केशवराव सोनवणे
सहकार महर्षी केशवराव सोनवणे | |
मतदारसंघ | लातूर |
---|---|
जन्म | ४ फेब्रुवारी इ.स. १९२५ लातूर जिल्हा |
मृत्यू | ८ नोव्हेंबर इ.स. २००६ लातूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | कडूबाई केशवराव सोनवणे |
व्यवसाय | राजकारणी |
केशवराव सोनवणे (जन्म : लातूर जिल्हा, ४ फेब्रुवारी इ.स. १९२५; - लातूर, ८ नोव्हेंबर, इ.स. २००६) हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते. ते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते औसा मतदारसंघातून दोन वेळा व लातूर मतदारसंघातून दोन वेळा असे एकून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.[१]
संक्षिप्त परिचय
[संपादन]केशवराव सोनवणे औसा तालुक्यातील मोगरगा गावचे रहिवासी. त्यांचे शालेय शिक्षण लातूरमध्ये झाले. त्यानंतर ते हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठातून बी.ए. एल्एल्बी. झाले. शिक्षण संपवून ते लातुरात आले. केशवराव सोनवणे यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये झाला. इ.स. १९५७ ला ते आमदार म्हणून लातूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले. पुन्हा इ.स. १९६२ मध्ये लातूर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी ५ वर्ष सहकारमंत्री म्हणून काम केलं. ५ वर्षात त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळांत काम केले. कै. वैकुंठभाई मेहता, कै. धनंजय गाडगीळ यांच्यासारख्या दिग्गजांकडून 'सहकार महर्षी' म्हणून केशवराव सोनवणे यांना पदवी मिळाली.
केशवराव सोनवणे यांनी महाराष्ट्रात सहकाराचे जाळे उभे केले. केशवराव सोनवणे व त्यांचे वडील बंधू माणिकराव सोनवणे यांच्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खास प्रेम होते. सोनवणे यांनी लातूरला पहिली सहकारी ऑईल इंडस्ट्री (डालडा फॅक्टरी) उभी केली. लातूरला जवाहर सूतगिरणी, तेरणा साखर कारखाना, किल्लारी साखर कारखाना वगैरेंची उभारणी केशवरावजी सोनवणे यांच्याच काळात झाली. त्यांनी वकिलीही केली. त्यांच्या काळात लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली. जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ तालुक्यात त्यांची पकड होती. त्यांना तीन मुलगे व चार मुली आहेत. त्यांचे जेष्ठ चिरंजीव दिलीपराव सोनवणे यांनी लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिवपद भूषवीले होते.
राजकीय कारकीर्द
[संपादन]यशवंतराव चव्हाणांनी इ.स. १९५७ मध्ये केशवरावांचे मोठे बंधू माणिकराव यांना लातूर येथून काँग्रेसतर्फे विधानसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी आपल्याऐवजी " मित्र चंद्रशेखर वाजपेयी यांना उमेदवारी द्या ", असे सांगितले. यशवंतरावांनी "आम्ही सोनवणेच्या घरात तिकीट द्यायचे ठरवले आहे ", असे म्हटल्यावर माणिकरावांनी नुकतेच वकील झालेल्या केशवरावांचे नाव सुचविले. विधानसभेची ती निवडणूक लढवून केशवराव पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सन १९५७ ते ६७ अशी सलग दहा वर्षे केशवराव लातूरचे आमदार होते. इ.स. १९६२ ते ६७ या काळात ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री होते. पुढे इ.स. १९७१ ते ८० अशी दहा वर्षे ते आमदार म्हणून औसातून निवडून येत होते. सहकारमंत्री असताना महाराष्ट्रात सहकाराचे जाळे पसरविण्यासाठी केशवरावांनी खूप परिश्रम घेतले.[२]
केशवरावांनी शिवराज पाटील यांना लातूर मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळविण्यासाठी मदत केली़ होती.[३] इ.स. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री केशवराव सोनवणे यांनी काँग्रेसतर्फे औसा विधानसेची निवडणुक लढवीली व ते निवडुन आले.त्यानंतर काँग्रेस पक्षात फुट पडली आणि इंदीरा काँग्रेस व काँग्रेस निर्माण झाले. नंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा केशवराव सोनवणे यांनी काँग्रेसतर्फे निवडणुक लढवुन विजयी झाले.[४]
लढलेल्या निवडणुका
[संपादन]वर्ष | मतदार संघ | पक्ष | परिणाम | मतसंख्या | विरोधी उमेदवार | विरोधी पक्ष | विरोधी पक्ष मतसंख्या |
---|---|---|---|---|---|---|---|
