उद्धव स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव याच्यासाठी बनविलेली गोमय मारुतीची मूर्ती
टाकळी येथील रामपंचायतन

आख्यायिका : नाशिक जवळील दशकपंचक गावचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत्यू पावल्यावर त्यांच्या पत्‍नी सती चालल्या होत्या. त्यासाठी नदीकिनारी आल्यावर त्यांना एक तेजःपुंज यती (समर्थ रामदास) नदीमध्ये डोळे मिटून जप करत असताना दिसले. त्यांना त्या स्त्रीने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज ऐकून समर्थांनी त्यांना 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. परंतु मृत्यू पावलेला पती व स्वतःही सती जाऊन मृत्यूला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्ऱ्या त्या स्त्रीने विचारले की हा आशीर्वाद कधी पूर्ण होईल? तेव्हा समर्थांनी हा आशीर्वाद रामाचा आहे असे सांगितले व मंत्र सामर्थ्याने त्या प्रेतास जिवंत केले. या दांपत्याला पुढे आठ मुले झाली. त्यातील पहिले म्हणजे उद्धव होते. उद्धवस्वामींच्या आई वडिलांनी त्यांना समर्थ चरणी अर्पण केले.

अन्य इतिहास : नाशिकजवळच्या दशपंचक गावचे सदाशिव दशपुत्रे (कुलकर्णी) आणि त्यांची पत्‍नी उमाबाई यांच्या पोटी झालेला उद्धव नावाचा पुत्र (जन्म : इ.स.१६२७) आईवडिलांनी रामदास स्वामींच्या स्वाधीन केला. रामदासांनी त्याला आपला शिष्य करून घेतले. हा रामदास स्वामींचा पहिला शिष्य. गोदावरीच्या पूर्वेला टाकळी गावात रामदासांचा आद्य मठ होता. समर्थ संप्रदायाची दीक्षा दिल्यानंतर त्या मठाचे अधिपत्य स्वामींनी उद्धवकडे सोपवले, आणि उद्धव हे उद्धवस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे इंदुरबोधन (मनमाड-हैदराबाद रस्त्यावरील हल्लीचे निजामाबाद) या गावी दुसरा मठ स्थापन केल्यावर, रामदास स्वामींनी तोही उद्धवस्वामींना चालवायला दिला. या दोन्ही मठांत उद्धवस्वामींच्या परंपरा सापडतात.

समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले आणि उद्धवस्वामींची मठपती म्हणून नियुक्ती केली

जांबेहून समर्थ सारंगपूर येथे आले. हे ठिकाण आंध्र प्रदेशात निजामाबाद्पासून सुमारे १५ मैलांवर आहे.त्या वर्षी आंध्र प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला होता.सर्वसामान्य प्रजा घोटभर पाण्यासाठी वणवण हिंडत होती. समर्थांनी सारंगपूरला पाहिले, की एका सरोवरात ६० ब्राम्हण उभे राहून काही तरी अनुष्ठान करत होते. समर्थांच्या बरोबर त्यांचा लाडका शिष्य उद्धव होता. समर्थांच्या सांगण्यावरून उद्धवने त्या ब्राम्हणांची भेट घेतली आणि अनुष्ठानाचे प्रयोजन विचारले. सारंगपूरच्या यवन अधिकाऱ्याने दुष्काळासाठी या साठही ब्राम्हणांना वेठीला धरले होते. त्या ब्राम्हणांना पाऊस पडेपर्यंत घरी जाता येणार नव्हते. पाऊस पडावा म्हणून त्यांना सक्तीने अनुष्ठानाला लावले होते. हे सर्व प्रकरण कळल्यावर समर्थांनी त्या सरोवराशेजारील डोंगरावर हनुमंताची मूर्ती तयार केली.त्या मूर्तीवर भगवे वस्त्र ठेवले आणि ब्राम्हणांना सांगितले की, तुम्ही जर या हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला तर नक्की पाऊस पडेल. ब्राम्हणांना मोठी आशा वाटली.

समर्थाचे तेज पाहून त्यांनी मोठ्या श्रद्धेने हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला. त्यासरशी धो-धो पाऊस सुरू झाला. ब्राम्हण आनंदले. त्यांची सुटका झाली. ही वार्ता कळताच निजामाबादच्या सुलतानाने समर्थांना सन्मानपूर्वक निजामबादला नेले. त्यांना मठासाठी ५० एकर जमीन दान दिली. तिथे समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले आणि उद्धवस्वामींची मठपती म्हणून नियुक्ती केली. याच उद्धवांनी निजामाबादहून समर्थांना पत्र लिहिले. त्यात प्रार्थना केली -

"मला वाटते अंतरी त्वां वसावे | तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे | अपत्यापरी पाजवी प्रेमरसा | महाराज्या सद्गुरू रामदासा ||'

टाकळी येथे समर्थांनी त्यांना गोमयाची मारुतीची मूर्ती दिली. १६३३ च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतःच्या हातांनी ह्या गोमयी मिश्रणाच्या मूर्तीची स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती. पुढे रामदास स्वामींनी आणखी दहा मारुती स्वहस्ते स्थापन केले.

उद्धवस्वामींचे देहावसान शके १६३२मध्ये (इ.स.१७१०मध्ये) फाल्गुन पक्षातल्या शुद्ध प्रतिपदेला बुधवारी सूर्योदयाच्या वेळी झाले, असे इंदुरबोधन मठातील एका बाडात लिहिलेले आहे. उद्धवस्वामींची मुख्य समाधी टाकळीला आहे, आणि पूजेसाठी दुसरी समाधी इंदुरबोधन मठात बांधलेली आहे.

उद्धवस्वामींची काव्यरचना श्लोक, पदे, प्रकरणे या स्वरूपाची आहे. त्यांतील वर्णनावरून उद्धवस्वामींची रामदासांवर अतिशय निष्ठा असल्याचे कळून येते. त्यांनी शिवराम या नावानेही काही रचना केल्या आहेत.

  • आम्हीहि पाषाण श्रीनें कमावीलों । शिवराम जालों पावन चि॥ असे त्यांनी लिहून ठेवले आहे. उद्धवस्वामींनी रामदास स्वामींचे गद्य चरित्र लिहिले आहे, असे म्हणतात, पण अजूनपर्यंत ते सापडलेले नाही.

शं.श्री.देव यांनी ’श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी’ असे नाव असलेले उद्धवस्वामींचे चरित्र लिहिले आहे.