Jump to content

शेळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेळी दूध देणारा सस्तन प्राणी आहे. समखुरी गणाच्या(पायांवरील खुरांची संख्या सम असते अशा पाण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणाच्या) बोव्हिडी कुलातील पोकळ शिंगांच्या व रवंथ करणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे

इतर

प्राचीन ग्रंथांमध्ये

[संपादन]

भावप्रकाश या वेदकालीन वैदयकीय गंथामध्ये शेळी सर्व तऱ्हेचा झाडपाला खात असल्यामुळे तिचे दूध रोगनाशक, विशेषतः क्षयरोगावर गुणकारी, आहे असा उल्लेख आहे. जैमिनी सूत्रात यज्ञामध्ये बळी देण्याविषयी विशिष्ट पशूचा उल्लेख नसल्यास बोकड (अजापुत्र) हा प्राणी  बळी देण्याचा आहे असे मानावे असे लिहिले आहे. शेळीच्या दुधापासून लोणी काढीत असत असा उल्लेख कौटिलीय अर्थशास्त्रात आहे. शेळी हे अग्निदेवतेचे वाहन आहे.

शारीरिक माहिती

[संपादन]

जगातील शेळ्यांची संख्या

[संपादन]

जागतिक अन्न व शेती संघटनेच्या आकडेवारीनुसार १९७७ च्या सुमारास भारतात सर्वाधिक शेळ्या होत्या. मात्र १९८२ साली जगात  ४७ कोटी २७ लाख शेळ्या होत्या. त्या मुख्यतः आफ्रिका, इराण, भूमध्य समुद्रालगतचे प्रदेश व भारतीय उपखंडातील प्रदेश येथे होत्या. त्या वर्षी शेळ्यांची संख्या जास्त असणारे देश व तेथील शेळ्यांची संख्या अशी होती : चीन ७ कोटी ८४ लाख, भारत ७ कोटी २० लाख, तुर्कस्तान १ कोटी ८९ लाख, नायजेरिया १ कोटी ५६ लाख, इराण १ कोटी ३८ लाख वगैरे. २००३ सालच्या आकडेवारीनुसार भारतात १२ कोटी ४३ लाख शेळ्या होत्या.

दरवर्षी ४२ टक्के शेळ्यांची कत्तल होऊनही १९५१७७ दरम्यान दरवर्षी शेळ्यांची संख्या १० लाखांनी वाढत गेलेली दिसते. उलट मेंढ्यांची संख्या तीच राहिली. प्रजोत्पादनाचा जास्त वेग (जुळी व तिळी होण्याचे जास्त प्रमाण), उत्तम रोगप्रतिकारक्षमता आणि शेळीचे मांस व दूध यांना सतत असलेली मागणी या कारणांनी त्यांची संख्या वाढत गेली. सरासरीने शेळीचे करडू देण्याचे प्रमाण १५० टक्के (मेंढीचे ७५ टक्के) असते. तसेच शेळी दूध देण्याच्या १५० ते २०० दिवसांत (दुग्धकालात) रोज अर्धा ते एक लिटर दूध देते, तर मेंढीचा दूध देण्याचा काळ १०० ते १५० दिवसांचा असून ती दररोज जास्तीत जास्त अर्धा लिटरच दूध देते. मेंढ्या व अन्य मोठया जनावरांपेक्षा शेळ्या जीवाणू व कृमी यांना अगदी कमी बळी पडतात. पर्जन्यमान व चाऱ्याची विपुलता या भौगोलिक कारणांनी शेळ्यांची संख्या झपाटयाने वाढते उदा., भारताचा ईशान्य प्रदेश.

पैदास करण्याचे प्रकार

[संपादन]

शेळ्यांची पैदास घरगुती वापराचे दूध, तसेच मांस, केस (उदा., पश्म) व प्रजोत्पत्ती यांसाठी केली जाते. उदा., लडाख व लेह येथील झंस्कर, रूपशू व चॅनथाँग आणि हिमाचल प्रदेशातील लाहोल व स्पिती या निर्जन व निर्जल खोऱ्यांमध्ये पश्म देणाऱ्या सु. १ ५ लाख पश्मिना शेळ्या  पाळलेल्या आढळतात. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, तसेच गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर यांचा काही भाग या सिंधु  गंगा खोऱ्याच्या पट्यात जमनापारी, बीटल, बारबारी, अलवरी व सिरोही या दुधाळ शेळ्या आढळतात. दक्षिण भारतात मांस व दूध  (उदा., केरळातील मलबारी) यांसाठी शेळ्या पाळतात. बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड व सिक्कीम येथे जास्त करडे देणाऱ्या शेळ्या मांसोत्पादनासाठी पाळतात. पैकी आसाम हिल बीड (गोट) व ब्लॅक बेंगॉल नावाच्या शेळ्या लहान चणीच्या असून बहुधा त्यांना वर्षातून दोन वेळा जुळे वा तिळे होते.

