रेयस बडवे या युवा कीर्तनकारांच्या मुलाखतींचा या प्रबंधामध्ये समावेश केला आहे. अभ्यासान्ती 'सिंगिंग ए हिंदूू नेशन - मराठी डिव्होशनल परफॉर्मन्स ॲन्ड नॅशनॅलिझम' या विषयावर प्रबंध सादर करून अ‍ॅना शूल्ट्झ यांनी पीएच. डी. संपादन केली.

ज्यू कीर्तन परंपरा[संपादन]

सध्या (२०१५ साली) डॉ. अ‍ॅना शूल्ट्झ या ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करीत आहेत. बायबलमधील तत्त्वज्ञान हा ज्यू कीर्तनकारांच्या आखान्याचा विषय असतो. या परंपरेनुसार कीर्तन करणारे काही कीर्तनकार पुणे आणि मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाखती आणि कीर्तनाचे रेकॉिर्डंग करून ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत.