Jump to content

सँड क्रीकची कत्तल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सँड क्रीकची कत्तल, चिव्हिंग्टने केलेली कत्तल, शायानांची कत्तल किंवा सँड क्रीकची लढाई ही २९ नोव्हेंबर, इ.स. १८६४ रोजी अमेरिकेच्या कॉलोराडो प्रदेशात (आताचे कॉलोराडो राज्य) घडलेली कत्तल होती. अमेरिकन इंडियन युद्ध या युद्धांतर्गत कॉलोराडो प्रदेशातील ७०० सैनिकांच्या स्थानिक शिबंदीने जनरल जॉन चिव्हिंग्टनच्या नेतृत्वाखाली नैऋत्य कॉलोराडोत असलेल्या शायान आणि अरापाहो लोकांच्या वस्तीवर हल्ला चढवला. पहाटेच्या वेळी निःशस्त्र असलेल्या या वस्तीत मुख्यत्वे लहान मुले, स्त्रीया आणि वृद्ध पुरुष होते. युद्धाच्या संपूर्ण तयारीत आलेल्या कॉलोराडो शिबंदीने अंदाधुंद हल्ला चढवला व अनेक व्यक्तींची कत्तल केली. विविध अंदाजांनुसार यात ७०-१६३ लोक मृत्युमुखी पडले.[]

या हल्ल्यात शामिल तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी सायलस सोल आणि जोसेफ क्रेमर या नेत्यांनी आपापल्या तुकड्यांना हल्ला न करण्याचे फर्मावले होते. या दोन तुकड्या जेथे होत्या तेथून अनेक शायान व अरापाहोंनी पळ काढला व स्वतःला वाचवले.

अतोनात क्रुरपणे झालेल्या हल्ल्याची चौकशी झाल्यावर त्यावेळच्या कॉलोराडोच्या गव्हर्नर जॉन एव्हान्सला राजीनामा द्यायला लागला. चिव्हिंग्टनने लश्करातून राजीनामा दिलेला असल्याने त्याच्यावर लश्करी न्यायालयात खटला चालवता आला नाही. चिव्हिंग्टनला त्यावेळच्या कॉलोराडो प्रदेशातील काही भागांत आदराची तर इतर भागांत तुच्छतेची वागणूक दिली गेली. खटल्यामध्ये चिव्हिंग्टनविरुद्ध साक्ष दिल्याबद्दल सायलस सोलची काही आठवड्यांनंतर हत्या झाली.

ही कत्तल झालेले ठिकाण आताच्या कायोवा काउंटीमध्ये आहे. या ठिकाणाला राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Smiley, B. "Sand Creek Massacre", Archeology magazine. Archaeological Institute of America. Retrieved February 8, 2010.