Jump to content

रवींद्र देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रवींद्र देसाई (इ.स. १९४७ - इ.स. २०१५) हे सोप्या भाषेत संगणकविषयांवर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि वक्ते होते. त्यांनीं लेखनातून संगणक, माहिती तंत्रज्ञान, शेअर बाजार असे विविध विषय हाताळले.

वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.[]

‘क- क- कॉम्पुटरचा’ असे पुस्तक लिहीत असताना आपल्या ८६ वर्षांच्या आईला संगणकासमोर बसवून तिला तिचे आत्मचरित्र लिहायला लावणारे रवींद्र देसाई हे एक वेगळ्या लयीचे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या आईने संगणकावर लिहिलेले हे पुस्तक त्यांनी मोठय़ा आत्मीयतेने ‘आभाळ पेलताना’ या नावाने प्रकाशित केले होते. तिचे हे कर्तृत्त्व सगळ्यांना सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान विलसत असे, ते केवळ अनुभवण्यासारखे असे. आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन हेच ध्येय बाळगलेल्या देसाई यांनी उपयुक्त साहित्य लिहिले असले, तरीही त्यांचे चिंतन त्यांच्या बोलण्यातून सतत पाझरत असे. मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि त्याला अखंड वाचनाची जोड यामुळे अनेक पुस्तकांच्या संपादनात ते अतिशय महत्त्वाच्या सूचना करीत असत.

व्याख्याने आणि सामाजिक कार्य

[संपादन]

गोबर गॅस या क्षेत्रात देसाई यांनी मूलभूत काम केले. मुळशी, मावळ तालुक्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये नागरिकांना रास्त दरामध्ये गोबर गॅस उपलब्ध करून दिला. लेखणीबरोबरच देसाई यांचे वाणीवरही प्रभुत्व होते. रसाळ आणि नर्मविनोदी वक्तृत्वशैलीने ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करीत असत. विषयाची सखोल जाण आणि श्रोत्यांबरोबर खेळीमेळीच्या गप्पा वाटाव्यात अशी शैली यामुळे त्यांची व्याख्याने ही मेजवानी असायची. अनेक कळीच्या सामाजिक विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सामाजिक माध्यमांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. एखाद्या समस्येचे वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधण्याची त्यांची सर्जनशीलता लेखनातून प्रतिबिंबित होत असे.

झोपडपट्टीतील मुलांसाठी संध्याकाळी स्वतंत्र शाळा चालवण्याचे काम देसाई यांनी आनंदाने केले. या मुलांचे आयुष्य सर्वार्थाने फुलावे, यासाठी पदरमोड करून विविध उपक्रम राबवण्यात ते अधिक खूश असायचे. मितभाषी असले तरीही गप्पांच्या मैफलीत आपल्या नर्मविनोदाने हास्य फुलवणाऱ्या देसाईंना अनेक विषयांमध्ये रस होता. संगणक, माहिती तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार याबरोबरच शेअर बाजार हे त्यांचे विशेष आवडीचे विषय. त्या विषयांवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

मित्रपरिवार

[संपादन]

रवींद्र देसाई यांचा मित्रपरिवार हा एक हेवा वाटण्यासारखा विषय होता. वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेकांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या सगळ्या मित्रांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात समरसून जाण्यात त्यांना अधिक आनंद मिळे. लेखनात दंग राहणे आणि वाचनात आनंदी राहणे असे जगणे फार थोडय़ा लोकांच्या वाटय़ाला येते. देसाई हे अशा मोजक्यांपैकी एक होते.

रवींद्र देसाई अविवाहित होते. देसाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

पुस्तके[]

[संपादन]
  • एक्सेल २०००
  • कसा निवडावा कॉम्प्यूटर
  • क... क... कॉम्प्यूटरचा
  • तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही 'श्रीं' चीच इच्छा आहे
  • नव्या स्वरूपात एक्सेल
  • प्रभावी भाषणकला
  • शेअर बाजार - जुगार? छे, बु्द्धिबळाचा डाव
  • सर्वांसाठी ई-मेल
  • हातना पसरू कधी... (अनुवादित)
  • हे सारे मला यायलाच हवे !

पुरस्कार

[संपादन]
  • ‘क-क-कॉम्प्युटरचा’, ‘हातना पसरू कधी’ आणि ‘ग्यानबाचा गोबर गॅस’ या त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/article-on-ravindra-desai-1176809/
  2. ^ http://www.rajhansprakashan.com/grantha-soochi?title=&field_author_ref_nid=254&name=