अरुण काकडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुण काकडे (जन्म : इ.स. १९३०; - ९ ऑक्टोबर २०१९) हे समांतर मराठी रंगभूमीवरील रंगायन, आविष्कार या नाट्यसंस्थांचे संस्थापक सदस्य होते. ते सदुसष्ट वर्षे रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अरुण काकडे पुण्याहून मुंबईत आले आणि ते अरविंद देशपांडे, माधव वाटवे, विजय तेंडुलकर, विजया मेहता यांनी स्थापन केलेल्या 'रंगायन' या नाट्यसंस्थेत दाखल झाले. ही संस्था विविध नाटके रंगमंचावर आणीत असे. पुढे अंतर्गत वादामुळे 'रंगायन' फुटली आणि अरुण काकडे यांनी, आणि अरविंद देशपांडे, विजया मेहता व सुलभा देशपांडे ह्यांनी मिळून १९७१ मध्ये 'आविष्कार' ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली. अरुण काकडे 'आविष्कार'चे व्यवस्थापक होते. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते 'आविष्कार'शी संबंधित राहिले.

'आविष्कार' ने प्रायोजिक मराठी नाटकांची जननी असलेली 'छबिलदास' चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. (मुंबई-दादरमधील छबिलदास हायस्कूल हे या चळवळीचे मुख्यालय होते.)

त्यांनी अमका हे आत्मचरित्र लिहिले आहे. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.