कबीर
संत कबीर हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे मोठे पुरस्कर्ते होते. किंबहुना कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे प्रमुख होत. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरुप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप पांडुरंगाची लेकरे आहेत.

