पवळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तबाजी आणि रेऊबाई भालेराव या महार दांपत्याच्या पोटी महाराष्ट्रातील हिवरगांव (तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर) या गावी १८७० साली पवळाचा जन्म झाला पुढे घरच्यांनी तिचे लग्न देवाशी लावून दिल्याने पवळा ’खंडोबाची मुरळी’ झाली. नंतर हरिबाबा नावाच्या एका गृ्हस्थाच्या तमाशात पवळा काम करू लागली. तो तमाशा बंद पडल्यावर पवळा नामा धुलवडकराच्या तमाशात गेली.

पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तिचा गळा मुळातच अतिशय गोड होता. तिचे अप्रतिम सौंदर्य, तिची नृत्यकला आणि तिचा गोड गळा यावरून लोक तिला ’नामचंद पवळा’ म्हणू लागले. नामा धुलवडकराचा तमाशा फुटल्यावर पवळा, पठ्ठे बापूराव यांच्या तमाशात आली. पवळा आणि बापूराव यांचा संगम हा बापूरावांच्या प्रतिभेच्या परमोत्कर्षास कारणीभूत झाला. आणि त्याचवेळी बापूराव बाटले, त्यांना हद्दपार का करू नये अशी लोकांत चर्चा सुरू झाली. रोज मारामाऱ्या होऊ लागल्या आणि शेवटी पठ्ठे बापूराव आणि पवळा यांना कोर्टाचे बोलावणे आले. न्यायाधीशाने बापूरावांना ’तुम्ही बाटलांत का’ असे विचारले. त्याच्या उत्तरासाठी बापूरावांनी कोर्टातल्या ज्यूरींना आपल्या तमाशाचे आमंत्रण दिले. ज्यूरी तमाशाला आले आणि बापूरावांनी कवन सुरू केले.:-

श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी, सोवळे ठेवले घालुन घडी
मशाल धरली हाती तमाशाची, लाज लाविली देशोधडी
कलीयुगाचा ऐका दाखला, पठ्ठे बापुराव भुलला पवळिला
महारिणीसाठी महार झाला
पुन्हा जात मिळेल का हो त्याला
ब्राह्मणाला हो जी जी ॥

कोर्टाने बापूराव आणि पवळाला निर्दोष सोडले. पुढे परत त्यांचा तमाशाचा फड सुरू झाला आणि थोड्याच दिवसात पवळेच्या हेकेखोरपणाने मोडला. बापूरावांची लेखणी बंद पडली. पवळाने मारुती कवळेकर नावाच्या सावकाराच्या नादाने स्वतंत्र फड काढला आणि तो न चालल्याने ती परत पठ्ठे बापूरावांकडे आली, मात्र फक्त थोड्या दिवसांसाठी. ६ डिसेंबर १९३९ला पवळाचा मृत्यू झाला.

पवळेच्या मृत्यूनंतर बापूरांवांची लेखणी कायमची बंद झाली, असे म्हणतात.