शेळीपालनाची कारणे

[संपादन]

चीन, यूरोपातील देश व उ. अमेरिका येथे शेळ्या मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी पाळतात. अमेरिकेत दुग्धशाळेत ४०० पर्यंत शेळ्या असतात. मात्र सर्वसाधारणपणे त्या दुधाची कौटुंबिक गरज भागविण्यासाठीच पाळण्याची प्रथा जगभर आढळते. दुग्धोत्पादनाच्या बाबतीत गायीपेक्षा शेळी कमी प्रतीची असली तरी शारीरिक आकारमानाचा विचार करता दुधाळ शेळ्या गायीपेक्षा किती तरी अधिक दूध देतात. समशीतोष्ण कटिबंधातील शेळ्या पचण्याजोग्या दर १०० किग्रॅ. अन्नापासून १८५ किग्रॅ. दूध तयार करू शकतात तर गायी एवढ्या अन्नापासून १६२ किग्रॅ. दूध तयार करतात. शिवाय ओसाड निर्जल प्रदेशांत त्या गायीपेक्षा सरस आहेत. मात्र वर्षभर सतत दुग्धोत्पादन करण्याच्या दृष्टीने शेळी कमी प्रतीची आहे. १९८२ साली शेळ्यांच्या दुधाचे जागतिक उत्पादन ७६,९५,००० मेट्रिक टन तर भारतातील उत्पादन ९,५०,००० मेट्रिक टन झाले होते. मध्य व्हेनेझुएला, ईशान्य कोलंबिया, अरब देश व भारतीय उपखंड येथे शेळ्या दूध व  मांस यांसाठी पाळल्या जातात. भारतात बंगाल,उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू  , मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र इ. राज्यांत शेळ्या अधिक प्रमाणात पाळल्या जातात.


वंश विषयक

[संपादन]

भारतात शेळ्यांच्या २३ जाती आढळतात.

निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता

[संपादन]

भौगोलिक हवामानाशी जुळलेली शेळी प्रजाती त्या प्रदेशात, हवामानात जास्त टिकणारी असते.

भारतीय शेळ्या

[संपादन]
  • उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांत काश्मिरी, चांगथांगी, चेंगू किंवा पश्मिना शेळ्या आढळतात.
  • पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागांत जमुनापरी, बारबेरी, बीटल या प्रजातीच्या शेळ्या आहेत.
  • गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या कोरड्या भागांत कच्छी, काठेवाडी, जाखराणी, झालावाडी, मारवाडी, मेहसाणा, बेरारी, सिरोही या प्रजाती आढळतात.
  • दक्षिणी भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांत उस्मानाबादी, कन्नीआडू, मालवारी, संगमनेरी, सुरती या प्रजाती जास्त दिसतात.
  • पूर्व भारतात आसाम हिल, गंजाम, ब्लॅक बेंगॉल या प्रमुख शेळ्या आहेत. यापकी ब्लॅक बेंगॉल शेळी पश्चिम बंगालमध्ये आढळते. तिची कातडी मऊ असल्याने परदेशात तिला चांगली मागणी आहे.

महाराष्ट्रातील शेळ्या

[संपादन]

महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, कोकण कन्याळ, बोएर, संगमनेरी , काठेवाडी शेळ्या आढळतात.

  • उस्मनाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागांत आढळतात.उस्मानाबादी शेळीचा रंग प्रामुख्याने काळा असतो. कान लोम्बकळणारे, शिंगे मागे वळलेली, कपाळ बहिर्वक्र असते. उंची ६५ ते ७० सेमी असते. जन्मतः वजन २.५ किलो व पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन ३० ते ३५ किलो व बोकडाचे वजन ४५ ते ५० किलो.
  • संगमनेरी शेळीचा उगम अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेर येथील आहे. ती दूध व मांसासाठी प्रसिद्ध आहे. रंग प्रामुख्याने पांढरा.
  • उस्मानाबादी शेळीचा उगम उस्मानाबाद येथील असून ती मांसासाठी प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ५० टक्केपर्यंत आहे.
  • कोकणातील उष्ण, दमट हवामान व जास्त पावसाच्या प्रदेशात तग धरण्याची क्षमता असलेली कोकण कन्याळ शेळी विकसित करण्यात आली आहे. तिच्या अंगावर काळा रंग व त्यावर पांढरे पट्टे असतात. ही शेळी अतिपावसातही तग धरू शकते. तिच्यामध्ये रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

काठेवाडी शेळ्या,: ह्या शेळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत व जळगाव येथील चाळीसगाव मध्ये भरपूर प्रमाणात भेटतात.

उपयोग

[संपादन]

पश्मिना शेळी उच्च प्रतीच्या तलम पश्मिना लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. शेळीला गरीबाची गाय असे संबोधतात. उस्मानाबादी शेळीचा उपयोग मांस मिळवण्यासाठी होतो.

आर्थिक महत्त्व

[संपादन]

शरीराने निरोगी, चपळ, काटक, पुढील दोन पायांत जास्त अंतर असलेली आणि मोठी कास असलेली शेळी पैदास करण्यासाठी चांगली समजली जाते. एका शेळीला २४ तासांत ५-६ किलो चारा लागतो.

हेही बघा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

कुतूहल : शेळ्यांमधील आजार लोकसत्ता

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]