कलम करणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतर अनेक कारणांव्यतिरिक्त, दिवसे दिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे झाडांना निर्विवाद महत्त्व आले आहे. आपला परिसर प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी कमी जागेत शोभेची झाडे लावतात. त्यांसाठी रोपांची गरज असते. त्यासाठी लहान मोठ्या नर्सरीमधून विविध रोपे कमी कालावधीत व चांगल्या प्रकारे जोपासता येतात. त्यातून उत्पन्नही जास्त मिळविता येते. अशी रोपे पुढील दोन पद्धतीने करता येतात.

वनस्पती प्रजनन : दोन पद्धती :-

  • बियांपासून किंवा खोड कलम, भर कलम, दाब कलम, उती संवर्धन,गट्टी कलम या पद्धाती वापरून खोड, मूळ, पान, अशा शाकीय अवयवांपासून वनस्पतीच्या होणाऱ्या प्रजननास शाकीय अभिवृद्धी असे म्हणतात.
  • बिजाणूंपासून होणाऱ्या प्रजनन पद्धतीला बिजाणुजन्य प्रजनन (टिश्यू कल्चर ) म्हणतात.

या दोन्ही पद्धतीने वनस्पतीचे प्रजनन करून रोपे तयार केली जातात.

पूर्व तयारी

प्रात्यक्षिक करण्यापूर्वी प्रथम स्वतः ते प्रात्यक्षिक करून पाहून त्यात येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्या लागतात. प्रात्यक्षिकापूर्वी स्पॅनिग माॅस (शेवाळ), संजीवक. प्लॅस्टिक पिशव्या इत्यादी साहित्याची जमवाजमव करून ठेवावी लागते..

प्रत्यक्ष वनस्पती प्रजननाचा उद्योग सुृरू करण्यापूर्वी

एक छोटी नर्सरी तयार करून त्यामध्ये छाट कलमाची, गुट्टी कलमाची व दाब कलमाची रोपे तयार करावीत आणि त्यासाठी अनुभव म्हणून

  • बोगनवेल, डुरांडा या शोभेच्या रोपांची प्रत्येकी १०० छाट कलमाची रोपे तयार करून पाह्यल्यास फायदा होतो.
  • एखाद्या शेतकऱ्याच्या द्राक्षाच्या बागेचे छाटकाम करून पहावे.
  • एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेत गुट्टी कलम करून पहावे.
  • पारिजातकाच्या १०० रोपांना गुट्टी कलम करून पहावे.
  • एखाद्या शेतकऱ्याच्या पेरूच्या बागेत दाब कलम करून द्यावे

अपेक्षित कौशल्ये

  • कलमाची हत्यारे हाताळण्यास शिकणे.
  • कलमांच्या फांद्या निवडण्यास शिकणे.
  • खत, मातीचे मिश्रण योग्य प्रकारे करता येणे.
  • छाट व्यवस्थित घेता येणे.
  • कलमे व्यवस्थित बांधणे.

साहित्य- स्पॅनिग माॅस, संजीवक, प्लॅस्टिक पिशवी, प्लॅस्टिक कागद (कलम) पट्टी.

साधने- सी कटर, कलमाचा चाकू इ.

कलमाचे प्रकार[संपादन]

कृती

छाट कलम[संपादन]

  • यासाठी माती-शेणखत हे ३:१ या प्रमाणात मिसळून प्लॅस्टिक पिशवीत भरून त्यावर पाणी शिंपडतात.
  • ज्याचे कलम करायचे आहे त्या झाडाचे तिरकस छाटे कापतात.
  • छाट्याखालील तिरकस बाजूस संजीवक लावतात.
  • संजीवक लावलेला भाग पाणी शिंपडलेल्या पिशवीत रोवतात..
  • छाट्याच्या बाहेरील बाजूस शेण लावतात किंवा तो जोड प्लॅस्टिकने बांधतात.
  • पिशवीत कायमचा ओलावा राहील अशा पद्धतीने पाणी सोडतात.

