बौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्व
बौद्ध धम्मात पौर्णिमेंचे महत्व :- बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्यसाधारण महत्व आहे.जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो.चंद्राचा आकार पुर्ण वाटोळा असतो. आणि त्याचा प्रकाशही आपणाला सुखावत असतो.त्याच प्रमाणे सागराला भरती येते.भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप(आप म्हणजेच पाण्याचा) तेज,वायुआणि पृथ्वीचा सबंध येणे.त्याच प्रमाणे ज्या धातुंचे आपले शरीर बनले आहे.त्यामध्ये हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा या मध्ये अंतर्भाव होतो.या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्शण शक्तीमुळे व उपोसथ व्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खुपच फायदा होतो.मानवाने कुशल कम्म केले तर मानवाला कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळण्यासाठी नैतिक व्यवस्थाही कुशल असावी लागते.कम्म हे नैतिक व्यवस्था राखतात.तर,कम्म हे मानवांकडुन केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवांवरच हा भार सोपविला गेला आहे.तेव्हा मानव हाच केंद्रबिदु असल्याने मानवाने कुशल कम्म केले तर मानवता सुखी होईल .त्यासाठी बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्माचरण करणे तितकेच गरजेचे आहे. पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्न वंदना,त्रिशरण-पंचशिल इ.ग्रहण केले जाते.उपोसथ व्रत पाळले जाते.या दिवशी बुद्ध विहारात जाऊन तथागतांना अगरबत्ती ,मेणबत्ती लावून ,पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो.बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते.भंते कडुन धम्मदेसना ग्रहण करून त्यांना भोजनदान ,संपत्तीदान केले जाते. शक्य झाल्यास चिवरदान करावे ते पवित्र मानले जाते. तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणी मधिल धम्म जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासुन महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेंचाच दिवस कारणीभुत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक -उपासिकांना पौर्णिमेचे महत्व अपरंपार आणि अपुर्व असेच आहे.पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्र पक्षिय पंधरावा दिवस होय.या दिवशी चंद्रमा पुर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो.पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपुर्ण जीवनाचे एक प्रतिक म्हणुन मानले गेले आहे.सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्धजीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणुन मानला गेला आहे.पुर्ण चंद्राचा प्रकाश स्पश्ट व शीतल असतोच,परंतु शांत व आल्हाददायकही असतो.चंद्र प्रकाशाने शरिराला दाह होत नाही.उलट तो सुखकारक व मन उल्हासित करणाराच असतो. पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे.त्यामागे अनेक महत्वपुर्ण प्रसंगाचा इतिहास आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपुर्ण जीवनचरित्र होय.पौर्णिमेचे महत्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते.हवा गतीमान होते.सुर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा अन् उष्णतेचा लाभ अविरत 36 तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो.त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार,उत्तेजीत वातावरण मानवी जीवनाला,प्राणिमात्राला पोशक असते पृथ्वी,आप,तेज व वायु या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणिमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत, जगतगुरू भगवान बुद्ध हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेततथागतांचा जन्म,गृहत्याग,तपष्चर्या, ज्ञानप्राप्ती,धम्मप्रचार -प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते.वर्षातील एकूण 12 पौर्णिमेंचे महत्व खालिल प्रमाणे आहे.
1) चैत्र पौर्णिमा :- या पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी उरूवेला येथील निरंजना नदीच्या काठी असलेल्या वटवृक्षाखाली सुजाता नामक नगरश्रेश्ठीच्या कन्येकडुन खिरीचे दान स्विकारून वैराग्य मार्गाची समाप्ती केलीज्या सोन्याच्या पात्रातुन खीर आणली होती ते पात्र नदीच्या प्रवाहात फेकुन दिलेआणि मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिषेने वाहत जाईल अषी कसोटी लावली.आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिषेने जाऊन काळसर्पाच्या गुहेत बुडाले.त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणीत होवुन बुद्धगयेस त्यांनी चिंतन मननासाठी प्रयाण केले.
2) वैषाख पौर्णिमा :- लुंबीनी वनात इ.स.पुर्व 563 साली, शुक्रवार दिनी, विशाखा नक्षत्री,वैषाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. तो जयंतीदिन बौद्धजगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो.याच वैषाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळवृक्षाखाली 4 आठवडे चार पायऱ्यांनी चिंतन - मनन केल्यामुळे ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यकसंम्बुद्धत्व मिळवु शकले.आणि वयाच्या 80 व्या वर्षी मल्लांची राजधानी असलेल्या कुशीनारा येथे शाल वृक्षाखाली महापरिनिर्वाणपदी पोहोचले.
