Jump to content

जागतिक रंगभूमी दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला.[ संदर्भ हवा ]

【【जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमी: एक चिंतन】】*

[संपादन]

२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.

व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.

आद्यनाटककार अश्वघोष,तृतीय रत्नकार महात्मा फुले यांच्या लेखणीतून निर्माण झालेली भारतीय नाट्य परंपरा आजही बहरत आहे.। विष्णूदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा १८४३ मध्ये सांगली येथे नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. दरम्यान, आधी चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का? अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यात गुरफटलेली आहे. पण, या सर्व माध्यमांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याची गरज आहे.'लोकांना जे आवडते ते देण्यातच आपली मराठी रंगभूमी मश्गूल राहिली. म्हणून आपले नाटक मागे पडले. कोणतेही प्रश्न तीव्रतेने मांडणारे नाटक तुम्ही घ्या, ते चाललेले नाही. कारण मुळात प्रेक्षकांची मनोभूमिकाच बदललेली नाही. काही मोजके कलाकार-लेखक तसा प्रयत्न करीत असले, तरी त्याचा उपयोग होत नाही', असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी करतात.

रंगभूमीच्या इतिहासापासून ते आजची रंगभूमी, मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटके, त्यांच्या मर्यादा, प्रेक्षकांची मनोभूमिका या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन करणे काळाजी गरज आहे. विष्णूदास भावे यांच्या काळातील नाटके, ज्येष्ठ नाटककार खाडीलकर, देवल, कोल्हटकर, गडकरी यांनी लिहिलेली नाटके यांचा परीचय आजच्या पिढीला करून दिले पाहिजे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगताना १८४३पूर्वी रंगभूमी होती आणि तेव्हापासून व्यावसायिक रंगभूमी कशी अस्तित्वात आली हे लक्षात घेतले पाहिजे. 'पूर्वी तंजावरमध्ये नाटके लिहिली जायची, त्यांचे प्रयोग व्हायचे. महात्मा फुले यांनी १८५५ साली नाटक लिहिले होते. परंतु त्या नाटकाचा प्रयोगच होऊ शकला नाही. कारण ब्रिटिशांनी त्यांना प्रयोग करण्याची परवानगी दिली नाही. पण त्यांनी नाटक लिहिलेय हे आपल्याला कळले ते १९७८ साली. कारण त्याची नोंदच नव्हती.याचा अर्थ रंगभूमीवरील नोंदी घेणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने बदलली ती विजय तेंडुलकरांच्या काळापासून. पण, त्यांना जेवढा त्रास झाला तेवढा कोणत्याही नाटककाराला झाला नाही.याचे कारण म्हणजे त्यांचे वास्तववादी लेखन.

आज पर्यंतच्या रंगभूमीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की,इंग्रजी नाटके मराठीत अनुवादित होतात. मात्र, मराठी नाटक इंग्रजीत अनुवादित होत नाहीत. 'शेक्सपिअरची सर्वच्या सर्व नाटके आपल्याकडे अनुवादित झाली आहेत. पण मराठीतील एकाही नाटककाराचे नाटक इंग्रजीत गेलेले नाही. आपली नाटके लंडनमध्ये वगैरे सादर होतात. पण ती तिथल्या महाराष्ट्र मंडळांनी, म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्याला निमंत्रित केलेले असते. इंग्रजांनी कधी आपल्याकडील एखादे नाटक सादर करण्यासाठी तेथे निमंत्रित केले आहे का? त्या ताकदीची कलाकृती निर्माण व्हायला हवी.'हे नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे मत गांभीर्याने विचारात घ्यावे लागेल.

आपल्याकडे असंख्य विषय आहेत. आपल्याकडील आदिवासींचे जगणे घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली, परंतु देशाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे असे दिसत नाही. त्यांचे जगणे हा नाटकाचा, विषय आहे. असे विविध विषय हाताळले गेले पाहिजेत.एक नाटककार म्हणून, तुम्ही का लिहिता असे जर मला विचाराल तर, मी म्हणेन की तुम्हीच मला लिहायला भाग पाडता. तुम्ही जर प्रश्न निर्माण केले नसते तर मी का लिहिले असते? समाजामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत म्हणून लेखक लिहितो. माझी नाटके ज्या दिवशी कालबाह्य होतील तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असेल.'हे प्रेमानंद गज्वी

यांचे मतही आपणास विचार करायला भाग पाडते.

समाजाला दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. देशातील सांस्कृतिक पर्यावरण जेवढे निकोप राहील तेवढी विधायक कामे अधिक होतील. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राचे दमन न करता सरकारने योग्य धोरण ठरवावे.चांगले सांस्कृतिक धोरण जगभरात भारताची प्रतिमा अधिक उजळ करील, असा आशावादही यावेळी व्यक्त करायला हरकत नाही. सध्याच्या काळात सांस्कृतिक क्षेत्राची मोठी कुचंबणा होत असल्याचा सूर उमटतो.भाई तुम्ही कुठे आहात या नाटकाचे लेखक ,प्रसिद्ध समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणतात 'सध्याच्या काळात

