Jump to content

मोहम्मद जावद झरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महंमद जावद झरीफ (जन्म : तेहरान-इराण, ७ जानेवारी १९६०) हे इराणचे परराष्ट्रमंत्री आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामधील २०१५ सालचा अण्वस्त्र नियंत्रण करार घडवून येण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

शिक्षण

[संपादन]

महंमद जावद झरीफ यांचे शालेय शिक्षण अलावी स्कूल या धार्मिक संस्थेत झाले. त्यांनी लहानपणीच अलि शारियतीसमाद बेहरंगी यांची पुस्तके वाचून क्रांतिकारी विचार आत्मसात केले होते. ते कट्टर धर्मनिष्ठ आहेत. ते अस्खलित इंग्लिश बोलतात.

झरीफ हे सतराव्या वर्षी अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील ड्रू कॉलेज प्रिपरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे सॅन फ्रान्सिस्को स्टेट विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात बी.ए. केले व नंतर १९८२ मध्ये ते एम.ए. झाले.

त्यानंतर महंमद झरीफ यांनी डेन्व्हर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या जेसेफ कोरबेल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या केंद्रातून आंतरराष्ट्रीय कायदा व धोरण या विषयात पीएच.डी. केले.

राजकीय आणि अध्यापकीय कारकीर्द

[संपादन]

महंमद जावद झरीफ यांनी इ.स. १९९० नंतर राजनैतिक पातळीवर अनेक पदे भूषवली. ते तेहरान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यागत प्राध्यापक आहेत. संयुक्त राष्ट्रातही झरीफ यांनी इराणी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. नंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या निःशस्त्रीकरण आयोगाचे अध्यक्ष झाले. ‘इराणिनियन जर्नल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ व ‘इराणियन फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकांचे ते संपादक होते; २००२ ते २००७ या काळात ते संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधी होते. २०१३ मध्ये ते इराणचे परराष्ट्रमंत्री झाले. त्यापूर्वी ते काही काळ अमेरिकेत इराणचे राजदूत होते. मोहम्मद जावद झरीफ यांनी राजीनामा देण्यापूर्वी ऑगस्ट २०२४ दरम्यान इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.

अण्वस्त्र नियंत्रण समझोता

[संपादन]

हा समझोता करताना त्यांनी ‘स्माइल डिप्लोमसी व झीरो टेन्शन डिप्लोमसी’ वापरली. झरीफ यांना हा करार करणे शक्य होण्याचे कारण म्हणजे त्यांना अमेरिकी संस्कृती माहिती होती व त्यांचे अमेरिकी नेत्यांशी थेट संबंध होते.

राजकारणीाचे मर्म सांगताना झरीफ यांनी म्हणले आहे, की जो वातावरणातील अस्वस्थता आपल्या हास्याआड दडवून वाटाघाटी करू शकतो, तो खरा राजकारणी. त्यांच्या या व्याख्येस ते जागले.