गाबीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गाबीत हा समाज कोकणात सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतो. कोळी जमात ही वेगळी जमात आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. गाबीत ही स्वतंत्र जात आहे. राजपूत मराठा जातीपासून तुटून पडलेली अनेक घराणी गाबीत या जातीच्या नावाने ओळखली जातात. मराठ्यांचे आरमार नष्ट होईपर्यंत गाबीत शब्दाला विलक्षण प्रतिष्ठा होती. त्यानंतर त्याचे राहणीमान घसरत गेले.

गाबीत या क्षत्रिय आरमार घराण्याची वस्ती प्रामुख्याने किल्ला, समुद्र आणि खाडीच्या आसऱ्याने झालेली आढळते. रत्‍नागिरीचा किल्ला, जुवे जैतापूर, विजयदुर्ग, देवगड किल्ला, तारामुंबरी, मीठ मुंबरी, आचरे, सर्जेकोट, वेंगुर्ले, उभादांडा, शिरोडा, आरोंदा, केरा, तेरेखोल या ठिकाणी गाबीत लोकांच्या वस्त्या आहेत.

उकड्या तांदळाचा भात, माशाची कढी (आमटी-निस्त्याक), जोंधळ्याची वा तांदळाची भाकरी हे मुख्य अन्न, सकाळचा चहा क्वचित, परंतु उकड्या तांदळाची पेज असते. शेवग्याच्या शेंगाची भाजी, चवळी, कुळीथ, पावटे असली कडधान्ये अधूनमधून वापरतात. नाचणीच्या शेवया, तांदळाच्या पिठाचे घावणे, सणासुदीला कोंबड्याचे सागुती वडे किंवा आंबोळया यांव्यतिरिक्त पाहुणे सोयऱ्यासाठी खास स्वयंपाक असतो. दारू पिण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात आढळते. व्यसनाधीनतेचे प्रमाण बरेच कमी आढळते.

पुरुष पंचा धोतर नेसतात. अंगात बऱ्याच वेळा काही नसते. खांद्याला-डोक्याला टॉवेल बाहेर वा शहरात जाताना सदरा, शर्ट, टोपी घालतात. केसाला तेल चोपून भांग पाडण्याची सवय.

स्त्रिया नऊवारी लुगडे, चोळी मुली परकर-पोलकी घालतात. अलीकडे पाचवारी साडी, स्कर्ट व पंजाबी ड्रेसही घातला जातो. कपाळाला ठळक कुंकू असते. जुन्या बायका रेखीव चिरी अजूनही काढतात. गाबीत स्त्रियांना शृंगाराचे वळेसर व अबोलीचे सैल आंगडाभर घालण्याची हौस असते. पायात चांदीची जोडणी वेढणी घालतात. सोन्याच्या दागदागिन्यांचीही आवड असते..

गाबीत पुरुष काटक मजबूत बांध्याचा, असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारा आहे. सतत कष्ट करणारा, पराक्रमी, स्वाभिमानी व एकमेकांवर विश्वास ठेवणारा, अडीअडचणींना धावून जाण्याची वृत्ती त्यांच्यात आहे.

स्त्रिया सौजन्यशील, कुळवंत, वर्णाने गोऱ्या सावळ्या, अंगाने मजबूत थोड्याशा भांडखोर, घराचा सारा राबता पहाणाऱ्या, श्रद्धाळू व देवधर्म पाळणाऱ्या असतात. अलीकडे शिक्षणात आघाडीवर असतात.

सगोत्र विवाह काही घराण्यात वर्ज्य मानला जातो. एकाच कुळात लग्न संस्कार केला जात नाही. देवघरात देवक ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न कार्यात देवकाची पूजा होते. मामाच्या मुलीशी लग्न होते. पण आतेबहिणीशी लग्न वर्ज्य मानले जाते. लग्नाची मागणी वरपक्षाकडून किंवा वधू पक्षाकडूनही करण्यात येते. वधू पक्षाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास लग्न खर्चासाठी काही रक्कम वधूपक्षाला देज देण्याची प्रथा पूर्वी होती. साखरपुडा व लग्नाचे विधी सर्व कामे ब्राह्मणाकशून केली जातात. लग्नाच्या दिवशी संस्कारगाणी म्हटली जातात. विधवा पुनर्विवाहाची प्रथा अल्प प्रमाणात आहे. प्रेत दहन करण्याची प्रथा आहे.

गाबीत जात हिंदू धर्माचे पालन करतात. अनेकजण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. पंढरीची आषाढी, कार्तिकी वारी होते. काही घराण्यात रामदासी पंथाची उपासना चालते. गुरू घेण्याची पद्धत आहे. कोकणात जाऊन (गुरू जोगी नाथ पंथांची) गुरू दीक्षा घेण्यात येते.

संदर्भ[संपादन]