१९५७ | लातूर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | विजयी | १४७८५ | विठ्ठलराव केळगावकर | IND | १२१७८ [५] |
१९६२ | लातूर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | विजयी | २३०४९ | रामचंद्र गोविंद /बाबासाहेब परांजपे | IND | १४०३६ [६] |
१९६७ | लातूर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | पराभूत | २४४७० | बापू काळदाते | SSP | २८९४८ [७] |
१९७२ | औसा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | विजयी | ४४१५३ | दिनकरराव फतेपूरकर | CPI | १४२१६ [८] |
१९७८ | औसा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | विजयी | १९३२१ | पाटील माधवराव संतराम | IND | १४०३६ [९] |
सामाजिक कार्य
[संपादन]लातूर पूर्वी ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात होते त्या जिल्ह्यात केशवरावांनी जिल्हा बँक आणली. त्यांनी तेरणा सहकारी साखर कारखाना, किल्लारी साखर कारखाना, जवाहर सूतगिरणी यांची स्थापना करवली. त्यांच्याच प्रयत्नाने उस्मानाबाद जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी डालडाची फॅक्टरी सुरू झाली. जिल्ह्यातील सहकाराची मुहूर्तमेढच त्यांनी रोवली. त्यांनीच इ.स. १९६३ मध्ये बाजार समितीचा कायदा तयार केला. त्यांची राहणी इतकी साधी होती की, ते कधीही विश्रामगृहावर थांबले नाहीत. स्वतःचा बाडबिस्तारा कायम सोबत ठेवत. लातूरच्या राहत्या घरात बाहेरच्या बाजूला बेडिंग टाकून रात्री दोन-दोन वाजेपर्यंत ते कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत व तेथेच झोपत.केशवराव हे काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा प्रदेश समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी बहुजन समाजाच्या अनेक होतकरू मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या आणि काहींना राजकारणात पुढे आणले.
महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत विश्वासू महाराष्ट्रात सहकाराचे जाळे उभे करणारे जुन्या पिढीतील धुरंदर राजकारणी म्हणून सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचे नाव अग्रेसर घ्यावे लागेल. सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवून महाराष्ट्राचा लौकिक वाढविणारे केशवराव सोनवणे मात्र कुठल्याही सहकार संस्थेवर स्वतः राहिले नाहीत हे त्यांचे मोठेपणच आजच्या सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरेल. सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचा जन्म इ.स. १९२५ या साली झाला. लातूर येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये दहावी पास झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठ गाठले. एल्एल. बी. पूर्ण करून त्यांनी लातुरात वकिली व्यवसायाला सुरुवात केली.
इ.स. १९५७ मध्ये मुंबई विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या निरोपावरून निवडणूक लढवली. इ.स. १९५७ मध्ये शेकापचे ॲड. विठ्ठालराव केळगावकर यांचा पराभव केला. त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राच्या इ.स. १९६२ च्या निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाचे बाबासाहेब परांजपे यांचा पराभव केला. या दरम्यान इ.स.१९६२ ते ६७ पर्यंत तब्बल पाच वर्षे महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम आजच्या सहकार चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.
कै. वैकुंठभाई मेहता, कै. धनंजय गाडगीळ यांच्यासारख्या दिग्गजांकडून 'सहकार महर्षी' म्हणून केशवराव सोनवणे यांना पदवी मिळाली. सहकारमंत्री म्हणून त्यांनी आशिया खंडातील सहकार तत्त्वावरील पहिली तेल गिरणी (डालडा फॅक्टरी) लातूर येथे उभी केली. डालडा फॅक्टरी व जवाहर सूतगिरणीची उभारणी करून केशवरावांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, तेरणा सहकारी साखर कारखाना, उदगीरची दुध डेरी, जिल्हा बँक यांची स्थापना करून, दयानंद शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. जिल्ह्यासह महाराष्ट्रात सहकाराची सुरुवात करणाऱ्या त्यांनीमात्र कुठल्याही संस्थेवर स्वतः न राहता ती उत्तमरीत्या चालवून दाखवली.
