Jump to content

सारोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सारोळा हे औरंगाबाद जिल्ह्यातील वनपर्यटन केंद्र आहे.औरंगाबाद शहरापासून सुमारे २४ कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १००० मी. उंच असल्याने याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.डोंगरांच्या कुशीत वसलेले आणि गर्द वनात लपलेले सारोळा हे औरंगाबादवासीयांसाठी एकदिवसीय सहलीवर जाण्याचे उत्तम ठिकाण आहे. म्हैसमाळच्या तुलनेत हे स्थळ अजून फारसे प्रसिद्ध नाही. इ.स. २००८ पासून या ठिकाणाच्या विकासाला सुरुवात झाली आहे.

काय पाहावे

[संपादन]

सारोळा येथे निसर्गदृश्य पाहण्याकरिता वनविभागाने दोन व्ह्यू पॉईंट तयार केले आहेत.त्यातील पहिला व्ह्यू पॉईंट समोरील बाजूस येतो. हा व्ह्यू पॉईंट सुमारे ४५ मीटर लांब असून इथे वर एक आरामगृह आहे. वाहन जाण्याकरिता केलेल्या रस्त्याने न जाता कड्याशेजारी असलेल्या मंदिरामागून एक चढाईची वाट आहे तिथून सरळ वरच्या बाजूला जाता येते. या व्ह्यू पॉईंटला उभे राहून सारोळा डोंगराची मागची बाजू, या सारोळा गावाबाजूची डोंगररांग, दऱ्या यांचे नितांत सुंदर दर्शन करता येते. येथे वनविभागाने एक टुमदार पॅगोडा उभारला आहे. बराच वेळ वाट पाहिल्यास खालच्या जंगलातील मोरांचे गीतगान इथे ऐकता येऊ शकते.

यातील दुसरा व्ह्यू पॉईंट हा दुसऱ्या कड्यावर उभारला आहे परंतु इथे वाहने नेण्याची वाट कधी न वापरल्याने उपयोगात नाही. पहिला कडा उतरून पुन्हा हा चढताना मात्र गर्द झाडीतून वाट काढावी लागते. गर्द झाडीझुडपांतून वाट चढत वर गेल्यावर लांबलचक पसरलेला पठाराचा भाग दिसतो. इथे वनविभागाने एक वॉच टॉवर उभा केला आहे. यातून या पठाराचे विहंगम दृश्य पाहता येते. या व्ह्यू पॉईंट वरून एकीकडे सुंदर पठार तर दुसरीकडे सारोळा डोंगराची विरुद्ध बाजू अर्थात औरंगाबाद शहराकडील बाजू न्याहाळता येते. औरंगाबाद शहराच्या दिशेला हर्सूलचा भव्य तलाव नजरेस पडू शकतो. पूर्व पश्चिम पसरलेल्या औरंगाबादची धूसर प्रतिमा दिसते. वातावरण स्वच्छ असल्यास हडकोतील दूरदर्शनचा उंच टॉवर, तसेच चिखलठाण्याचा नवीन विमानतळ यांचा अंदाज बांधता येतो. आडव्या पसरलेल्या डोंगररांगा यांच्या मधोमध वसलेले औरंगाबाद शहर इतिहास काळात कसे सुरक्षित ठेवता आले असेल याची कल्पना येते.

कडा उतरून खाली आल्यावर एक छोटेसे गणपती मंदिर आहे.या मंदिराच्या शेजारीच दगडात कोरलेला पाण्याचा हौद (टाक) आहे.जमिनीतील झऱ्यातून येणारे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे येथील भक्त सांगतात. हा हौद कधी खोदला ह्याबद्दल निश्चित माहिती नसली तरी हा पुरातनकालीन असावा.

येथून खालच्या बाजूस देखील दाट झाडी आहे, पण थोडे खाली उतरल्यास इथे एका सुंदर ओढ्याचा उगम नजरेस पडतो. तसे भरपूर पाउस झाला असेल तरच ह्या ओढ्याला पाणी असते इतर वेळी हा कोरडाच असतो.ओढ्यातूनच खाली उतरल्यास वाट शोधत थेट जिथे वाहन सोडले तिथे उतरता येऊ शकते. वाटेत कुणा भक्ताची समाधी देखील नजरेस पडते.

जाण्याचा मार्ग

[संपादन]

औरंगाबादहून अजिंठ्याच्या दिशेने जाताना वाटेत छोटासा चौका घाट लागतो, त्याला ओलांडून पुढे आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्यालय आहे, त्याच्या थोडे पुढे उजव्या हाताला वनविभागाच्या सारोळा उपहारगृहाची पाटी आहे, तिथून आत वळले की रस्ता थेट सारोळा गावात जातो. इथे जाण्याकरिता स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे. वर्दळ नसल्यामुळे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. घाटमाथ्याचा रस्ता व तुरळक वस्ती यामुळे उत्तम स्थितीत असणारे वाहनच वापरणे हिताचे ठरते.

अंतर

[संपादन]

सुमारे २४ कि.मी.(औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानकापासून)

इतर सूचना

[संपादन]

हे स्थळ अद्याप प्रकाशझोतात आलेले नसल्याने सुट्टीचे दिवस वगळता इथे अजिबात वर्दळ नसते,त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न म्हणून समूहानेच गेलेले उत्तम.सोबत थोडे फार खाद्यपदार्थ व मुबलक पाणी असू द्यावे.