अखिल भारतीय कीर्तन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अखिल भारतीय कीर्तन संस्था ही नारदीय कीर्तनाचे शिक्षण देणारी संस्था, मुंबईतील दादर-पश्चिममध्ये द.ल. वैद्य मार्गावरील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आहे.

स्थापना[संपादन]

नारदीय कीर्तनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी १९४० साली श्रावण वद्य पंचमीला या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचे आद्य संस्थापक शं. ब. कुलकर्णी आणि कीर्तनकार गो.ग. भोसेकरबुवा हे होते. अशा या दोघांच्या प्रयत्‍नांतून ही संस्था प्रथम एका बांबू-पत्र्याच्या तात्पुरत्या छपराखाली सुरू झाली. त्याच वर्षी संस्थेची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली.

नारदीय कीर्तनाचा प्रसार, प्रचार आणि प्रशिक्षण या कार्याला वाहून घेतलेल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या नव्या वास्तूचे भूमि सन १९५८च्या विजयादशमीच्या दिवशी त्यावेळचे मुंबई राज्याचे मंत्री आणि संस्थेचे विश्वस्त डॉ. त्रिं. रा. नरवणे याचे हस्ते झाले. वास्तु निर्माण झाल्यावर सन १९६०च्या श्रावण वद्य पंचमीला श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वामनराव लक्ष्मणराव डहाणूकर यांनी केली.

कीर्तन-शिक्षण[संपादन]

भोसेकर बुवा, मारुलकर बुवा, महाजन गुरुजी, प्रकाशकर शास्त्री, वझेबुवा, श्री रा. भागवत सर यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य मोठ्या जिद्दीने आणि तळमळीने केले. संगीताची बाजू देवधर गुरुजी आणि ग. बा. साधलेसर यांनी समर्थपणे सांभाळली होती. कीर्तन शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी संस्थेत दररोज होणार्‍या कीर्तन प्रवचन कार्यक्रमासाठी येणार्‍या श्रोत्यांची संख्या मोठी असे.

या संस्थेतील कीर्तन प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरुवातीला ५ वर्षांचा होता. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी कीर्तन शिकायला येत आणि तांत्रिक प्रगतीमुळे जीवन गतिमान झाले, हे लक्षात घेता, अभ्यासक्रम सन २०००नंतर ३ वर्षाचा करण्यात आला. आधी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी संस्थेत शिकण्यासाठी येत, तरीही संस्थेचे काम नेटाने सुरूच राहिले. पुढे ही संख्या वाढत वाढत, दरसाल ३० ते ३५ विद्यार्थी अशी झाली.

आजपर्यंत ४००हून जास्त विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून गेले. अनेक जण स्वेच्छेने कीर्तन करू लागले. मुंबई आणि परिसरातील अनेकजण नामवंत कीर्तनकार म्हणून ओळखले जाऊ लागले, देशातच नव्हे तर परदेशात जाऊन कीर्तने-प्रवचने करू लागले.

पत्रव्यवहाराने शिक्षण[संपादन]

मुंबईबाहेर राहणार्‍या आणि कीर्तन शिकू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पत्रव्यवहाराने कीर्तन शिकविण्याचा उपक्रम २००७ मध्ये सुरू झाला. त्यासाठी एक खास दूरस्थ अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती ठरविण्यात आली.

क्रमिक पुस्तक[संपादन]

सन १९९०-१९९४ दरम्यान कीर्तनाच्या पूर्वरंग आणि आख्यानाचे ’कीर्तन रत्‍नावली भाग १ व २’ नावाचे एक पुस्तक डॉ. ग.शि. पाटणकर यांच्या संपादनाखाली छापून प्रसिद्ध केले; ते अल्पकाळात लोकप्रिय झाले. हे उपयुक्त पुस्तक ही कीर्तन संस्था विद्यार्थ्यांना माफक किमतीत उपलब्ध करून देते.

नामांतर[संपादन]

सन २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नाव बदलून ते ’साई सत्चरित्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय’ असे झाले.

इतर[संपादन]

या अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे स्वतःचे विट्ठल मंदिर, कीर्तन शाळा, आणि सुसज्ज सभागृह आहे.