| पनवेल |
| जिल्हा |
रायगड |
| राज्य |
महाराष्ट्र |
| दूरध्वनी संकेतांक |
०२२ |
| टपाल संकेतांक |
४१०-२०६ |
| निर्वाचित प्रमुख |
प्रशांत ठाकूर
(आमदार) |
पनवेल हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, पनवेल तालुक्यातील एक नगरपालिका असलेले शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे गतिमार्ग येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून २१ कि.मी. अंतरावर आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे.
पनवेल गाधी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते.
२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३% तर महिला ४७% आहेत. शहरातील ७८% लोक साक्षर (पुरुष ८१%, महिला ७४%) असून १३% लोकसंख्या ६-वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल नगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन करते.
पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. या काळात मोगल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. समुद्रमार्गे व खुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.