अवंतिकाबाई गोखले
अवंतिकाबाई गोखले (१७ सप्टेंबर, १८८२ -२६ मार्च १९४९) या मराठी लेखिका होत्या . यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र (१९१८) लोकमान्य टिळकांच्या प्रस्तावनेसहित प्रकाशित केले. गांधीयुगाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राला गांधी जीवनाचा व विचारांचा परिचय करून देणारे हे चरित्र लक्षणीय आहे. गांधी जिवंत असताना लिहिलेले हे पहिले चरित्र आहे. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाईंनी पुढे महिला आरोग्य व अन्य क्षेत्रात काम करण्यासाठी 'हिंद महिला समाजा'ची स्थापना केली होती. तसेच मिठाच्या सत्याग्रहात एकमेव महाराष्ट्रीयन महिला म्हणून समावेश होता.
सामाजिक कार्य
[संपादन]स्वातंत्र्यपूर्व काळात हिचे कर्तृत्व,वक्तृत्व आणि नेतृत्व पाहून लोकमान्य टिळकांनी त्यांचे कौतुक केले होते.शंभर वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांना मताधिकार नव्हता. इसवी सन १९२२ मध्ये महिलांना मताधिकार मिळाला. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत चार महिला निवडून आल्या.त्यामध्ये अवंतिकाबाई गोखले आणि सरोजिनी नायडू होत्या. सन १९२६ मध्ये त्या स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या.गिरगावातील जगन्नाथ शंकरशेठ मार्ग ते विठ्ठलभाई पटेल मार्ग हा अवंतिकाबाई गोखले मार्ग म्हणून ओळखला जातो.गांधीजींच्या सत्याग्रहात त्यांनी अनेक वेळा भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला.त्या स्वतः चरख्यावर केलेल्या सुतकताईतून दरवर्षी एक धोतरजोडी महात्मा गांधीना पाठवत असत.मराठी भाषेत गांधीजीचे पहिले चरित्र त्यांनी लिहिले.त्यांनी आयुष्यभर खादीचा वापर केला.हिंद महिला साप्ताहिक ते चालवत असत. गिरणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांनी पहिले पाळणाघर चालू केले.
बालपण
[संपादन]इसवी सन १८९१ साली अवंतिकाबाई ह्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला.तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. लग्न झाल्यावर त्यांनी शिक्षण घेतले.त्यांनी मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा शिकून त्यावर प्रभुत्व संपादन केले.इचलकरंजी संस्थानाच्या राणीसाहेब सन १९१९ साली इंग्लंडला गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या बरोबर इंग्रजी जाणणारी महिला म्हणून अवंतिकाबाई गेल्या होत्या. वयाच्या ६७ व्या वर्षी सन १९४९ मध्ये अवंतिकाबाई गोखले ह्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४