अहमद शाह दुराणी
अहमदशाह दुराणी (पश्तो:, फारसी: حمد شاه درانی ;) ऊर्फ अहमदशाह अब्दाली (पश्तो:, फारसी: احمد شاه ابدالي ;) ,जन्मनावाने अहमदखान अब्दाली, (इ.स. १७२२ - इ.स. १७७२) हा दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. आधुनिक काळातील अफगाणिस्तान देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो.
अहमदखान आपल्या तरुणपणी अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून दाखल झाला व दाखविलेल्या शौर्यामुळे लवकरच चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख बनला. इराणाचा अफशरी सम्राट नादीरशाह अफशर याचा जून इ.स. १७४७ साली मृत्यू झाल्यानंतर अहमदशाह अब्दाली खोरासानाचा अमीर बनला. आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पठाण टोळ्यांना एकवटून त्याने पूर्वेकडे भारतीय उपखंडातल्या मोगल साम्राज्यास व पश्चिमेकडे खिळखिळ्या झालेल्या इराणातल्या अफशरी साम्राज्याला मागे रेटत आपले राज्य विस्तारले. त्याने दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, पाकिस्तान, ईशान्य इराण व भारतीय उपखंडातील पंजाब प्रदेशात आपली सत्ता विस्तारली.
बालपण
[संपादन]अहमदशहा अब्दालीचे वडील इमामखान हे अनेक वर्षे किरमान येथे पर्शियन लोकांच्या कैदेत होते. इ.स. १७१५ साली त्यांची कैदेतून सुटका झाली. कैदेतून सुटल्यानंतर मुलतान येथे ते आपल्या नातेवाइकांकडे आले. तिथेच त्यांनी स्वतःचे घर वसविले. मुलतान येथेच अहमदखान म्हणजेच भावी अहमदशहा अब्दालीचा इ.स. १७२२ साली जन्म झाला. नंतर इमामखान स्वतःच्या काही अफगाण शत्रूंशी लढण्यासाठी अफगाणिस्तानला परतला. अहमदखान लहान असतानाच त्याचा पिता इमामखानाचा मृत्यू झाला.
युद्धमोहिमा
[संपादन]भारतीय उपखंड
[संपादन]त्याने पाच वेळा भारतीय उपखंडावर आक्रमणे केली. त्याने इ.स. १७६१ साली पानिपताच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना हरवले होते.
मराठे व अब्दाली यांच्यात इ.स. १७६१ पानिपतचे युद्ध झाले असले तरी हिंदुस्थानला अब्दालीचा हा पहिलाच परिचय होता असे नाही. या आधीही त्याने भारतावर चार स्वाऱ्या केलेल्या होत्या.
इ.स. १७४७ मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा नादीरशहाचा खून झाला. त्यामुळे त्याचा सेनापती अहमदशहा अब्दालीने सत्ता बळकावली. सत्तेवर येताच त्याने हिंदुस्थानातील राजकिय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवरी १७४८ मध्ये हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाजखानाचा पराभव करून दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने (महमदशहा) त्याच्याविरुद्ध आपला मुलगा अहमदशहा वजीर कमरुद्दीन व मीरबक्षी सफदरजंग यांना पाठविले. २१ मार्च रोजी मनुपूर तेथे लढाई होऊन अब्दालीचा पराभव झाला पण वजीर कमरुद्दीन मारला गेला.
अब्दालीचा पराभव झाला असला तरी तो संपला नव्हता. त्याने इ.स. १७४९ मध्ये दुसरी स्वारी केली. पंजाबचा सुभेदार मीरमन्नूने वजीरबादजवळ अब्दालीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीहून मदत न मिळाल्याने त्याने अब्दालीशी तह केला. त्यानुसार अब्दालीला पंजाबच्या उत्तरेकडील चार जिल्हे व १ लाख रुपये खंडणी मिळाली.
मोगल बादशहा अहमदशहा विरुद्ध वजीर सफदरजंग संघर्षाचा फायदा घेऊन अब्दालीने इ.स. १७५१ मध्ये तिसरी स्वारी केली. यावेळी सफदरजंग, रोहिले व पठाणांशी लढण्यात मग्न होता व त्याला मराठ्यांनी मदत केली होती. अब्दाली पंजाबला येताच घाबरलेल्या बादशहाने वजीरला बोलावणे पाठवले. सफदरजंगनेही अब्दालीविरुद्ध मराठ्यांशी करार केला व शिंदे होळकरांना बरोबर घेऊन दिल्लीकडे निघाला. परंतु तो दिल्लीला पोहोचण्याआधीच बादशहाने अब्दालीशी तह करून पंजाब देऊन टाकला होता. दिल्लीतील अंतर्गत परिस्थिती विस्फोटक बनली होती. त्यामुळे अब्दालीने दिल्लीला आपला वकील पाठवून ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली. यावेळी वजीराने काही खंडणी देऊन अब्दालीपासून दिल्लीचे रक्षण केले.
नोव्हेंबर इ.स. १७५६ मध्ये अब्दालीने चौथी स्वारी करून पंजाबमध्ये प्रवेश केला. त्याचा मुलगा तिमूरशहा व सेनापती जहानखान यांनी लाहोर जिंकून घेतल्याने संपूर्ण पंजाब अब्दालीच्या ताब्यात आला. यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून गेला, यावेळी दिल्लीचा वजीर इमाद-उल-मुल्ककडे त्याने १ कोटी रुपयांची मागणी केली त्यास वजीराने नकार दिल्याने अब्दालीने दिल्लीत प्रचंड विध्वंस व अत्याचार केले. जवळजवळ १ महिना दिल्लीची लूट केल्यानंतर तो मथुरेकडे गेला. तेथील शेकडो देवालयांचा नाश केला, हजारो हिंदूंची कत्तल केली. या सर्व लुटीत अब्दालीला १२ कोटी रुपये मिळाले.
पानिपतच्या लढाईत मिळालेला विजय हा अब्दालीचा शेवटचा विजय ठरला. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या लढाई नंतर मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी इ.स. १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. इ.स. १७७३ साली त्याचा मृत्यू झाला.
बाह्य दुवे
[संपादन]- "इन्व्हेजन्स ऑफ अहमदशाह अब्दाली - हारून मोहसीनी यांचे संकलन" (इंग्लिश भाषेत). 2006-03-01 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)