चर्चा:सत्यवती
सत्यवतीची कथा
[संपादन]चेदी देशाचे उपरीचर वसुराजा हे अतिशय धर्मशील, सदाचारी होते. त्यांच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन इंद्राने त्यांना एक स्फटिकमय विमान भेट दिले होते. त्यामुळे वसुराजाला 'उपरिचर ' असेही नाव मिळाले. या राजाची धर्मपत्नी गिरिकाराणी ही पण अत्यंत सात्त्विक होती. उत्तम संतानासाठी या राजाराणीने व्रतस्थ राहून ब्रह्मचर्याचे पालन केले होते. या समयी लोकांना पीडा देणार्या श्वापदांची शिकार करण्यासाठी वसुराजाला दूर वनात जावे लागले. वनात असताना त्याला गिरिकाराणीचा संदेश आला की आपल्या व्रताची आतासमाप्ती झाली असून तिला रुतुकालही प्राप्त झाला आहे. हा संदेश मिळाला तेव्हा राजा शिकार संपवून पुष्पांनी बहरलेल्या झाडाखाली बसला होता. राणीचा संदेश मिळाल्यावर त्याला तिची तीव्र आठवण येऊन तो विलक्षण उत्तेजित झाला आणि त्याचे वीर्यस्खलन झाले. हे वीर्य व्यर्थ जाऊ नये म्हणून त्याने ते पानांमध्ये बांधून अभिमंत्रित केले आणि त्याने पाळलेल्या श्वेन पक्ष्याजवळ देऊन ते आपल्या राणीस देण्यास सांगितले. लगेच उड्डाण करून श्वेनपक्षी जाऊ लागला असता दुसर्या एका श्वेन पक्ष्याने त्याला पाहिले. त्याच्या तोंडात काहीतरी आमीष आहे, असे वाटून दुसर्या पक्ष्याने त्याच्यावर झडप घातली. दोघांमध्ये जोरदारलढत झाली. त्या गडबडीत वीर्याचा द्रोण खाली नदीत पडला. नदीतल्या अद्रिका नामक मासोळीने ते वीर्य गिळून टाकले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. ही मासोळी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली. तिचे उदर मोठे असल्याने दाशराज नावाच्या त्या कोळ्याने ते हळुवार फाडले, तर त्यात त्याला दोन मानवी बाळे एक मुलगा व एक मुलगी मिळाली. कोळी ती बाळे घेऊन राजाकडे आला. राजाने त्यातील मुलाला स्वतःकडे ठेवले. मुलीच्या अंगाला माशाचा गंध येत असल्याने तिला दाशराज कोळ्यालाच सांभाळावयास दिली. हीच मत्स्यगंधा सत्यवती. आपल्याला प्राप्त झालेले कर्म समरसून करायचे हा तिचा स्वभाव होता. तिला स्वतःच्या सौंदर्याचा गर्व नव्हता की अंगाला येणार्या मत्स्यगंधाचा न्यूनगंड नव्हता. अशा शुद्ध स्त्रीकडून आपणास पुत्रप्राप्ती झाली तर तो महान तपस्वी बनेल. आपण जे वेदअध्ययन, अध्यापनाचे कार्य अहोरात्र करतो आहोत, तेच कार्य हा पुत्र पुढे चालवेल, असा विश्वास पराशर महर्षींना वाटला. म्हणून त्यांनी दिक्कालाला थोपवून धरत अयोनीसंगाने सत्यवतीकडून पुत्रप्राप्ती करवून घेतली. अशारीतीने व्यासांचा अवतार झाला. सत्यवतीचा मत्स्यगंध दूर होऊन ती योजनगंधा झाली. ही राजवंशाची मुलगी राजघराण्यातच पडावी, तिचे संतानानेही राजा व्हावे, ही स्वाभाविक अपेक्षा दाशराज कोळ्याची होती. हीच सत्यवती पुढे कुरुवंशाला वळण देणारी ठरली..!
अनुराधा सुधीर कुलकर्णी (चर्चा) २०:०३, १५ मार्च २०१९ (IST)