स्फटिक
स्फटिक (जर्मन : Kristalle, फ्रेंच : cristaux, इंग्रजी : crystals; मराठी उच्चार : क्रिस्टल) म्हणजे अशी घन वस्तू, जिच्यामधे अणू-रेणूंची एक ठराविक संरचना तिन्ही मितींमधे पुनरावृत्तीत होते. स्फटिक बनण्याच्या क्रियेला स्फटिकीभवन असे म्हणतात. बहुतांशी धातू हे बहुस्फटिकी असतात. काही स्फटिकात तापमान बदलल्यास त्यात विद्युत् निर्मिती होते. अशा प्रकारच्या स्फटिकात एक विशिष्ट दिशा असते. या दिशेला विद्युत् अक्ष म्हणतात. स्फटिकांवर विशिष्ट दिशांनी दाब लावले असता स्फटिकाच्या एका पृष्ठभागावर धनविद्युत् भार व दुसऱ्या पृष्ठभागावर ऋण विद्युत् भार उत्पन्न होतो. यालाच स्फटिकाचे विद्युत् ध्रुवण झाले असे म्हणतात.
दोष
[संपादन]मूलतः (निसर्गतः) कोणताही स्फटिक शक्यतो निर्दोष नसतो. आणि त्यात काही न काही विकृती असतेच. ही विकृती स्फटिकाच्या अनेक भौतिक आणि तांत्रिक गुणधर्मांवर परिणाम करते. खरे तर, स्फटिक हा काटेकोरपणे रचलेल्या अनेक अंतर्गत अणूंच्या प्रतालांचा बनलेला असतो. या अंतर्गत प्रतलांना lattice म्हणतात. मराठीत आपण त्यांना प्रस्तर म्हणू. स्फटिक-विकृती म्हणजे या प्रस्तरातील अणूंच्या क्रमातील अनियमितता होय. ही अनियमितता अणूच्या व्यासात स्पष्टपणे प्रतीत होते.