पर्च

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे नाव पर्सिडी मत्स्य कुलातील पर्का वंशातील जातींना देतात परंतु इतर काही माशांनाही पर्च हे नाव दिलेले आढळते. पर्कावंशात सु. ९० जाती असून बहुतेक अमेरिकन आहेत. हे गोड्या पाण्यात राहणारे असून खाद्यमत्स्य आहेत. सामान्य पर्चचा (पर्का फ्लुव्हिएटिलिस) प्रसार सामानयतः उत्तर यूरेशियात आहे व पिवळा पर्च (पर्का फ्लॅव्हिसेन्स) उ. अमेरिकेच्या पूर्व भागात आढळतो. पर्सिडी कुलात पर्चशिवाय पाइक व डार्टर या माशांचा समावेश होतो. पर्च नद्या व सरोवरांत राहतात; पण ज्या सरोवरांत पाण्याची खोली एक मीटरपेक्षा जास्त आहे तेथे त्यांची भरपूर वाढ होते. मोठ्या खोल सरोवरात ते १०० मी. किंवा त्यापेक्षाही जास्त खोल जातात.

वर्णन[संपादन]

त्यांच्या आकारात पुष्कळच विविधता आढळते. काहींची पाठ उंच असते, तर काहींची खोलसर असते व शरीर लांब असते. पाठ व बाजूंचा रंग गर्द हिरवा तपकिरी असून त्यात सोनेरी चमक असते. दोन्ही बाजू व पाठ यांवर पाच किंवा सात काळे आडवे पट्टे असतात. पृष्ठपक्षाच्या (पाठीवरील पराच्या) शेवटच्या दोन कंटकांच्या (काट्यांच्या) मधल्या कलेवर एक मोठा काळा ठिपका असतो. श्रोणिपक्ष (मागील बाजूस असलेले पर), गुदपक्ष आणि पुच्छपक्षांचे (शेपटीच्या परांचे) खालचे भाग चकचकीत तांबड्या रंगाचे असतात.

पर्च मांसाहारी असून खादाड असतात. अन्न म्हणून त्यांना महत्त्व आहे. त्यांची वीण फार मोठ्या प्रमाणावर होते. ते तीन वर्षांचे झाल्यावर अंडी घालू लागतात. अंडी घालण्याचा हंगाम एप्रिल किंवा मेचा पहिला पंधरवडा असतो. मादी १०,०००–४०,००० अंडी घालते. अंड्यांच्या लांब, अरुंद पट्ट्या असून जलवनस्पतींवर त्यांची जाळी असतात. त्यांची पैदास बेसुमार होते. त्यामुळे त्यांची गर्दी होऊन त्यांना पुरेसे अन्न मिळत नाही व ते बारीक राहतात, असे लहान पर्च खाण्यायोग्य नसतात.

संदर्भ[संपादन]