3) ज्येश्ठ पौर्णिमा :- सिद्धार्थ गौतमाचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी दंडपाणी नावाच्या शाक्य राजाची मुलगी यशोधरा हिच्याशी झाला.ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती.सिद्धार्थ गौतमास विसावे वर्ष लागले असतांना सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त केल्या नंतर त्याला राजा शुद्धोधनाने शाक्यांच्या संघात प्रवेश करण्यास सांगीतले.शाक्यसंघ, पुरोहितांनी शाक्यांच्या असलेल्या संथागारात सिद्धार्थाचा अंतर्भाव करून त्यांच्या कडुन सर्व नियमांचे पालन करण्याची शपथ दिली.
4) आषाढ पौर्णिमा :- (1) या पौर्णिमेदिनी महामायेच्या कुशीत बोधीसत्व गर्भधारणा रूपाने प्रवेश करतात.या आनंददायी घटनेला ‘‘गर्भ मंगलदिन’’ असे म्हणतात.(2) रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झालेल्या वादा बाबत संघसेनापतीने केलेल्या युद्ध घोषणेस विरोध करून शांततेने प्रष्न सोडवण्याचा सल्ला दिला.परंतु संघाच्या नियमनामुळे शिक्षा म्हणुन त्यांनी गृहत्याग केला. (3) बुद्धगया येथे संम्बोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथ येथील मृगदायवनात पंचवग्गीय भिुक्खुंना धम्मदिक्षा देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले.(4) भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे पहिला वर्ग गृहस्थी अथवा सांसारिक उपासकांचा तर दुसरा वर्ग भिक्खु संघाचा.संघ ही भिक्खुंची संघटना,भगवंतांनी आपल्या अनुयायांचा एक संघ किंवा मातृभावाने एकत्रित आलेला समुदाय बनविला.
5) श्रावण पौर्णिमा :- वाराणशी मध्ये काष्यप कुटुंबात तिन भाऊ होते.ते उच्चविद्या विभुषीत कर्मठ धार्मिक जीवन जगत होते.त्या तिन भावांची नांवे 1) उरूवेला काष्यप यांचे पाचशेअनुयायी 2) नदी काष्यप यांचे तिनशे व 3) गया काष्यपाचे दोनशे असे जटील अनुयायी होते. ते सर्व फल्गु नदीकाठी एकत्रित राहत असत.तथागतांनी एक रात्र उरूवेला काष्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. काष्यपाने येथे एक नागराज मुचलिंद नावाचा आम्हास येऊन त्रास देत असल्याचे सांगीतले.तेव्हा तथागतांनी तो मला त्रास देणार नाही असे सांगुन एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली.नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे काष्यपास माहित नव्हते.नागराज मुचलिंद याने काष्यपा ऐवजी तथागतांचा शांत,प्रसन्न आणि करुणामयी चेहरा पाहुन तो नतमस्तक झाला.तो त्यांची पुजा करू लागला.काष्यपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन काष्यप बंधुंना आर्यअष्टांगीक मार्ग सांगितला.तेव्हा तो प्रसन्न होऊन त्याच्यासहित त्याच्या बंधुनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनीही धम्माची परिव्रज्या घेतली.
6) भाद्रपद पौर्णिमा :- (1) श्रावस्तीचे राजे प्रसेनजित यांना तथागत आल्याचे कळले तेव्हा त्याने आपले दुःख,चिंता तथागतांना सांगीतली.तथागतांनी त्यांना धम्म समजावुन सांगितला.भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकुन तो सद्गदीत झाला.त्याने तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवुन आपल्या कुटुंबासह उपासक झाला(2)तथागत राजगृह येथे राहत असताना राजा शुद्धोधनास आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता कालुदायीन यास तथागतांकडे पाठविले.त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिलवस्तु येथे आले.राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले.त्यांचे सौंदर्य,गाभिर्य,तेज पाहुन ते थक्क झाले.तथागतांनी माता-पित्यास धम्मदेसना दिली.आणि यशोधरेस भेटण्यास गेले.तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता तथागतांनी राहुलला धम्मदेसना देऊन धम्माचा वारसा देऊन संघात सामिल केले.
