रुक्मिणीस्वयंवर (कर्ता नरेंद्र)
मराठीतील पहिले शृंगारिक आख्यानकाव्य. काव्यदृष्ट्या व कालदृष्ट्या साती ग्रंथांमधील पहिल्या क्रमांकाचा ग्रंथ. ८७९ ओव्या. हे भक्तीतून उमललेले विदग्ध काव्य आहे. ज्या यादवकाळात रुक्मिणीस्वयंवर लिहिले गेले त्या काळात मराठी वाङ्मयाच्या भावसृष्टीवर श्रीकृष्णाच्या विभूतिमत्वाचे अधिराज्य होते. भागवताचा दशमस्कंध व पद्मपुराणाचा आधार या रचनेला आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरतो पण प्रत्यक्षात श्रीकृष्णाशी होतो.
तो पुराणांतुल आनंद-समुद्रु : तेथ दशम स्कंदु तोचि चंद्रु
तें चांदणें सांघैन म्हणे नरिंद्रु : रुक्मिणी-सैंवर
भागवतापासौनि पद्मपुराणी : जें सैंवर बोलिजे रुक्मिणी
तेथ देवातें कींनरू वाखाणी : ते सांघैल नरींद्रु
या काव्याचा घाट संस्कृतमधील महाकाव्यांच्या धर्तीवर आहे. वर्णनाची विपुलता व कथानकाची मंदगती यांचा प्रत्यय येतो. तपशीलात नरेंद्राने काही बदल केलेले आहेत. रुक्मिणीस्वयंवराच्या कथेवर अनेकांनी रचना केली पण नरेंद्राची सर कुणालाच आली नाही. खरीखुरी कलावंताची दृष्टी असणारा नरेंद्र हा मराठीतील पहिला कवी आहे. काव्यातून नरेंद्राचे संगीतज्ञान जाणवते. "बाणभट्ट, श्रीहर्ष यांच्याशी साम्य; किन्नराचे विस्तृत उपाख्यान ही नरींद्राच्या उन्मेषशाली प्रतिभेची स्वतंत्र निर्मिती आहे" : डॉ. सुरेश डोळके
उल्लेखनीय वर्णने
[संपादन]विरहावस्थेचे वर्णन
[संपादन]डावा हातु उसिसां घातला : उजिवा हृदयावरि ठेविला
जैसा जीवेंसीं देवो धरिला : निसुटैल म्हणौनि
रितुराया वसंत-वर्णन
[संपादन]तया रितुरायाचेनि रजें
कामिनियांचा वेधु कवणां नुपजे?
झाडें डोहळैजताति माजें
स्त्री-सुख भोगावया ॥
वसंतु माजिरा कैसा
सूर्याते करी पद्मिणी धरी दिसा
दिनकरू भूलला तेया रसा
म्हणौनि वेगां न ढळे ॥
ते मर्हावटे बोल रसिक : वरि दावी देशियेचें बिक
म्हणैन सव्याख्यान श्लोक : मिसें वोवियेचेनि