Jump to content

अरगट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरगट रोग या पानावरून पुनर्निर्देशित)
अरगट

अरगट हा एक कवकजन्य रोग असून ज्वारीबाजरी या पिकांवर प्रामुख्याने आढळून येतो. अरगट किंवा क्लॅव्हिसेप्स परप्यूरिया नावाचे कवक असून ते राय, इतर धान्ये व गवत यांवर वाढते. तृणधान्ये व गवत यांवर या कवकामुळे जो रोग उत्पन्न होतो त्यासही अरगट असे नाव आहे. हा रोग मुख्यत्वे राय व बाजरी या पिकांवर आढळतो. बाजरीवरील रोगक्लॅव्हिसेप्स मायकोकेफलिया नावाच्या कवकामुळे होतो.

या कवकामुळे कणसात व ओंबीत दाणे भरत नाहीत व त्यांच्याऐवजी लांबट, मोठी व कठीण घेवड्यासारखी वाढ होते. तिला स्क्लेरोशिया म्हणतात. वसंत ऋतूत स्क्लेरोशिया वाढून त्यापासून देठ व बीजुके तयार होतात. पक्वावस्थेतील बीजुके वाऱ्‍याने उडून किंवा कीटकांद्वारे जाऊन नव्या ठिकाणी (कणीस, गवत) रोग उत्पन्न करतात.

स्क्लेरोशियायुक्त कणसे खाल्ल्यामुळे मानवाला किंवा जनावरांना विषबाधा होते. या विषबाधेमुळे उद्भवणाऱ्‍या लक्षणसमूहाला अरगोटिझम म्हणतात. ही विषबाधा मानवाला अनेक शतकांपासून ज्ञात असून ती कधी कधी साथीचे स्वरूप धारण करते. १९५३, १९५५ व १९७३ या अगदी अलीकडील काळात अशी विषबाधा मोठ्या प्रमाणावर झाली होती. रोगग्रस्त बाजरी खाण्यात आल्याने विषबाधा होते. रोगट बाजरी मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजवत ठेविल्यास रोगट दाणे वजनाने हलके असल्यामुळे तरंगून वर येतात. ते सर्व काढून टाकून तळाची बाजरी उन्हात वाळवून वापरल्यास विषबाधा टाळता येते. पिकावरील अरगट रोग पीक आलटून पालटून घेणे, निवडक बी वापरणे तसेच कवकयुक्त गवताचा नाश करणे इ. उपायांनी टाळता येतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अरगट". मराठी विश्वकोश. २४ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.