Jump to content

रत्‍नाकर बापूराव मंचरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डॉ. रत्‍नाकर बापूराव मंचरकर तथा र. बा. मंचरकर (इ.स. १९४३ - १२ फेब्रुवारी, इ.स. २०१२, अहमदनगर, महाराष्ट्र) हे मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक होते. अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातून ते उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

कारकीर्द

[संपादन]

प्रा. मंचरकर हे समीक्षक, साहित्यसंशोधक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. व्यासंग करून व ३७ पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन करून त्यांनी ही मान्यता मिळवली होती. समीक्षाक्षेत्रात त्यांचा विशेष दबदबा होता. संत साहित्याचे संशोधन करून त्यांनी त्याचाही गाढा व्यासंग केला होता. धर्म आणि संप्रदाय, साहित्य समीक्षा प्रदीप, मुक्तेश्वरकृत महाभारत - एक अभ्यास असे अनेक संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारासह ग्रंथलेखनासाठी असलेले अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.

बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, यशवंत मनोहर, भास्कर चंदनशिव, लहू कानडे अशा अनेकांच्या साहित्यावर लिहून त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्‍न डॉ. र.बा. मंचरकरांनी केला. त्यासाठी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने त्यांना त्यांच्या निवासस्थानी येऊन पुरस्कार देण्यात आला होता. (२९ डिसेंबर, इ.स. २०११).

मंचरकरांच्या नावाने अहमदनगर येथे ’डॉ. र.बा. मंचरकर स्मृति प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानतर्फे संत साहित्यावरील ग्रंथलेखनासाठी डॉ. र.बा. मंचरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. डॉ. विलास खोले यांना इ.स. २०१४ साली हा पुरस्कार देण्यात आला.

चं.वि. जोशी आणि काही इतर लेखकांनी ’साहित्याचा अभ्यास’ नावाचा एक ’गुरुवर्य डॉ. र.बा. मंचरकर सद्‌भाव ग्रंथ’ संपादित केला आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • तौलनिक साहित्य आणि मध्ययुगीन मराठी वाङ्‌मय
  • धर्मसंप्रदाय आणि मध्ययुगीन मराठी वाङ्‍मय
  • भाषा शास्त्र - विचार
  • मुक्तेश्र्वरांची कविता (वाङ्‌मयीन अभ्यास खंड १ला : आख्यानक व स्फुट कविता)
  • मुक्तेश्र्वरांची कविता खंड २ रा (संक्षेप रामायण)
  • मुक्तेश्र्वरांची कविता खंड ३ रा (महाभारत)
  • वाङमयाचे महाविद्यालयीन अध्यापन (डॉ. दु.का. संत गौरव ग्रंथ)
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि त्यांचे तीन निबंध
  • शिक्षण आणि समाज
  • सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य - (संपादित)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १ला
  • ज्ञानेश्वरी अध्याय २रा (सहलेखक - शं.कृ. उनउने, ह.बा. कुलकर्णी, चंद्रकांत शं. अडावदकर)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ७वा.