सागर ठक्कर
सागर ठक्कर ऊर्फ शेंगी हा अमेरिकन नागरिकांची बनावट कॉल सेंटरद्वारे आर्थिक फसवणूक करणारा गन्हेगार आहे. सागर ठक्करचा जन्म मुंबईचे उपनगर असलेल्या बोरिवलीत एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यानंतर तो अहमदाबादला गेला होता. याच ठिकाणी तो बोगस कॉल सेंटर चालवण्याचे तंत्र शिकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मुंबईजवळच्या मीरा रोड येथे खोटे कॉल सेंटर चालवून सागरची बनावट कंपनी अमेरिकन लोकांची आर्थिक फसवणूक करत होती. या गोष्टीचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी कॉल सेंटरवर छापे टाकले व त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
कार्यपद्धती
[संपादन]अहमदाबादला काही बोगस कॉल सेंटरे सुरू केल्यावर त्याने मीरा रोड-भाईंदर परिसरात कॉल सेंटर सुरू केले. मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटरचा ५ ऑक्टोबर २०१६ रोजी पर्दाफाश झाला. ठाणे पोलिसांनी तब्बल १२ कॉल सेंटर्सवर एकाच वेळी छापा टाकला. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांना कर भरायला सांगायचे. इंटर्नल रेव्हेन्यू सर्विसमधून फोन करत असल्याचे सांगून येथील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना गंडा घालायचे.
ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे किंवा ज्यांनी कर भरलेला नाही अशा अमेरिकन लोकांना ठाण्यातील कॉल सेंटरमधून कॉल जात असे. हा कॉल अमेरिकन सरकारकडून आला असल्याचे त्यांना भासवले जात असे. ताबडतोब आम्ही सांगतो तितकी रक्कम भरा अथवा तुम्हाला अटक केली जाईल अशी धमकी त्यांना दिली जात असे. त्यातून सागरच्या बनावट कंपनीने ५०० कोटी रुपये कमवले होते.
सागर ठक्कर उर्फ शॅगीने क्रिकेट खेळाडू विराट कोहलीकडून ऑडी आर-८ ही गाडी विकत घेऊन आपल्या प्रेयसीला भेट दिली होती. मात्र ‘या प्रकरणाचा विराट कोहलीशी काही संबंध नव्हता. विराटला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपये इतकी होती.
पोलिसांना या गोष्टीची खबर लागताच सागर दुबईला पळून गेला. परंतु संयुक्त अरब अमिरातीने त्याल दुबईमध्ये अटक करून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करून दुबईला पळून गेलेल्या सागरला त्याच्या प्रत्यार्पणानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईस आणले आणि अटकेत टाकले.