पट्टे कादंब
पट्टे कादंब किंवा पट्ट कादंब (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येतात. याच्या डोक्यावर असलेल्या काळ्या रंगाच्या दोन पट्ट्यांमुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.
वर्णन
[संपादन]पट्टे कादंब पक्ष्याचा बांधा साधरणतः उंच असतो. यांची मान उंच असते. पक्ष्याच्या रंगात करडा, राखाडी व पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पाठीवरचे पंख हे साधारणपणे तांबूस राखाडी रंगाचे असून चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. चोचीवर काळा ठिपका असतो. हा पाणपक्षी असून शाकाहारी आहे.याचे वजन सुमारे २ ते ३ किलो असू शकते.ते २०००० फूट उंचीवरून उडू शकतात.त्यांची स्थलांतराचे वेळी उडण्याची गती सुमारे ८० कि.मी प्रती तास राहते.ते सुमारे १५०० - १६०० किमीचा प्रवास दररोज करू शकतात.ते स्थलांतर करतांना हवामानातील व्यापक बदल सहन करू शकतात.
वस्ती
[संपादन]जेथे अन्न उपलब्ध असते असे शेत किंवा दलदल, पाणवठा, नदीकाठ/तलाव वगैरे ठिकाणी पट्ट कादंबांची वसती असते.
खाद्य
[संपादन]पट्ट कादंब पक्षी हा कंद, झाडांची मुळे, पिकांचे कोवळे कोंब, ओंब्या, धान्य व डाळी खातो. हा कळपाने रहाणारा पक्षी आहे. त्याचे कळपच्या कळप शेतातील पिकांवर उतरतात व पिकांचे नुकसान करतात, म्हणून भारतात याची शिकारही मोठ्या प्रमाणावर होते.
पुनरुत्पादन
[संपादन]हे पक्षी जमिनीवर घरटी करतात. सुमारे २५ सेंटिमीटर व्यासाच्या खळग्यात चिखल व पिसांचा उपयोग करून त्याच्या भोवती कडा बांधतात. क्वचितच, पाण्यातील वनस्पती किंवा गवत हे एकत्र करून त्यावर पट्ट कादंबाची मादी अंडी घालते. ती एकावेळी ३ ते ६ असतात.त्यांचा रंग पांढरा असून ती टणक कवचाची असतात.
रोगवाहक
[संपादन]हा पक्षी बर्ड फ्लू वाहक म्हणून नोंदविला गेला आहे.