जॉन लोगी बेअर्ड
जॉन लोगी बेअर्ड (इंग्लिश: तिथे मजकूर टाईप आय माहिती सर्व खोटे आहे
बेअर्ड यांचा जन्म हेलिंझबर (स्कॉटलंड) येथे झाला. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफिल्ड ॲकॅडेमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे तांत्रिक शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या पदवी मिळविण्यामध्ये व्यत्यय आला. तथापि लष्करी नोकरीकरिता ते अक्षम ठरल्याने लवकरच त्यांनी एका विद्युत् शक्ती उत्पादक कंपनीत व्यवस्थापक अभियंता म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. युद्धानंतर त्यांनी विविध व्यवसाय केले; पण आजारपणामुळे ते सर्व सोडून १९२२ नंतर त्यांनी दूरचित्रवाणीवर संशोधन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. प्रथमतः १८२४ मध्ये बाह्यरेखांच्या रूपातील वस्तूंचे व १९२५ मध्ये ओळखता येतील अशा मानवी चेहेऱ्यांचे प्रेषण करण्यात त्यांनी यश मिळविले. २७ जानेवारी १९२६ रोजी त्यांनी रॉयल इन्स्टिटयूशनमध्ये बोलत असलेल्या व धूम्रपान करीत असलेल्या मानवी चेहेऱ्याची प्रतिमा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत प्रेषित करण्याचे प्रात्यक्षिक शास्त्रज्ञांच्या समोर करून दाखविले. याकरिता त्यांनी प्रकाशविद्युत् घट [⟶ प्रकाशविद्युत्], निऑन दिवा आणि चित्राच्या क्रमवीक्षणासाठी ३० छिद्रे असलेली व सेकंदाला साडे बारा फेरे करणारी निपको तबकडी [⟶ दूरचित्रवाणी] वापरली. अशा प्रकारे त्यांनी दूरचित्रप्रेषणाचा पहिला यशस्वी प्रयोग केला. प्रकाशविद्युत् घटावर अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरणांचा परिणाम होत असल्याचे बेअर्ड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अंधारात दिसण्यास मदत करणाऱ्या ‘नॉक्टोव्हायझर’ या उपकरणाचा शोध लावला. रात्री वा धुक्यात नौकानयनासाठी व मोटार चालकांना उपयुक्त असणाऱ्या या उपकरणाचे १९२६ मध्ये त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. पुढे रडार या अधिक प्रभावी साधनाचा शोध लागल्यावर हे उपकरण मागे पडले.
बेअर्ड यांनी स्वतःचे दूरचित्रप्रेषण स्थानक कूलसन (केंट) येथे स्थापन केले. फेब्रुवारी १९२८ मध्ये या स्थानकातून त्यांनी अटलांटिक महासागरापार अमेरिकेत हार्ट्सडाल (न्यू यॉर्क राज्य) येथे चित्रप्रेषण केले व तेथे त्यांचे यशस्वी रीत्या ग्रहण होऊन चित्र स्पष्टपणे दिसले. याकरिता भूमार्गे ४८ किमी. दूर असलेल्या एका रेडिओ प्रेषकाला व तेथून अटलांटिकवरून ४५ मी. तरंगलांबीवर रेडिओद्वारे प्रेषण करण्यात आले. १९२९ मध्ये जर्मन टपाल खात्याने बेअर्ड यांना त्यांच्या पद्धतीवर आधारलेली दूरचित्रप्रेषण सेवा विकसित करण्यासाठी सवलती दिल्या आणि दोन महिन्यांनंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बी.बी.सी.ने) त्यांना आपले प्रयोग पुढे चालू ठेवण्यासाठी संस्थेचा प्रेषक वापरण्यास परवानगी दिली. ३० नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांनी बी.बी.सी. मार्फत अर्धा तास दूरचित्रप्रेषण कार्यक्रम दाखविला. १९३० मध्ये चित्रप्रेषणाला ध्वनिप्रेषणाची जोड देण्यात आली. १९३६ साली बी.बी.सी ही पूर्ण वेळ दूरचित्रवाणी सेवा चालू करणारी जगातील पहिली संस्था ठरली. त्या वेळी बेअर्ड यांच्या चित्रप्रेषण पद्धतीबरोबर मार्कोनी इलेक्ट्रिकल अँड म्यूझिकल इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीने विकसित केलेल्या पद्धतीची स्पर्धा चालू होती. काही महिने दोन्ही पद्धती बरोबरीने वापरण्यात आल्या; पण फेब्रुवारी १९३७ मध्ये बी.बी.सी. ने मार्कोनी पद्धतीचाच पूर्णतः स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. बेअर्ड यांनी प्रकाशीय यांत्रिक पद्धतीने चित्रचौकटीचे (३० रेषांपासून २४० रेषांपर्यंत) क्रमवीक्षण करण्यापर्यंत मजल गाठली होती (मार्कोनी इलेक्ट्रॉन शलाका पद्धतीत ही संख्या ४०५ होती.) तथापि इलेक्ट्रॉनिकी विषयाची फारशी माहिती नसल्याने त्यांना आपली पद्धती पुढे विकसित करता आली नाही. १९३९ मध्ये त्यांनी नैसर्गिक रंगातील दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक दाखविले. मोठ्या पडद्यावर चित्र दाखविण्याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले होते. १९४१ पासून केबल अँड वारलेस लि. या कंपनीत त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले व तेथे ⇨ अनुचित्र-प्रेषणासाठी दूरचित्रप्रेषण पद्धती वापरण्याबाबत संशोधन केले. त्यांनी १९४६ मध्ये त्रिमितीय दूरचित्रवाणीसंबंधीचे संशोधन पूर्ण केले होते. ते इंग्लंडमधील बेक्सहिल (ससेक्स) येथे मृत्यू पावले.