अण्णासाहेब लठ्ठे
अण्णा बाबाजी लठ्ठे (९ डिसेंबर, १८७८ - १६ मे, १९५०) उर्फ अण्णासाहेब लठ्ठे हे एक भारतीय राजकारणी, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते.[१]
अण्णासाहेब लठ्ठे यांनी प्रथम राजाराम महाविद्यालयात इंग्रजीचे व्याख्याते आणि नंतर कोल्हापूर राज्याचे शिक्षण निरीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते १९२० मध्ये मुंबई दक्षिण ग्रामीण मतदारसंघातून कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या पाठिंब्याने मध्यवर्ती विधानसभेवर निवडून आले होते.
इ.स. १९२५ मध्ये लठ्ठे यांची कोल्हापूर राज्याचे छत्रपती राजाराम तिसरे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दिवाण रघुनाथराव सबनीस यांच्या निवृत्तीनंतर त्यांची कोल्हापूरच्या दिवाणपदी नियुक्ती झाली.[२] गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चेंबर ऑफ प्रिन्सेस स्पेशल ऑर्गनायझेशनने त्यांचे नामांकन केले होते. इ.स.१९३१ मध्ये त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला आणि ते बेळगावला स्थायिक झाले.
लठ्ठे १९३६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि १९३७ च्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या निवडणुकीत ते बेळगाव उत्तर मतदारसंघातून मुंबई विधानसभेवर निवडून आले. पहिल्या खेर मंत्रालयात त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९४५ मध्ये ते पुन्हा मुंबई विधानसभेवर निवडून आले.
अण्णासाहेब लठ्ठे हे दक्षिण भारत जैन सभा या संस्थेचे संस्थापक आणि काही काळ अध्यक्ष होते. याच सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूरचे ते अधिकारी आणि प्रगति आणि जिनविजय या मुखपत्राचे संपादक होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे चरित्र लिहिले आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ Patil, Padmaja. Annasaheb Latthe and his times.
- ^ Phadke, Yashawant. Visavya Shatakatil Maharashtra.
- ^ Joharapurkar, Amit (2023). Charitra Tyanche Paha Jara. India: Excel Publications. ISBN 978-93-91708-14-6.