छगन चौगुले
छगन चौगुले | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १८ सप्टेंबर १९५६ |
जन्म स्थान | कारूंडे, नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र |
मृत्यू | २१ मे, २०२० |
मृत्यू स्थान | मुंबई |
संगीत साधना | |
गुरू | शंकरराव जाधव-धामणीकर , प्रल्हाद शिंदे,जनार्दन साठे |
गायन प्रकार | लोकगीत, भक्तीगीत |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | मराठी लोकसंगीत |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९५६ -२०२० |
गौरव | |
पुरस्कार | लावणी गौरव (२०१८) |
छगन चौगुले ( इ.स. १९५६ :कारूंडे - नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर , महाराष्ट्र - २१ मे, २०२०) हे एक मराठी लोकगीत गायक होते.[१][२] सोलापूर जिल्हयातील नातेपुतेजवळील कारुंडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामचंद्र चौगुले उपजीविकेच्या शोधात मुंबईत आले. नाथपंथी डवरी समाजाचे असल्यामुळे त्यांचे वडील खंडोबा, यल्लमा, भराड्याची पदे गात असत. छगन चौगुलेंनी आपल्या वडिलांकडून गोंधळ्याची गायकी शिकायला सुरुवात केली. त्यानंतर ते शंकरराव जाधव-धामणीकरांसोबत त्यांच्या संचात कार्यक्रम करू लागले. त्यानंतर त्यांनी जनार्दन साठे यांच्यासोबत काम केले. साठे यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःचा संच निर्माण केला. त्यांनी पारंपरिक गोंधळाचा साज बदलला. खंडोबा, देवीच्या गाण्यांना नृत्यनाट्याचे स्वरूप देऊन ते लोकांपर्यंत पोहोचवले. पारंपरिक विधीनाट्याला रंजकनाट्याचा बाज दिला.
विंग्ज कंपनीने छगन चौगुले यांच्या बहुतांश कॅसेट्स प्रसिद्ध केल्या. स्वतः उत्तम गीतकार, हार्मोनियम वादक, खंजिरीवादक आणि गायक असलेल्या छगन चौगुले यांनी कॅसेट्स गायकीच्या क्षेत्रात आपले अधिराज्य गाजविले. पारंपरिक जागरणाचा बाज आत्मसात केलेल्या छगन चौगुले यांच्या प्रस्तुतीला आधुनिकतेचा स्पर्श असायचा.
श्राव्यदेवी गीते, खंडोबा, भैरवनाथ गीते छगन चौगुले यांनी दृश्राव्य केली. पारंपरिक जागरणाला त्यांनी सादरीकरणाच्या कौशल्याने नवे रूप दिले. अर्थात, असे असले तरी खंडोबाच्या जागरणाचा त्यांनी कधी ऑर्केस्ट्रा होऊ दिला नाही. भैरवनाथ, काळूबाई, नवनाथ अशा देव-देवतांसोबत त्यांनी काही सामाजिक कथाही कॅसेट्सद्वारे सादर केल्या.
छगन चौगुले यांनी सुमारे ३०० कॅसेटसाठी रेकॉर्डिंग केले. त्यांचे 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली' हे गाणे खूप गाजले. ते मुंबई विद्यापीठातही विद्यार्थ्यांना शिकवत होते.
छगन चौगुले यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांची कला सादर करण्याची कौशल्य अफलातून होते. मुळातले ते जागरण गोंधळी होते. छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते लिहिली आणि आपल्या दमदार आवाजात गायली.
छगन चौगुले यांचे खूप मोठे योगदान महाराष्ट्रातील लोकसंगीतात आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यागत प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले जागरण, गोंधळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले.[ संदर्भ हवा ]
त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला व मुंबईतील सेव्हन हील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच २१ मे २०२० रोजी मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.[ संदर्भ हवा ]
काही सुप्रसिद्ध गाणी
[संपादन]- खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
संदर्भ
[संपादन]- ^ "folk-artist-chhagan-chougule: Latest folk-artist-chhagan-chougule News & Updates, folk-artist-chhagan-chougule Photos & Images, folk-artist-chhagan-chougule Videos |". Maharashtra Times. 26 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "'नवरी नटली' फेम छगन चौगुले यांचं निधन". Loksatta. 26 मे 2020 रोजी पाहिले.
3.शब्दरचना "Sanjay Gaikwad" ह्या youtube चॅनेल ने दिलेल्या comment मधून घेतली आहे.