लातुरात आज उभी असलेली सातमजली बँकेची इमारतसुद्धा केशवराव सोनवणे यांच्याच काळात उभी राहिली. त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान पाहून, व महाराष्ट्राचे आद्य सहकार चळवळीचे नेते म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा यशवंतराव चव्हाण यांनी गौरव केला होता. इ.स. १९७२ मध्ये औसा विधानसभेत शेकापचे दिनकरराव फत्तेपुरकर यांचा पराभव करून केशवराव यांनी तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ तालुक्यांवर आपली राजकीय पकड निर्माण केली. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये अपक्ष माधवराव पाटील यांनाही पराभूत केले. इ.स. १९७८ मध्ये शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात केशवराव सोनवणे यांचा फार मोठा वाटा होता.. मात्र शरद पवारांनी त्यांचीही पुढे आठवण ठेवली नाही.[१०][११] त्यानंतर राजकारणातून निवृत्ती पत्करलेले केशवराव सोनवणे यांनी राजकारणात व सहकार चळवळीत मार्गदर्शकाची भूमिका वठवली.
दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केशवरावांनी केलेले शैक्षणिक काम मराठवाड्यासाठी भूषणावह आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची मोठी हानी झाली व सहकार चळवळीचा मार्गदर्शक हरवला. सहकार चळवळीचा आद्य महर्षी काळाच्या पडद्याआड कायमचा निघून गेला. त्यांनी सहकार चळवळीत घालून दिलेले आदर्श आजच्या सहकार चळवळीला निश्चितच मार्गदर्शक आहेत. सहकार क्षेत्र उभे केले, मात्र कुठल्याही सहकारी संस्थेवर स्वतः न राहता त्या उत्तमरीत्या चालवून दाखविल्या. त्यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीला देश पातळीवर पोहोचविण्याचे काम केशवराव सोनवण्यांनी केले. लातूर शहर विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान ज्येष्ठ समाजवादी नेते मनोहरराव गोमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन "दिवंगत केशवराव सोनवणे यांनी लातूरमध्ये उभ्या केलेल्या संस्था देशमुख कुटुंबीयांनी बुडवल्या" अशा शब्दांत लातूर शहरमधील काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली.[१२]
निधन
[संपादन]केशवराव सोनवणे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Ausa (Maharashtra) Election Results 2014, Current and Previous MLA". elections.in. 2015-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "Loksatta(Marathi Newspaper)". loksatta.com. 2016-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "ODYSSEY OF MY LIFE". google.co.in. 18 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "मुख्यमंत्र्यांचं नाक अद्याप शाबूत - Janshakti | DailyHunt". eSakal. 2019-10-24 रोजी पाहिले.
- ^ भारत निर्वाचन आयोग(१९५७)
- ^ "भारत निवडणूक आयोग(१९६२)". 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-23 रोजी पाहिले.
- ^ "भारत निर्वाचन आयोग(१९६७)". 2016-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-23 रोजी पाहिले.
- ^ "भारत निर्वाचन आयोग(१९७२)". 2016-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-23 रोजी पाहिले.
- ^ "भारत निर्वाचन आयोग(१९७८)". 2016-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-23 रोजी पाहिले.
- ^ "शरद पवारांचा खिसा फाटलाय". ejanshakti.com. 26 May 2018 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "राष्ट्रवादीची पडझड सुरूच! - Janshakti | DailyHunt". DailyHunt. 2018-06-03 रोजी पाहिले.
- ^ "महिन्यातले २८ दिवस मुंबईत राहणारे, दुपारी २ वाजता उठणारे आमदार लातूरला नकोत - DivyaMarathi | DivyaMarathi". DivyaMarathi. 2019-10-10 रोजी पाहिले.