Jump to content

कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
नाव
स्थानिक नाव
नाव
भूगोल
गुणक 16°42′N 74°41′E / 16.700°N 74.683°E / 16.700; 74.683गुणक तळटिपा
संस्कृती
स्थापत्य
इतिहास व प्रशासन
खिद्रापूर मंदिर

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.[] हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली (चित्रपट) या मराठी चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.[] याव्यतिरिक्त 'विटी-दांडू व 'हिरवं कुंकू' या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाले आहे.

आख्यायिका

[संपादन]

येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले.[] त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

[संपादन]

साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी.[] पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे.[] येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्या राजा पुरकेशी द्वितीय याच्या काळात सुरू झाले. पण, काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहीले. नंतरच्या काळात शिलाहार राजांनी ते पूर्ण केले. दंतकथेशिवाय, कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नावावरून आले असावे, जे "कोप्पम" होते. शहराने दोन मोठ्या लढाया पाहिल्या. पहिले चालुक्य राजा अहवमल्ल आणि चोल राजा राजेंद्र यांच्यात 1058 मध्ये झाले. चोल राजा राजाधिराजाचा युद्धात मृत्यू झाला आणि दुसरा राजा राजेंद्र चोल याचा राज्याभिषेक रणांगणावरच झाला.

दुसरी लढाई शिलाहार राजा भोज-II आणि देवगिरी यादव राजा सिंघन-II यांच्यात झाली, ज्यामध्ये राजा भोज-II यादवांनी पकडले आणि पन्हाळा किल्ल्यावर बंदिवान करून ठेवले. मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळील 1213 सीईच्या शिलालेखात ही घटना नोंदवली गेली आहे. या लढाईने शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेची सत्ता संपुष्टात आणली. 

औरंगजेबाचा मिरज येथे सैन्य तळ असताना त्याच्या अज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली. तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पांचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे.

याठिकाणी एकूण दोन मंदिरे असून दुसरे जैन मंदिर आहे. जे शिलाहार राजांनी बांधले आहे. या जैन मंदिरातील शिल्पेही उत्कृष्ट असून पाहण्यासारखी आहे. मुंगूस खांद्यावर घेतलेल्या ललनेचे सुंदर शिल्प यामध्ये आहे. यामध्ये या ललनेच्या चेहऱ्यावरील भाव जीवंत भासतात. तसेच मुंगूस आणि त्याची दोरी अगदी हुबेहुब कोरण्यात आली आहे. हे मुंगूस आणि त्याच्या सोबतची ललना आपल्यासोबत आता बोलेल इतके हे शिल्प जीवंत आहे.

मंदिराचे सौंदर्य

[संपादन]

देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे. याला स्वर्ग मंडप म्हणतात. स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. याला हाताने कोरलेल्या ४८ खांबांचा आधार आहे. आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते, हे स्वर्ग मंडप नावाचे औचित्य सिद्ध करते. स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर, उंदीर, हत्ती इत्यादी दिसतात. जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात. मध्यभागी, आपण गर्भगृहात स्थित शिव कोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो. त्यामुळे एका नजरेत आपण त्रिदेव 'ब्रह्मा महेश विष्णू' पाहू शकतो. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पीठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे. मंदिराचा जीर्णोद्धार 1136 मध्ये यादव वंशातील राज सिंहदेव याने केल्याचा उल्लेख आहे.[]

या ठिकाणी असलेले मकर मुख हे शिल्पकलेचा  उत्कृष्ट नमुना आहे. सध्या या मकराचे मुख शिल्लक नसले तरी त्याची इतर रचना पाहता येथील शिल्पकलेची जाणीव होते. या मकराच्या नखे सुद्धा हुबेहुब कोरण्यात आली आहेत. मस्तक नसलेला हा मकर आता जीवंत होऊन धावेल इतकेते जीवंत भासतात. []

मंदिराची रचना

[संपादन]

मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्या[]ला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.

स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.

सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.

शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना

[संपादन]

केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादव राजा सिंघण यांचा एक शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.

कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत.[] गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात.[]

संरक्षित स्मारक

[संपादन]

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.[१०]

हे सुद्धा पहा

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kanhere, Gopal Krishna; Centre, Maharashtra Information (1989). The temples of Maharashtra (इंग्रजी भाषेत). Maharashtra Information Centre (Directorate-General of Information and Public Relations, Bombay), Govt. of Maharashtra. p. 107.
  2. ^ "रसिकांनी अनुभवला 'कटय़ार'चा असाही प्रवास!". Loksatta. 2016-02-16. 2018-07-02 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Kopeshwar: Unearthing Maharashtra's Khajuraho". 2018-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-30 रोजी पाहिले.
  4. ^ Foekema, Gerard (2003). Calukya architecture: medieval temples of northern Karnataka built during the rule of the Calukya of Kalyana and thereafter, AD 1000–1300 (इंग्रजी भाषेत). Munshiram Manoharlal Pub. ISBN 9788121510738.
  5. ^ Deshpande, Suresh Ragunath (1985-06-01). Yadava sculpture, western Maharashtra, 1000 A.D. to 1400 A.D. (इंग्रजी भाषेत). B.R. Pub. Corp.
  6. ^ SHARMA, JYOTI (2016-12-31). "श्री कृष्ण से संबंधित बंदिशों का आध्यात्मिक महत्व". Swar Sindhu. 4 (2): 37–40. doi:10.33913/ss.v04i02a06. ISSN 2320-7175.
  7. ^ SHARMA, JYOTI (2016-12-31). "श्री कृष्ण से संबंधित बंदिशों का आध्यात्मिक महत्व". Swar Sindhu. 4 (2): 37–40. doi:10.33913/ss.v04i02a06. ISSN 2320-7175.
  8. ^ Deglurkar, B. (2004). Portrayal of the woman in the art and literature of the ancient Deccan (इंग्रजी भाषेत). Publication Scheme.
  9. ^ Tetvilkar, Sadashiv (2018-01-25). Hero Stones of Maharashtra (इंग्रजी भाषेत). BRONATO.com.
  10. ^ "कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स" (इंग्रजी भाषेत). 2013-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जुलै इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)