Jump to content

जाबालोपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाबाल उपनिषद् शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. यात एकूण सहा खंड आहेत. पहिल्या खंडात भगवान बृहस्पती आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे ज्यात प्राणविद्येचे विवेचन केलेले आहे. याज्ञवल्क्य यांनी प्राणाचे स्थान, ब्रह्मस्थान आणि देवयजनाचे एकमात्र स्थान ‘अविमुक्त’ (ब्रह्मरंध्र-काशी) असे म्हणले आहे. तिथेच रूद्रदेव विद्यमान असतात आणि अंतिम क्षणी तारक ब्रह्माचा उपदेश देऊन जिवांना विमुक्त करतात. दुसऱ्या खंडात अत्रि मुनी आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे ज्यात ‘अविमुक्त’ क्षेत्रास दोन्ही भुवयांमध्ये सांगितलेले आहे. त्याच्या उपासनेमुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे इतरांना आत्मज्ञानाचा उपदेश देणे शक्य होते. तिसऱ्या खंडात याज्ञवल्क्य यांनी अमृतप्राप्तीच्या उपाय सांगितलेला आहे आणि तो आहे शतरुद्रीय जपाचा. साधक त्यामुळे मृत्यूवर विजय प्राप्त करू शकतो. चौथ्या खंडात विदेहराजाने संन्यासासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर याज्ञवल्क्य ऋषींनी संन्यास ग्रहण करण्याचा क्रम, त्याची विधी-व्यवस्था, करणीय कृत्ये इत्यादींचे वर्णन केलेले आहे. पाचव्या खंडात पुन्हा अत्रि मुनींनी संन्याशाचे यज्ञोपवीत, वस्त्र, मुंडन, भिक्षा इत्यादी विषयांवर याज्ञवल्क्यांकडून मार्गदर्शन मिळविलेले आहे. याचा निष्कर्ष असा आहे की संन्याशाने मन-वाणीला पूर्णपणे विषय-विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. सहाव्या खंडात प्रसिद्ध संन्याशांच्या - जसे संवर्तक, आरुणी, श्वेतकेतू, दुर्वासा, ऋभू यांच्या आचरणाची समीक्षा केलेली आहे आणि शेवटी दिगंबर परमहंसाची लक्षणे सांगितलेली आहेत.