गुट्टी कलम[संपादन]

  • कलमासाठी निवडलेल्या फांदीची साधारण एक ते दीड इंच लांबीची गोलाकार साल काढतात.
  • साल काढलेल्या जागी संजीवक लावतात.
  • नंतर ओले केलेले स्पॅग्नॉमॉस त्यावर लावून प्लॅस्टिकच्या फितीने तो भाग बंद करतात. स्पॅग्नॉमॉस ओले करून लावतात कारण कलम तयार होताना त्यास पाण्याची आवश्यकता असते व ते पाण्याला स्पॅग्नॉमॉसमधून शोषून घेते. स्पॅग्नॉमॉसमधील पाणी ज्यावेळी संपते त्यावेळी स्पॅग्नॉमॉस हवेतील आर्द्रता शोषून घेते व कलमाची पाण्याची गरज त्यातून भागविली जाते म्हणून गुट्टी कलम करताना स्पॅग्नॉमॉस वापरतात.

दाब कलम[संपादन]

  • माती व शेणखत यांचे ३:१ या प्रमाणात मिश्रण करून ते कुंडीत घेतात.
  • पेरूच्या झाडाची जमिनीलगतची फांदी कलमासाठी निवडतात..
  • शेंड्यापासून २ फूट मागील बाजूस फांदीचे खालून १-२ इंच तिरकस कट घेतात.
  • तिरकस काप घेतलेल्या ठिकाणी नारळाची कडी (?) घालतात व त्यास संजीवक लावून तो भाग कुंडीमधील मातीत दाबून टाकतात.
  • दाबलेल्या भागावर वजन ठेवतात.
  • कुंडीत पाणी सोडतात.

विशेष माहिती : कलम करण्याचे निरनिराळे प्रकार

अ.क्र अभिवृद्धीचा प्रकार कोणत्या वेळी केल्यास चांगले कोणती झाडे
छाट कलम खरीप किंवा रब्बी हंगामात अंजीर, द्राक्षे, शेवंती, बहुवार्षिक झाडे, वेली (जाई-जुई )
दाब कलम पावसाळा तगर, कागदी लिंबू, पेरू, वेली वगेरे
गुट्टी कलम पावसाळा ड्रेसिना, क्रोटेन, मुसाडा, एक्झोटा, डाळिंब
पाचर कलम ऑक्टोबर, नोव्हेंबर आंबा व इतर कोणतेही फळझाड
डोळा भरणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी गुलाब, संत्री, मोसंबी इ.


संदर्भ

शेती व पशुपालन

पाचर कलम व डोळा भरणे

शेतीशी संबंधित एक जोडउद्योग म्हणजे रोपवाटिका. रोपवाटिका हा केवळ एक जोडउद्योग न राहता तो पूर्णपणे स्वत्रंत व्यावसाय म्हणूनही पाहिला जातो. शेतीप्रमाणेच रोपांची निगा राखण्याकरता काही विशिष्ट पूर्तता कराव्या लागतात. यातच एक तंत्र म्हणजे कलम करणे.

पाचर कलम, डोळा भरणे इत्यादी[संपादन]

पूर्व तयारी :

  • आधी तयार केलेल्या कलमांच्या रोपांना पाणी देण्याचे नियोजन करावे..
  • ज्या रोपांवर / झाडांवर कलम करावयाचे ती रोपे / झाडे यांची निवड करून ठेवावी.

उपक्रमांची निवड करणे

  • आंब्याच्या १००० रोपांची पाचर कलमाद्वारे रोपे तयार करावी.
  • गुलाबाच्या बागेची डोळा भरणी करून घ्यावी.
  • शेतकऱ्यांच्या संत्री व मोसंबी बागेत त्यांच्या रोपांचे डोळे भरून घ्यावेत.

प्रात्यक्षिकाची पूर्व तयारी

  • प्रात्यक्षिकासाठी लागणारी साधने व साहित्य (सी कटर, बडिंग नाईफ) आधीच जमा करून ठेवावे.


अपेक्षित कौशल्ये

  • कलमांच्या हत्यारांची ओळख होणे.
  • कलमासाठी पाचरांची निवड करणे.
  • डोळे भरण्याचे कौशल्ये येणे.
  • डोळे भरण्याचे विविध प्रकार येणे.
  • कलम व्यवस्थित बांधता येणे.

