Jump to content

थॉमस मेकॉले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉमस बॅबिंग्टन मेकॉले
जन्म २५ ऑक्टोबर १८००
मृत्यू २८ डिसेंबर १८५९
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
नागरिकत्व ब्रिटिश
प्रसिद्ध कामे भारतीय दंडविधान, शिक्षणविषयक टिपण
स्वाक्षरी

थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (जन्म २५ ऑक्टोबर १८०० - मृत्यू २८ डिसेंबर १८५९) हे ब्रिटिश लेखक, इतिहासकार आणि राजकारणी होते. त्यांचे निबंध आणि इंग्लंडचा इतिहास ह्या ब्रिटिश इंग्लिशमधील अभिजात साहित्यकृती मानण्यात येतात.

चरित्र आणि कार्य

[संपादन]

थॉमस मेकॉले ह्यांचा जन्म लायसे स्टशरमधील रॉथ्‌ली टेंपल येथे झाला. त्यांनी १८१८मध्ये केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि कायद्याची पदवी मिळविली. मात्र त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला नाही. १८२३ पासून क्वार्टर्ली रिव्ह्यू, एडिंबरो रिव्ह्यू ह्यांसारख्या नियतकालिकांतून त्यांनी आपले निबंधलेखन सुरू केले. इंग्लिश कवी मिल्टन ह्यांच्याविषयी त्यांनी एडिंबरो रिव्हू ह्या नियतकालिकात लिहिलेले निबंध खूप गाजले.

१८३० मध्ये मेकॉले ह्यांनी इंग्लंडच्या संसदेत (पार्लमेंटमध्ये) प्रवेश केला. त्यांनी ब्रिटिश संसदेत केलेली भाषणे संस्मरणीय ठरली. १८३२ मध्ये ‘सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल (ऑफ इंडिया)’ ह्या पदावर त्यांची नेमणूक झाली. पुढील काळात ते भारताच्या ‘सुप्रिम काउन्सिल’चे सदस्य असताना १८३४ ते १८३८ ह्या काळात त्याचे भारतात वास्तव्य होते. ह्या वास्तव्यातच त्यांनी भारतीय दंडविधानाची संहिता लिहिण्याचे आणि शिक्षणाच्या माध्यमाविषयीचा आपला निबंध लिहिण्याचे काम केले.

इंग्लंडला परतल्यानंतर एडिंबरोचा प्रतिनिधी सदस्य म्हणून पार्लमेंटवर त्यांची निवड झाली. १८३९ ते १८४१ ह्या काळात युद्धसचिव म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव होता. पेमास्टर जनरल ह्या पदावरही त्याने काम केले (१८४६–४७). त्यांनी वॉरन हेस्टिंग्ज, रॉबर्ट क्लाइव्ह, ॲडिसन, थोरला विल्यम पिट ह्यांच्यावर निबंध लिहिले. मेकॉले ह्यांनी सहा खंडांत लिहिलेला इंग्लंडचा इतिहास (हिस्टरी ऑफ इंग्लंड (१८४९–१८६१) हे त्यांचे महत्त्वाचे कार्य मानण्यात येते.

बाह्य दुवे

[संपादन]