सदस्य:सुरभी मिलन उमेश वाणी
भाषांतरातील भाषाविषयक संदर्भांचे महत्त्व भाषांतर करताना भाषिक संदर्भ महत्वाचे असतात. भाषा हा घटक समाजाचा अविभाज्य घटक आहे. भाषा हे विचारविनिमयाचे साधन आहे, साहित्याचे माध्यम आहे. प्रत्येक भाषा ही तिच्याशी निगडीत संस्कृती दर्शविते. दोन भाषांमध्ये काही समान गोष्टी असतात. तर काही ठिकाणी वैधर्म्यही असते. भाषा ही संस्कृतीवाचून असत नाहीच तर ती संस्कृतीचे एक अंग असते. प्रतेक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. कोणता शब्द कोणत्या संदर्भात वापरावा? कुणी काय बोलावे ? कुणी कुणाशी बोलताना काय मर्यादा बाळगाव्यात? हे प्रत्येक भाषेत ठरलेले असते.प्रत्येक भाषेची घडण वेगळी असते. व्याकरणिक नियम वेगळे असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेता भाषांतर करताना भाषांतरकर्त्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतात.
डॉ. विलास सारंग यांनी भाषांतराचा विचार करताना सांगितले आहे की, “ मराठी ही भाषा संश्लेषणात्मक आहे आणि इंग्रजी ही विश्लेषणात्मक आहे.” म्हणजेच वेगवेगळ्या कल्पना व्यक्त करताना मराठीत मूळ शब्दाचे स्वरूप बदलते, तर इंग्रजीत मूळ शब्दाबरोबर इतर शब्द वापरले जातात. व्याकरणिक भाषेत सांगायचे तर मराठीमध्ये मूळ शब्दाला प्रत्यायची जोड द्यावी लागते. आणि ही जोड दिल्यानंतर मूळ शब्दाचे रूपही बदलते. इंग्रजीत असे होत नाही. उदा . ‘माणूस’ या मूळ शब्दाला ‘ला’ हा प्रत्यय जोडल्यास ‘माणसाला’ असा शब्द तयार होतो.इथे ‘ला’ हा प्रत्यय ‘माणूस’ या शब्दाला प्रत्यक्ष जोडला गेला. शिवाय ‘माणूस’ या मूळ शब्दाचे रूप ‘माणसा’ असे झाले. इंग्रजीत मात्र ‘man’ या शब्दाला ‘to’ हा प्रत्यय जोडला जात नाही. शिवाय ‘man’ या शब्दाचे मूळ रूपही बदलत नाही. माधव आचवल यांच्या मते, “ प्रत्येक भाषेची व्याकरणाची एक स्वाभाविक चौकट असते. वाक्यरचना, शब्दरचना, या बाबतीत प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे व्याकरणिक नियम असतात. मराठीमध्ये वाक्याची रचना कर्ता, + कर्म ,+ क्रियापद अशी असते. उदा. मी आंबा खातो./ मी पुस्तक वाचले. पण इंग्रजीमध्ये कर्ता + कर्म . उदा.
I eat a mango./ I read a book. वाक्यरचनेतील हा फरक लक्षात घेतला नाही तर ‘ मी खातो आंबा.’ असे विस्कळीत भाषांतर होईल.
प्रत्येक भाषेची मांडणी ठराविक असते. वाचताना कानांना आणि मनाला जाणवणारी असते. भाषांतरात तशी जाणवायला हवी.