कृती

पाचर कलम

  • एक ते दीड वर्षाच्या गावरान आंब्याच्या शेंड्याकडील भाग सी कटरच्या साहाय्याने कापावा.
  • कापलेल्या खोडाला मध्यभागी उभा काप घ्यावा.
  • चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापावी.
  • फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून टाकावी..
  • फांदीच्या खोडाकडील बाजूला पाचराचा आकार द्यावा.
  • ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवावी.
  • पूर्ण जोड प्लॅस्टिकच्या फितीने बांधून टाकावा.

डोळा भरणे

  • कलमासाठी निवडलेला डोळा फांदीपासून वागला करण्यासाठी चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडेने वर्तुळ पाकळीच्या आकाराचा काप घ्यावा.
  • फुटव्याला इजा न होता डोळा फांदीपासून वेगळा करावा.
  • पाचर कलमाच्या ज्या फांदीवर तो डोळा बसवायचा आहे त्यावर इंग्रजी आय किंवा टी आकाराचा काप घ्यावा.
  • कापाच्या मध्यभागी साल चाकूच्या साहाय्याने उचकटून काढलेला डोळा त्यामध्ये बसवावा.
  • डोळ्यातील फुटवा उघडा ठेवून कलमावर प्लॅस्टिकची फीत ताणून बांधावी.

द्क्षता

  • कलमाचे काम करताना सी कटरने / चाकूने शरीराला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • छाट / पाचर कलमांसाठी फांदी निवडताना कोवळी अथवा फार जुनी फांदी निवडू नका.
  • पाचर कलमाच्या त्या फांदीवरती किमान चार डोळे आहेत याची खात्री करा.
  • गुटी कलमाला मूल्य फुटल्यावर ती गुटी मूळ झाडापासून वेगळी करा.
  • पाचर कलम केल्यानंतर मूळ झाडास नवीन फूट आल्यास ती काढून टाका.
  • डोळा भरणे कलम केल्यानंतर मूळ झाडास नवीन फूट आल्यास ती काढून टाका..
  • कलमांसाठीच्या फांद्यावरती कोणत्याही प्रकारची कीड नसावी.

आपणास हे माहीत आहे का ?

  • वनस्पती प्रजननाच्या दोन पद्धती आहेत.
  1. लैगिक (बीजापासून रोपे )
  2. शाकीय (खोड, फांदी, पान, मूळ, इ. पासून रोपे )
  • केरोडेक्स पावडर एक संजीवक म्हणून वापरतात. त्यामुळे मुळे फुटण्यास मदत होते.
  • स्पॅगनम मॉस हे एक शेवाळ आहे. ते पाण्यात भिजवून लावल्यामुळे त्या ठिकाणी ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते.
  • छाट कलमात, गुट्टी कलम, कोय कलम, इ. निवडतात फांदी एक सेंटीमीटर व्यासाची असावी.
  • तयार झालेल्या कलम रोपांची पूर्ण लागवड करा.
  • जवळील नर्सरी केंद्राला भेट देऊन कलम बांधणीचे निरीक्षण करा व बांधणीचा सराव करा.

विशेष माहिती

  • वनस्पतीचे / झाडाचे कलम करताना संजीवक म्हणून आपण केरोडेक्स पावडर वापरतो. ही पावडर ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणचे अनावश्यक जीवजंतू मारले जातात. त्यामुळे मुळे लवकर फुटतात. केरोडेक्सशिवाय IBA, G.A, IAA, सिरॅडिक्स इत्यादीचाही वापर संजीवक म्हणून केला जातो. त्यांच्याबरोबर स्पॅग्नॉमॉसचाही वापर केला जातो. स्पॅग्नॉमॉसची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने त्या कलमास वरून पाणी देण्याची गरज भासत नाही. जर गरज भासलीच तर स्पॅग्नॉमॉस हवेतील आद्रता शोषून घेते. कलमाला तयार होताना पाण्याची गरज अशा रितीने भागविली जाते.
  • कलमास आतून मुळ्या फुटल्यात हे कसे ओळखाल, तर त्या कलमाचा वरील भाग फुगीर बनलेला असतो.

संदर्भ

शेती व पशुपालन