साप्ताहिक ऐक्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सातारचे त्या काळाचे ज्येष्ठ नेते रावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांनी १९ जानेवारी १९२४ रोजी सातारा शहरात ’ऐक्य’ नावाच्या साप्ताहिकाची स्थापना केली. साप्ताहिकाची संपादक म्हणून बाग्भट्ट नारायण देशपांडे यांची नेमणूक झाली होती. ’ऐक्य'ला व्यापक स्वरूप देण्यासाठी काळे-देशपांडे यांनी स्थापन केलेल्या संपादन मंडळात सरकार मामासाहेब पंडितराव, कायदेतज्‍ज्ञ नानासाहेब जोशी व कवी त्र्यं. रा. अभंग यांचा समावेश होता.

ऐक्यची ध्येयधोरणे आपल्या विचारांशी, लेखनाशी मिळतीजुळती वाटल्याने १९३५मध्ये चं.ह. पळणिटकर मुंबईतून सातारला आले, आणि त्यांनी ’ऐक्य’मध्ये कार्यकारी संपादकाची जबाबदारी स्वीकारली. पुढे देशपांडे यांच्या निधनानंतर स. कृ. शिंदकर, न. ग. जोशी "ऐक्य'चे संपादक झाले. मात्र कार्यकारी संपादकपदी पळणिटकरच राहिले.

सातारा जिल्ह्यात ’ऐक्य’चा असलेला दबदबा आणखी वाढवण्यासाठी चं.ह. पळणिटकर यांनी खूप परिश्रम घेतले. घणाघाती आणि निर्भीड शैलीच्या त्यांच्या धारदार लेखनाने, ’ऐक्य'चा वाचक वर्ग वाढला. ते सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे मुखपत्र झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १९४२मधल्या "प्रती सरकार'चे सातारा जिल्हा हेच केंद्र होते. त्या काळात चं.ह. पळणिटकर यांनी ’ऐक्य'मध्ये जहाल लेखन करून स्वातंत्र्य चळवळीचा धडाडीने प्रचारही केला.

ऐक्यची मालकी[संपादन]

वार्षिक वर्गणीच्या रूपाने येणारे तोकडे उत्पन्न आणि जाहिरातीद्वारे मिळणारे उत्पन्न अत्यल्प, अशा स्थितीत ’ऐक्य'चा जमाखर्चाचा मेळ कधीच बसू शकत नव्हता. पण, स्वातंत्र्य लढ्याने भारलेल्या ’ऐक्य' परिवारातील सदस्यांनी पदरमोड करून ’ऐक्य'चे प्रकाशन खंडित होऊ दिले नव्हते. तोटा वाढू लागल्यामुळे ’ऐक्य'च्या संपादक मंडळाने खूप विचाराअंती नाइलाजाने ’ऐक्य' बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पळणिटकर यांनी धाडसाने ’ऐक्य बंद करू नका, मी चालवीन’ अशी भूमिका घेतली. मंडळाने ’ऐक्य'चा छापखाना न. ग. जोशी यांना आणि साप्ताहिकाची मालकी पळणिटकर यांच्याकडे सुपूर्त केली.

चं.ह. पळणिटकर ’ऐक्य'चे मालक झाले खरे, पण या साप्ताहिकाच्या नाव आणि परंपरेशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हते. भांडवल व छापखाना नव्हता. कुणाचे आर्थिक पाठबळ नव्हते. पण त्यांचा ’ऐक्य'च्या वाचकांवर, त्यांच्या उदंड पाठबळावर अपार विश्वास होता. या विश्वासावरच त्यांनी ’ऐक्य' चालवायचे काम जिद्दीने स्वीकारले आणि ’ऐक्य'ला आपल्या घणाघाती, आक्रमक लेखनाने प्रचंड लोकप्रियताही मिळवून दिली.

’ऐक्य'साठी मदतनीस, नोकर मिळणे त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे परवडणारे नव्हते. त्यामुळे ’ऐक्य'मधील लेखन एकटाकी करण्यापासून ते मजकुराचे संपादन करण्यापर्यंतची कामे तेच करीत. सातारा शरातील सदाशिव पेठ आणि प्रतापगंज पेठेतील वेळोवेळी बदललेली राहती घरे हेच ’ऐक्य'चे कार्यालय असे. चिमणपुऱ्यातील ल. म. भागवत यांच्या गजानन प्रिंटिंग प्रेसमध्ये पाठमोऱ्या कागदावर लिहिलेली भेंडोळी घेऊन चं.ह. पळणिटकर स्वतःच जात असत आणि मुद्रितशोधनही तेच करीत. छापलेल्या अंकाचे गठ्ठेही घरी आणे, परगावी पोस्टाने अंक पाठवण्यासाठी तिकिटे लावणे आणि पत्त्याच्या चिठ्ठ्या चिकटवणे ही कामे त्यांनाच करावी लागत. पळणिटकरच हे गठ्ठे पोस्टात नेऊन देत. मात्र, सातारा शहरात स्थानिक वर्गणीदारांना अंक वाटप करण्याचे काम त्यांनी एक-दोन मुलांवर सोपवले होते.

संपादकांच्या अपार जिद्द, कष्ट आणि निर्धाराच्या बळावर राष्ट्रीय स्वतंत्र बाण्याचे हे साप्ताहिक यशस्वी झाले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सातारा जिल्ह्याच्या विविध समस्या त्यांनी ’ऐक्य'ने चव्हाट्यावर मांडल्या. जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. नगरपालिका आणि डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शनपर लेख ’ऐक्य’मध्ये सतत येत राहिले.’ऐक्य’ने विकासात्मक पत्रकारितेचा नवा आदर्श निर्माण केला यात शंका नाही.

दैनिकात रूपांतर[संपादन]

१९ जानेवारी १९६७रोजी सुरेश आणि शरद पळणिटकर यांनी या ऐक्य साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात केले. आज (२०१२साली) दक्षिण महाराष्ट्राचे मुखपत्र असलेल्या या दैनिकाचे संपादक देवेंद्र पळणिटकर आणि व्यवस्थापकीय संपादक शैलेंद्र पळणिटकर आहेत.