Jump to content

करण (ज्योतिषशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करण ही भारतीय ज्योतिषशास्त्रातील एक संकल्पना आहे.

ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा मुहूर्त चांगला की वाईट हे ठरविण्यासाठी योगांचा आधार घेतला जातो. कालमापनाचे शेवटचे अंग म्हणजे करण होय. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण होय. एका तिथीमध्ये पूर्वार्धात एक व उत्तरार्धात दुसरे अशी दोन करणे होतात. सूर्याच्या पुढे ६ अंश चंद्र जाण्यास जो वेळ लागतो त्यास करण असे म्हणतात. एकूण करणे ११ असून त्यांचे दोन प्रकार आहेत. ११ पैकी बव(१), वालव(२), कौलव(३), तैतिल(४), गर(५), वणिज(६), विष्टी/भद्रा(७) या पहिल्या सात करणांना "चर" करणे असे म्हणतात, तर उरलेल्या शकुनी, चतुष्पाद, नाग व किंस्तुघ्न या चार करणांना "स्थिर" करणे म्हणतात.

पहिली सात करणे म्हणजे चर करणे ही शुक्ल प्रतिपदेच्या उत्तरार्धापासून क्रमाने सुरू होतात व त्यानुसार, कृष्णपक्षातील चतुर्दशीच्या पू्र्वार्धापर्यंत एकूण ५६ करणे पुन्हा पुन्हा येतात. नंतर कृष्णपक्षातील चतुर्दशीच्या उत्तरार्धाला शकुनी, अमावस्येच्या पूर्वार्धाला चतुष्पाद व अमावस्येच्या उत्तरार्धाला नाग ही करणे येतात. शुक्ल पक्षाच्या पूर्वार्धाला किंस्तुघ्न करण असते.

तिथीवरून करण काढण्याची रीत

[संपादन]

ज्या तिथीचे करण काढायचे असेल त्या तिथीसह शुक्ल प्रतिपदेपासून मोजून जी संख्या येईल तिच्या दुपटीतून १ वजा करून ७ ने भागावे. जी बाकी उरेल तोच अंक त्या तिथीच्या उत्तरभागीचे करण समजावे.

उदा० कृष्णपक्षातील नवमी ही शुक्ल प्रतिपदेपासून २४वी येते. तिची दुप्पट ४८. उणे १ केल्यावर ४७. ४७ भागिले ७, बाकी उरते ५. ५वे करण गर, म्हणून कृष्ण नवमीस उत्तरभागी गर करण असेल.