“Ram returned to Ayodhya, after the monkeys had taken Lanka.” या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मूळ इंग्रजी वाक्यरचनेप्रमाणेच ‘ राम अयोध्येला परतला, वानरांनी लंका घेतल्यावर.’ असे केल्यास ते विस्कळीत ठरेल. हे भाषांतर मराठी वाक्यरचनेप्रमाणे ‘ वानरांनी लंका घेतल्यानंतर, राम अयोध्येला परतला.’ असे होईल. मराठीत क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचानानुसार बदलताना दिसते. इंग्रजीत मात्र असे होत नाही. उदा. ती गेली. she went. तो गेला. He went. ते गेले. They went. त्या गेल्या. They went. हा फरक लक्षात घेतला नाही तर ‘ she went’ याचे भाषांतर ‘ ती गेली’ व ‘he went’ याचेही भाषांतर ‘तो गेली’ असे चुकीचे होण्याची शक्यता आहे. इंग्रजीमध्ये ‘A , An , The ’अशा आर्टिकल्सचा वापर केला जातो. परंतु मराठीत असा वापर नाही. उदा. she is a girl. याचे भाषांतर ‘ ती एक मुलगी आहे.’ असे न होता ‘ ती मुलगी आहे.’ असे होते. व्याकरणाचा मोठा प्रश्न भाषांतर करताना पडतो. म्हणूनच माधव आचवल म्हणतात, “ मूळ साहित्यकृतींचे अगदी शब्दशः भाषांतर करणे चुकीचे आहे. भाषांतर कर्त्याला मूळ भाषेतील सगळी वैशिष्ट्ये , रचना, अव्यये , क्रियापद इ.सारे विशेष माहित असणे आणि त्याने ते भाषांतरात जपणे अत्यंत गरजेचे असते.” मराठी भाषेतून हिंदीमध्ये भाषांतर करताना काही समस्या येतात. याला कारण या दोन भाषांमध्ये असलेला भेद होय. मराठीत तीन लिंग आहेत.(स्त्री.,पु.,नपु.) हिंदीत केवळ दोनच लिंग आहेत. (स्त्री., पु.) हे लक्षात घेतले नाही तर पुढीलप्रमाणे चूक होऊ शकते. उदा. किताब दी | याचे मराठीत भाषांतर ‘ पुस्तक दिले’ असे होईल. मराठीतील नपुसकलिंगाचे ज्ञान नसेल तर , ‘ पुस्तक दिला’ असे चुकीचे भाषांतर होऊ शकते. हिंदी व मराठीची वर्णमाला समान असली तरी हिंदीत ‘क’ व ‘ण’ चा वापर नाही. हिंदीतील ‘ तुलसी’ या शब्दाचे मराठीत भाषांतर करताना ‘तुळस’ असे करायला हवे. हिंदी व मराठीत दिसायला समान पण अर्थाने वेगळे असलेले कित्येक शब्द येतात. उदा. हिंदी –मराठी खत – पत्र, शिक्षा – शिक्षण, दरी – सतरंजी , खाली – रिकामा , धावा – हल्ला .
वरील हिंदी शब्दांचे ते ते मराठी अर्थ जाणून घेतले नही तर , भाषांतरात गमतीशीर घोटाळे होऊ शकतात. भाषेमध्ये येणारे म्हणी – वाक्प्रचार यामुळेही समस्या निर्माण होतात. अशावेळी त्या त्या अर्थाचा वाक्प्रचार शोधायला हवा. उदा. १)हिंदीतील ‘चुहे दौडना’ यासाठी मराठीत ‘पोटात कावळे ओरडणे’ असा वाक्प्रचार आहे. २) ‘बगल में छुरा शहर में ढिंडोरा’ यासाठी मराठीत ‘ काखेत कळसा गावाला वळसा’ असा वाक्प्रचार आहे. ३) ‘अंधा क्या जाने बसंत की बहार’ यासाठी मराठीत ‘गाढवाला गुळाची चव काय?’ असा वाक्प्रचार आहे. ४) ‘Empty vessel makes a greater noise’ यासाठी मराठीत ‘उथळ पाण्याला खळखळात फार’ अशी म्हण आहे. काही भाषांमध्ये असे वाक्यप्रयोग, शब्दप्रयोग असतात की त्यांना नेमके दुसऱ्या भाषेतील पर्यायी शब्द सापडणे कठीण जाते. ‘पुणे हे विद्येचे माहेर आहे’ या वाक्याचे भाषांतर कसे करणार? ‘ ताईच्या बांगड्या’, ‘माहेरची साडी’ या शब्दप्रयोगातून मराठी माणसाला जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ ‘bangles of sister’ असा भाषांतरातून व्यक्त होऊ शकत नाही. ‘माझे डोळे आलेत’ याचे भाषांतर ‘my eyes have come’ किंवा ‘मी शनिवार केला’ याचे भाषांतर ‘I made saturday.’ असे केल्यास मूळ अर्थ हरवून जातो.