7) आष्विन पौर्णिमा :- भिक्खु संघाच्या वर्षावासाची या दिवशी समाप्ती होऊन संघ धम्म प्रचार अन् प्रसारासाठी गावोगावी जाऊ लागले.याच वेळी तथागत न्यग्रोधारामात राहत होते.महाप्रजापती गौतमीने आपली संघ प्रवेशाची इच्छा भगवंतांस सागीतली.भगवंतांनी त्यास नकार दिला. तेव्हा ती अश्रु ढाळीत निघुन गेली.परंतु तिचा तो निर्धार कायम होता.जेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते तेथे महाप्रजापतीने आपल्या शाक्य कुळातील पाचशे स्त्रियांसह मुंडण करून पितवस्त्रे धारण करून तथागतां समोर पुन्हा तिच विनंती केली.महाप्रजापतीने मोठया अट्टहासाने स्वतःबरोबर आलेल्या पाचशे स्त्रियांनाही तथागतांस त्यांनीच दिलेल्या व्यावहारिक आठ नियमांस मान्य करून स्त्रियांना संघात सामिल करून घेण्यास भाग पाडले.
8) कार्तिक पौर्णिमा :- बुद्धांचे संघसेनापती यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणुन या पौर्णिमेस सद्गुणांचे स्मरण दिवस असे म्हणले जाते.या पौर्णिमेस ऋतुपुर्व पौर्णिमा म्हणतात.यावेळी प्रकाशाची पुजा केजी जाते.घरोघर असंख्य दिप उजाळले जातात उपोसथव्रत करून भिक्खु संघास भोजनदान देऊन त्यांच्या कडुन धम्मदेसना ग्रहण केली जाते.
9) मार्गशिर्ष पौर्णिमा :- ब्रम्हसंहपत्तीची विनंती मान्य करून तथागतांनी आपल्या सिद्धांतानुसार असलेली धम्मशिकवण जगाला देण्याचे मान्य केले. अनाथपिंडकाने श्रावस्ती येथील जेतवन सोने भुईवर पसरवुन जेत्याकडुन घेऊन तथागतांस दान म्हणुन अर्पण केले.त्याच प्रमाणे दरोडेखोर अंगुलीमालाला धम्मदेसना देऊन संघात सामिल करून घेतले.
10) पौष पौर्णिमा :- राजा बिंबीसार याने राजगृह येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. वेळुवन भिक्षुसंघास दान म्हणुन अर्पण केले.यावेळी तथागतांनी वेळुवनात 45 वा वर्षावास केला.या निमित्त मोठया उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
11) माघ पौर्णिमा :- वैशाली येथील सारंदस्य चैत्य विहारात तथागतांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली.या पौर्णिमेस स्मरणदिन असेही म्हणतात.
12) फाल्गुन पौर्णिमा :- शुद्धोधन राजाच्या विनंतीनुसार आणि कपिलवस्तु मधिल सर्व नागरिकांच्या सांगण्या नुसार भगवान बुद्धांनी आपले पुत्र राहुल आणि भाऊबंद यांना संघात सामिल करून घेतले.
अशा त-हेने वर्षाच्या बारा पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांच्या महत्वपुर्ण जीवनाशी अत्यंत निगडीत होत्या. त्याचप्रमाणे धम्मासंबंधीच्या अनेक घटनांचा या पौर्णिमांशी संबंध असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासक - उपासिकांनी उपोसथ व्रत पाळुन धम्माचरण करावे.ते येणे प्रमाणे
उपासकांचे उपोसथ व्रत :- दर पंधरवडयाला पौर्णिमा,अमावस्या,चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी अष्टांगउपोसथ व्रताचे पालन करावे. उपासकांनी ते येणे प्रमाणे पालावे प्रथम पंचशिलाचे म्हणजेच विशुद्धी मार्गाचे पालन करणे 1) प्राणी हिंसा न करणे 2) चोरी न करणे 3) खोटे न बोलणे,मिथ्याचार न करणे 4) मद्यपान न करणे 5) ब्रम्हचर्येचे पालन करणे 6) अवेळी भोजन न करणे 7) माला धारण न करणे व सुगंधी द्रव्य न लावणे 8) साध्या खाटेवर किंवा जमिनीवर काही अंथरूण निजणे.हया अष्टांगउपोसथ व्रताचे म्हणजेच आठ नियमांचे पालन करणे ही आजिविका महिन्यातील वरिल प्रमाणे उल्लेखलेल्या पौर्णिमा,अमावस्या,चतुर्थी,आणि पंचमीच्या दिवशी धारण करावी. धम्माबाबत वाचन,चिंतन-मनन करून शुद्धी प्राप्त करून घ्यावी आपल्या कुटुंबात अथवा विहारात धम्मग्रंथाचे वाचन करून पुण्यसंचय करावा.ध्यान साधना करून मन सतत जागृत ठेवावे.