प्रतिजैविक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रतिजैविके हा रासायनिक उपचारपद्धतीतील अशा सर्वसाधारण औषधांचा गट आहे ज्यांचा वापर जीवाणू, बुरशीप्रोटोझोआ आदि सूक्ष्मजीवांवर उपचार म्हणून केला जातो. आधुनिक शास्त्राने मानवाला दिलेले हे एक वरदान असून जगातील १० सर्वात प्रभावी विज्ञानाच्या शोधांमधील ते एक आहे. एकोणिसाव्या शतकात प्रतीजैविकांवर मोठं प्रमाणात संशोधन झाले आहे. प्रतीजैविकांचे अनेक वर्ग आहेत.

सर अलेक्झांडर फ्लेमिंग (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५) हे स्कॉटलंडमधील अतिशय बुद्धिमान संशोधक होते. पण त्यांची प्रयोगशाळा मात्र अत्यंत अव्यवस्थित असे. ३ सप्टेंबर १९२८ रोजी फ्लेमिंग काही दिवसांच्या सुटीनंतर प्रयोगशाळेत काम करण्यासाठी परतले. सुटीवर जाण्यापूर्वी त्यांनी स्टॅफायलोकोकाय जातीच्या जीवाणूंच्या प्लेट्स टेबलवर ठेवल्या होत्या. त्या फार काळ तशाच राहिल्याने त्यांना बुरशी आली होती. त्या प्लेट्स बघताना फ्लेमिंग यांना असे आढळले की बुरशीच्या लगतचे स्टॅफायलोकोकायचे जीवाणू नष्ट झाले आहेत, परंतु बुरशीपासून लांब असणारे जीवाणू मात्र तसेच आहेत. पुढील संशोधनातून फ्लेमिंग यांनी या बुरशीपासून तयार होणाऱ्या आणि जीवाणूंना नष्ट करणाऱ्या पदार्थाला नाव दिले पेनिसिलीन आणि ॲंटिबायोटिक्स युगाचा जन्म झाला.

१९४० पर्यंत आपल्याकडे सूक्ष्म रोगजंतूंविरुद्ध लढण्यासाठी कोणतेच अस्त्र नव्हते. कोणत्याही प्रकारच्या जंतूसंसर्गामुळे मृत्यू घडत होते. जगज्जेत्या नेपोलीयनचे सैन्य गारद करणाऱ्या जीवाणूंना (बॅक्टेरिआ) रोखण्यासाठी पेनिसिलीनचा शोध महत्त्वाचा ठरला. त्यानंतर टेट्रासायक्लिन, स्ट्रेप्टोमायसिन, सिप्रोफ्लोक्सासिन आणि अशा अनेक ॲंटिबायोटिक्सची फलटणच तयार झाली.

त्यानंतरच्या काळात जादुई उपाय समजून ॲंटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात अनिर्बंध वापर केला गेला. ॲंटिबायोटिक्सचा कोर्स जाणते व अजाणतेपणी अर्धवट सोडणे, साध्या सर्दीसाठी (जे विषाणूनिर्मित इन्फेक्शन आहे व त्यासाठी ॲंटिबायोटिक्सचा काहीही उपयोग होत नाही) व इतर किरकोळ आजारांसाठी स्वमनाने जाऊन ‘स्ट्रॉंग औषध’ म्हणून ॲंटिबायोटिक्स खरेदी करणे, फार्मासिस्टनी प्रिस्क्रिप्शनशिवाय काउंटरवर ॲंटिबायोटिक्सची विक्री करणे, डॉक्टरांनीनको इतका ॲंटिबायोटिक्सचा मारा रुग्णांवर करणे, गरज नसेल तेव्हाही अधिक पॉवरफुल ॲंटिबायोटिक्स वापरणे, प्रशासनाने औषधविषयक कायद्यांची कडक अमलबजावणी न करणे, हॉस्पिटलमध्ये ‘इन्फेक्शन कंट्रोल’चे पथ्य न पाळणे अशा अनेक चुकीच्या बाबी सर्रास घडत आहेत. चुकीच्या वापरामुळे जंतूंना ॲंटिबायोटिक्सची कामाची पद्धत ओळखण्याची संधी मिळते व त्या ॲंटिबायोटिक्सना चकवा देण्यासाठी मग ते स्वताला बदलवतात. त्यांच्या नवीन पिढ्या पूर्वी चुकीच्या पद्धतीने वापरलेल्या ॲंटिबायोटिक्सना मुळीच दाद देत नाहीत व ‘ॲंटिबायोटिक्स रेसिस्टंस’ निर्माण होतो. औषध घेऊनही काहीही परिणाम होत नाही. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपल्या पुढील संशोधनातून जगाला सावध केले होते की, ॲंटिबायोटिक्सच्या चुकीच्या वापरामुळे ॲंटिबायोटिक्स रेसिस्टंस (प्रतिरोध) निर्माण होऊ शकतो. फार कमी प्रमाणात वा कमी काळासाठी ॲंटिबायोटिक्स वापरू नये तसेच गरज नसताना ॲंटिबायोटिक्सचा वापर करू नये हे फ्लेमिंग यांनी त्यांच्या जगभर झालेल्या अनेक भाषणातूनही सांगितले होते. अलीकडे हे जीवाणू इतके प्रबळ झाले आहेत की आपल्याकडील सर्वात प्रभावी ॲंटिबायोटिक्ससुद्धा निष्प्रभ ठरत आहेत. हे टाळण्यासाठी ॲंटिबायोटिक्स वापरताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ॲंटिबायोटिक्स केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. कोर्स पूर्ण होण्यापूर्वीच बरे वाटू लागले तरीही कोर्स पूर्ण करावा तसेच वेळच्या वेळी व न चुकता डोस घ्यावा. किरकोळ आजारांसाठी डॉक्टर वा फार्मासिस्टकडे ॲंटिबायोटिक्सचा आग्रह धरू नये. मुळात ॲंटिबायोटिक्सचा वापर कमी करायला लागावा यासाठी जंतूसंसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी साबण, पाण्याने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, लसीकरण, शुद्ध पाणी, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असे विविध पातळ्यांवरचे सर्वश्रुत उपाय अमलात आणणे जरुरीचे आहे. ॲंटिबायोटिक्सचा बेसुमार वापर करण्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. हे रोखले नाही तर पुढच्या पिढीसाठी कदाचित प्रभावी ॲंटिबायोटिक्स उरणारच नाहीत.