घाटावरची महाकाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घाटावरची महाकाली सातारा जिल्ह्यातील सालपे घाटाच्यावर काहीश्या खोल दरीत असलेले ठिकाण आहे. येथे वसलेल्या या देवीलाही हेच नाव आहे.

सातारा-नीरा रस्त्यावर आदर्की फाटा लागतो. त्याच्या अगदी शेजारीच काहीसे खड्ड्यात एक पुरातन दगडी बांधकाम असलेले बुटक्या छताचे मंदिर आहे. गर्द झाडी, मोठे वटवृक्ष, खळखळत वाहणारा ओढा यांमुळे हे ठिकाण एकदिवसीय पर्यटनाला योग्य आहे.

महाकाली मंदिराच्या अगदी १०० मीटरपर्यंत जाईतो हे मंदिर आणि हा परिसर दिसत नाही. मंदिर परिसरात उतरताच पाण्याने भरलेला डोह आणि मोठे पिंपळ वृक्ष दिसतात. त्यांतील एका वृक्षाला पार बांधला आहे. त्याच्या खालून आठमाही वाहणारा झरा आहे. थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला थंड पाण्याचे टाके आणि बारव आहे.

मंदिराचे खांब दगडी कोरीव असून अखंड शिळेचे आहेत. गाभाऱ्यात संगमरवरी शुभ्र अशी महाकालीची मूर्ती आहे. मंदिरासमोर होमहवन कुंड, तर बाजूला उंच दीपमाळ आहे. अखंड वाहणाऱ्या ओढ्याच्या खळखळाटाने ऐन उन्हाळ्यातही हा परिसर थंड असतो.