Jump to content

अधिराज्यत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अधिराज्यत्व ह्या संज्ञेने मध्ययुगात राजा, वरिष्ठ सरंजामी सरदार व कनिष्ठ सरदार ह्यांच्यामधील संबंध दर्शविले जात. आता ही संज्ञा दोन कमीअधिक प्रबळ राज्यांतील श्रेष्ठकनिष्ठपणाचे संबंध दर्शविण्यासाठी वापरली जाते. अधिराज्यत्व म्हणजे एका संपूर्णतया सार्वभौम राज्याचा दुसऱ्या सार्वभौम नसलेल्या राज्यावरील विशिष्ट कारणापुरता असलेला अधिकार. तो साधारणपणे कनिष्ठ राज्याच्या परराष्ट्रीय संबंधांपुरता मर्यादित असतो. इतर बाबतींत वरिष्ठ राजसत्तेएवढेच कनिष्ठ राजसत्तेस सार्वभौमत्व असते. स्वातंत्र्यापूर्वी इंग्लंडच्या राजाचे हिंदूस्थानचा बादशहा ह्या नात्याने हिंदी संस्थानांशी असलेले संबंध ह्याच स्वरूपाचे होते. परराष्ट्रनीती, संरक्षण इ. विशिष्ट बाबींपुरते ब्रिटिश बादशहाचे अधिराज्यत्व असले, तरी इतर अंतर्गत बाबतींत हिंदी संस्थानिक बरेचसे स्वतंत्र असत. पहिल्या महायुद्धापूर्वी ईजिप्तवर तुर्कस्तानचे बरेचसे अशाच प्रकारचे अधिराज्यत्व कित्येक वर्षे होते.

संघराज्यामध्ये घटक राज्यास आपल्या क्षेत्रात बरेच स्वातंत्र्य असते, तथापि मध्यवर्ती सत्ता व घटकराज्ये ह्यांच्यात अधिराज्यत्वाचे नाते असत नाही. कारण असा राज्यांत मध्यवर्ती सत्ताच संपूर्णपणे सार्वभौम असते. अधिराज्यत्वाखाली येणारी राजसत्ता मात्र आपल्या मर्यादित क्षेत्रात का होईना, पण सार्वभौम असते. भूतान हे राष्ट्र प्रत्यक्षात व सिक्कीम हे कायदेशीरपणेही भारताच्या अधिराज्यत्वाखाली आहे, ही अशा प्रकारच्या संबंधांची सध्याची उदाहरणे होत.