साहित्य-संस्कृती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात दमन झाले. यापूर्वी संस्कृती व वाड्मय क्षेत्रातील धुरिणांना विलक्षण प्रतिष्ठा दिली गेली. मात्र, सरकारला भय वाटत होते. लेखणीची ताकद सत्ता उलथवू शकते, या भयापोटी  सरकारने लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजुने आणि संविधानाच्या आधाराने लेखकांना भूमिका घ्यावी लागली. सरकार योग्य दिशेने असेल तर, भय वाटण्याचे कारण नसते. तसेच निकोप सांस्कृतिक वातावरणासाठी राष्ट्रीय पातळीवर संस्थात्मक उभारणीची गरज आहे. 
मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने  अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करू नये असे मत  दवबिंदू पेटताना नाटकाचे लेखक डॉ.विलासराज भद्रे मांडतात. वेगवेगळ्या  नाटय प्रयोगा करीता  नवीन नाटय संस्थांची गरज आहे. जीवनमूल्ये अधोरेखित करण्याचे काम रंगभूमी करते. त्यामुळे या क्षेत्राला पोषक वातावरण तयार करणे सरकारची जबाबदारी आहे.  'प्रादेशिक रंगभूमी जपून लोककला व कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. रोजगाराच्या संधी नसल्यामुळे इंग्रजीचे स्तोम वाढले आहे. भारतीय भाषा टिकवण्यासाठी रोजगार वाढवणे आवश्यक आहे. मराठी दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषा संवर्धन कमी आणि काही लोकांसाठी रोजगार निर्मिती दिसते. साहित्य क्षेत्रात ज्येष्ठ झाल्याशिवाय संधी मिळत नाही. त्यामुळे तरुण लेखकांसाठी,रंगकर्मींसाठी राष्ट्रीय स्तरावर मंडळ स्थापन करून कार्यशाळा आयोजित करून विविध उपक्रम राबवले पाहिजेत.महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा रा. शं. दातार पुरस्कार प्राप्त नाटककार डॉ. अनिलकुमार साळवे म्हणतात की,'तरुण नाटककार रंगभूमीला नवीन रंगभाषा देत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुन्या-नवीन रंगकर्मींनी सुसंवाद साधने गरजेचे आहे'.

लोककलेचा आपल्याला समृद्ध वारसा लाभलेला असून'लोकरंगभूमी संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होत नसल्याची वस्तुस्थिती आहे अशी खंत लोककलेचे प्रख्यात संशोधक डॉ.गणेश चंदनशिवे व्यक्त करतात. 'देशातील रंगभूमीला -सांस्कृतिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. नाटक जगले पाहिजे. विविध पुरस्कार, समित्यांवर तज्ज्ञांची नियुक्ती करून पारदर्शी निवड करावी. नवीन लेखकाला,आणि रंगभूमीवर उपजीविका असणाऱ्या कलावंत, बॅकस्टेज आर्टीस्ट, वृद्ध कलावंत यांना विविध योजनांमधून भरघोस अनुदान द्यावे.तरच रंगभूमी समृद्ध होईल असे मला वाटते.


समाजाला उन्नत आणि उदात्त दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. त्यांच्या पाठिशी राज्यकर्त्यांनी उभे राहणे अपेक्षित असते. सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन लेखक-कलावंत एकाकी पडले आहेत. कलावंत, विचारवंत, लेखक यांना बोलण्याची मुभा राहिली नाही. शासकीय व्यवस्थेने लेखक व कलावंतांचा सन्मान राखण्याची गरज आहे. समाजाला दिशा देणाऱ्या लेखकांचे महत्त्व गौण ठरवले गेले आहे. ही दृष्टी बदलणे क्रमप्राप्त आहे. वयोवृद्ध व गरजू कलाकार-कलावंतांची काळजी घेणे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. शिवाय, केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर भाषेसाठी महत्त्वाचे काम करण्याबाबत नियोजन करावे.नाटय-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत शासकीय संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला. सोयीच्या विचारधारेची, पण सामान्य वकुबाच्या व्यक्ती पदांवर नेमल्या गेल्या. हा प्रकार सांस्कृतिक पर्यावरणासाठी घातक आहे.राष्ट्रीय नाटय विद्यालय, एफटीआयआय,नाटय-साहित्य संमेलन,,सेन्सॉर बोर्ड अशा अनेक ठिकाणी त्याची प्रचिती येते. याला अटकाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी अपेक्षा .

बालरंगभूमीने नाटय व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत.मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम राज्यभरात होणाऱ्या अशा बालनाट्य स्पर्धा आणि शिबिरातून होत असते.हे डॉ.सतीश साळुंके, डॉ.दीपा क्षीरसागर आणि आसिफ अन्सारी यांचे मत महत्त्वपूर्ण वाटते.

मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. नवीन रंगकर्मींच्या प्रयत्नांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा पडल्या आहेत. व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे.टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे.

'मराठी रंगभूमीचा उद्धार केला पाहिजे, अशी तोंडाची वाफ आपण सतत दवडतो; पण रंगभूमीसाठी प्रत्यक्षात काय करतो? गेलेले सुवर्ण दिवस आठवण्याशिवाय रंगभूमीच्या उत्कर्षासाठी काही करतो का? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

✒ '*प्रा. सिद्धार्थ आबाजी तायडे*',

[ संदर्भ हवा ]:- १.नाट्यकोश :-वि.भा. देशपांडे २.मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल:-श्रीपाद लाटकर ३.भारतीय रंगभूमीची परंपरा:-डॉ. माया सरदेसाई ४.कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची :श्रीराम रानडे ५.नाट्यसंमेलनाध्यक्ष भाषण:- प्रेमानंद गज्वी (९९वे अ. भा. नाटय संमेलन,नागपूर.२०१९) ६.Indian English Drama:ॲटलांटिक पब्लिशर्स ७. www.worldtheatre-day.org

बाह्य दुवे

[संपादन]