मान्योशू
मान्योशू, जपानी कवितांचा एक प्राचीन संग्रह. मान्योशूचे एकूण वीस खंड असून ते उभे करण्यात ओतोमोनो याकामोची (७१८-७८५) ह्या कवीच्या पुढाकाराचा आणि परिश्रमांचा भाग मोठा आहे[१]. सु. ४,५०० कवितांचा अंतर्भाव असलेल्या ह्या महासंकलनातील अखेरच्या कवितेचा रचनाकाळ इ. स. ७५९ असा आहे. साधारणपणे इ. स.च्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंतची म्हणजे सु. ३०० वर्षांच्या कालावधीतील, वेचक कविता मान्योशूत समाविष्ट करण्यात आल्याचे दिसते. जपानी भावकवितेच्या ‘तांका’ ह्या प्रकारातील रचना ह्या संकलनात आधिक्याने आहेत. तसेच ह्या संकलनातील बऱ्याचशा रचना इ. स.च्या सातव्या शतकापासूनच्या आहेत. काकीनोमोतोनो हितोमारो (सु. ६८०-७००), यामाबेनो आकाहितो (मृ. ७३६ ?), यामानोनो ओकुरा (६६०-७३३), ओतोमोनो ताबीतो (६६५-७३१) आणि ओतोमोनो याकामोची (७१८-८५) हे ह्या संकलनातले काही प्रमुख कवी होत. नुकादानो ओकीमी, साकानो इरात्सुमे आणि कासानो इरात्सुमे ह्यांसारख्या काही कवयित्रींच्या कविताही ह्या संकलनात आहेत. काही कवितांचे कर्तृत्त्व अज्ञात आहे.
काळानुरूप आणि कवींनुरूप काव्यशैलीत होणारी काही परिवर्तने विचारात घेऊनही सरल, उत्कट आणि जिंवत अभिव्यक्ती तसेच एक प्रकारचा निर्व्याजपणा हे ह्या संकलनांतील कवितांचे एक सर्वसाधारण वैशिष्ट्य होय, असे म्हणता येईल. मान्योशूचा इंग्रजी अनुवाद १९४० मध्ये प्रसिद्ध झाला (दुसरी आवृ. १९६५).
संदभ
[संपादन]- ^ Uemura, Etsuko 1981 (24th edition, 2010). Man'yōshū-nyūmon p.17. Tokyo: Kōdansha Gakujutsu Bunko.