सुकाणू (वृक्ष)
सुकाणू हा एक एक सदाहरित, छोटेखानी पण विषारी वृक्ष आहे. इंग्रजीत ‘स्युसाइड ट्री’ म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘सरबेरा ओडोलम’ असे आहे.
भारतात आणि दक्षिण अशियाच्या इतर देशांमध्ये सुकाणू नैसर्गिकरीत्या वाढतो. साधारण समुद्रकिनाऱ्याची हवा यांस अधिक पोषक आहे. या झाडाच्या फांद्यांवर एकत्रित चकचकीत हिरव्या रंगाची पाने येतात. ती वरून गोलसर व खालच्या बाजूला निमुळती असतात. फुले मोठी आणि सुगंधी असतात. फळ जेव्हा हिरवे असते तेव्हा साधारण क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराचे असते. वाळल्यावर फळ तंतुमय होते व अतिशय कमी वजनाचे होते.
सुकाणू या वृक्षाचे कण्हेरीशी खूप साधर्म आहे. संपूर्ण वृक्षात पांढरा द्रव अर्थात लेटेक्स असतो. फळामध्ये सरबेरीन नावाचे एक विषारी तत्त्व असते. त्याचा चुकून वापर झाल्यास स्नायूंना हृदयाकडून होणारा कॅल्शियमचा पुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयाचे स्पंदन अनियमित होते. काही वेळी मृत्यूपण होऊ शकतो. उपचार करत असताना नेमके कारण शोधणे कठीण होऊन बसते. केरळ प्रांतात १९८९-९९ या कालावधीत जवळजवळ पाचशे मृत्यू सुकाणू वृक्षामुळे झाल्याची नोंद आहे. या विषाचा उपयोग उंदीर मारण्यासाठीही होतो. फळांचा उपयोग वनस्पतिज कीटनाशक बनवण्यासाठी केला जातो.
मुंबईत भायखळा येथील राणीच्या बागेत आणि कुलाब्यात टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या आवारात सुकाणूंचा एकेक वृक्ष आहे. पुण्यातकी सुकाणूची झाडे आहेत.