माणकेश्वर शिव मंदिर (भायखळा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणकेश्वर शिव मंदिर हे मुंबईच्या माझगाव भागातील एक मंदिर आहे.


मुंबई शहरातील भायखळा रेल्वे स्टेशनाच्या पूर्वेस पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले हे भव्य मंदिर भायखळा पोलीस ठाण्याच्या बाजूच्या हंसराज लेन येथे आहे. मंदिर मुख्य रस्त्यापासून थोडेसे आतील बाजूस असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत नसते.

माणकेश्वराचे हे मंदिर बहुधा हंसराज करमशी रणमल यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर केव्हातरी बांधले असावे. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात केले आहे. मंदिराच्या आवारात एक उंच दीपमाळ आहे. मंदिराचा सभामंडप चांगला मोठा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सुरुवातीला गणपतीची मूर्ती लागते. डाव्या बाजूला श्री लक्ष्मीनारायणाची उजव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे. तसेच जवळपास काळभैरवाची व शीतलादेवीची मूर्ती आहे. या सगळ्यांच्या मध्यभागी दोन तीन पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिराचा मुख्य गाभारा लागतो. गाभाऱ्याच्या मध्यभागी महादेवाचे शिवलिंग असून पार्वतीची मूर्ती आहे. या शिवलिंगासच माणकेश्वर म्हणतात. महादेवाच्या पिंडीसमोरच काळ्या दगडात बनवलेला ४ फुटी नंदी आहे. डोक्यावर एक घंटादेखील आहे. मंदिराचा पूर्ण हिस्सा नक्षीकामाने नटलेला असला तरी गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील व प्रवेशद्वाराच्याखाली असलेले नक्षीकाम अधिक चांगले आहे. सभामंडपात आणि प्रदक्षिणामार्गावर आणखीही देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिराची उंची जमिनीपासून कळसापर्यंत जवळपास ५० फूट इतकी आहे. कळसापर्यंत केलेले नक्षीकाम व एकूण रचना पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर मंदिराची आठवण करून देते. येथे येणाऱ्या भाविकांना येथील कैलासपती वृक्षाचे फार आकर्षण वाटते.

माणकेश्वर मंदिरात दर.सोमवारी भक्तांचा ओघ थोडा जास्तच असतो. या मंदिरात होणारा महाशिवरात्रीचा उत्सव पूर्ण सात दिवसांचा असतो. यांत अखंड हरिनाम पठण, भजने व कीर्तनेही होतात. त्या काळात मंदिरात अगदी पहाटेपासून लोकांची रीघ लागलेली असते.