बंगाली व मराठी भाषेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ‘पाणीदार डोळे’ , ‘पाणी दाखवणे’, ‘काहीच पाणी नसणे’ यातील ‘पाणी’ या शब्दाचा अर्थ ‘तेज’ असा होतो. पण बंगालीत मात्र ‘पाणी’ म्हणजे ‘निस्तेज, पुळचट, काहीच कणखरपणा नसणारी व्यक्ती / वस्तू. ‘सत्कार’ या शब्दाचा बंगालीतील अर्थ ‘अंत्यसंस्कार’असा होतो. ‘मानभंग’ या शब्दाचा मराठी अर्थ ‘अपमान / बदनामी’ असा आहे तर बंगालीतील त्याचा अर्थ ‘रुसलेल्या प्रेयसीची मनधरणी /विनवणी करणे’ असा होतो.अर्थातील ही भिन्नता लक्षात घेणे आवश्यक आहे.
भाषा ही परिवर्तनशील असते.तिची रूपे सतत बदलतात. जुन्या काळी ज्या अर्थाने एखादा वाक्यप्रयोग केला जात असेल, त्याचा तो जून अर्थ बदलेला असू शकतो. अशावेळी संदर्भ लक्षात घेऊन भाषांतर करणे योग्य ठरते. उदा. my old man has kicked the bucket. हे सतराव्या शतकातील इंग्रजी भाषेतील वाक्य आहे.त्याचा अर्थ ‘माझा म्हातारा संपला.’ असा होतो. हा संदर्भ लक्षात न घेतल्यास ‘माझ्या म्हाताऱ्याने बादलीला लाथ मारली’ असे चुकीचे भाषांतर होऊ शकते. मराठीत आदरार्थी संबोधन करण्यासाठी ‘तुम्ही, आपण’ असे वेगळे शब्द वापरले जातात. परंतु, इंग्रजीत अशी सोय नाही. उदा. where are you going? हे वाक्य लहान आणि मोठ्या व्यक्तींसाठी वापरले जाते. परंतु वडिलांसाठी ‘where are you going?’ या वाक्याचे शब्दशः भाषांतर केल्यास त्यातून अनादर व्यक्त होतो. अशाप्रकारे भाषांराच्या व्यवहारातील सर्वात मोठी भाषिक अडचण म्हणजे शब्दांच्या मागे असलेले संकेत होय.भाषांतर करताना केवळ शब्दांजवळ थांबून चालत नाही तर, शब्दांच्या / वाक्यप्रयोगाच्या माहे जे दृढ संकेत असतात तिथपर्यंत जावे लागते. त्या संकेतांना जवळ असणारे स्वभाषेतील संकेत शोधावे लागतात. असे केले तरच भाषांतरातही भाषेचे वैशिष्ट्य कायम राखता येते. त्या अभावी नुसते शब्दशः भाषांतर होण्याची भीती असते. असे भाषांतर उचित ठरणार नाही. ललित साहित्याची भाषा ही व्यवहार भाषेपेक्षा काही बाबतीत भिन्न असते. या भाषेला कथा , कादंबरी , नाटक , कविता अशा त्या त्या साहित्य प्रकारांचा संदर्भ असतो. कवितेची भाषा व कादंबरीची भाषा यातील फरक आपल्याला चटकन जाणवतो. व्यवहारात आपण एखादे वाक्य ज्या अर्थाने बोलतो तोच अर्थ तेच वाक्य साहित्यात वापरले असता अर्थ बदलेला आपल्याला दिसतो. कारण, साहित्याची भाषा ही सूचक असते. “हे उंबराचं फुल आज कुठून उगवलं?” गो.ब.देवल यांच्या ‘ संगीत शारदा’ या नाटकातील वाक्य. साहित्याच्या भाषेत नियमोल्लंघन केलेले असते. हे नियमोल्लंघन शब्द , पदबंध , वाक्य , अर्थ यांच्या पातळीवर केले आहे. उदा. ‘पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपतो कुणी काळोख’ ( मर्ढेकर)
समारोप =
भाषेची व्याकरणिक घडण ,शब्द , वाक्यरचना , म्हणी , वाक्प्रचार , इ.मुळे येणाऱ्या या समस्या लक्षात घेता भाषांतरकाराचे स्त्रोत व लक्ष्य भाषेवर चांगले प्रभुत्व असायला हवे. भाषेची व्याकरणिक घडण ,शब्द , वाक्यरचना , म्हणी , वाक्प्रचार , शब्दांमागे असलेले सामाजिक , सांस्कृतिक संकेत इ.ची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक भाषा ही त्या-त्या संस्कृतीची वाहक असते. त्या-त्या भाषेला ‘ सांस्कृतिक पृथगात्मता’ असते. हे समजून घेणे आवश्यक असते. तेव्हाच चांगले भाषांतर होऊ शकते.