मुक्त स्रोत
मुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स ही एक विचारसरणी आहे. संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोताची उपलब्धता, दुसऱ्यांना मुक्तपणे वाटण्याची सूट आणि त्यात हवे तसे बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर त्यांना मुक्त स्रोत आज्ञावली म्हणतात. मुक्त स्रोतांतर्गत संगणक आज्ञावली, आज्ञावली संरचना दस्तावेज कोणालाही वापरण्याची संपूर्ण परवानगी असते याला मुक्त स्रोत तत्त्व म्हणतात. हा मुक्त-स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक प्रणाली मुक्त स्रोत अनुज्ञप्ती(लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. ही संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली, नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर क्षेत्रे उदाहरणार्थ मुक्त मजकूर यांच्या मुक्त साहचर्यातदेखील झाला.
उगम
[संपादन]मुक्त-स्रोत ही संज्ञा संगणक प्रणालींचे वर्णन करण्यासाठी अश्या एका गटाने सुचवली होती ज्यांचा स्वतंत्र प्रणाली संस्था आणि त्यामागील नैतिक विचारसरणी यांना तात्त्विक विरोध होता. त्यांना संगणक-प्रणालींच्या मुक्त स्रोतांचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी एक पर्यायी नाव हवे होते. या गटात क्रिस्टीन पीटरसन, टॉड अॅन्डरसन, लॅरी ऑगस्टीन, जॉन हॉल, सॅम ऑकमान, माइकल टीमन आणि एरिक एस. रेमंड हे सदस्य होते. यातील पीटरसनने पालो अल्टो येथे आयोजित एका बैठकीत मुक्त स्रोत हे नाव सुचवले, याला जानेवारी १९९८ मध्ये नेटस्केपने त्यांच्या नेव्हीगेटर ब्राऊजरच्या प्रणालीचा स्रोत उपलब्ध करून दिल्याची पार्श्वभूमी होती.
लायनस टोरवाल्ड्सने त्याला दुसऱ्या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला.
रेमंडने मुक्त-स्रोत हे नाव लोकप्रिय होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याने स्वतंत्र प्रणाली समुदायाला हे नाव स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये जाहीर आवाहन केले. त्यानंतर लगेच त्याने ब्रुस पेरेन्सच्या साथीने "मुक्त स्रोत पुढाकार" (Open Source Initiative) ही संस्था स्थापन केली.
पुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल १९९८ला केलेल्या एका मेळाव्याच्या आयोजनानंतर हे नाव आणखीनच सुपरिचित झाले. या मेळाव्याचे आधीचे "मोफत प्रणाली परिषद" Freeware summit हे नाव नंतर "मुक्त स्रोत परिषद" Open Source Summit म्हणून प्रचलित झाले. या आयोजनास अतिमहत्त्वाच्या व स्वतंत्र आणि मुक्त प्रणालींच्या अग्रणींनी हजेरी लावली, ज्यात लायनस टोरवाल्ड्स, लॅरी वॉल, ब्रायन बेहेन्डोर्फ, एरिक ऑलमन, गुडो वान रॉसम, माइकल टीमन, पॉल विक्सी, जॅमी झ्वाइंस्की, एरिक एस. रेमंड आले होते. या बैठकीत "स्वतंत्र प्रणाली" या संज्ञेला पर्याय देण्यावर विचारविनिमय झाला. टीमन ने सुचवलेल्या "सोर्स वेयर" विरुद्ध रेमंडचा "मुक्त स्रोत" यावर जमलेल्या संगणक विकसकांनी मतदान केले आणि त्याच संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत विजेत्याची घोषणा झाली.
मुक्त-स्रोत चळवळीला पाठींबा देण्यासाठी अपाचे सॉफ्टवेर फाऊंडेशन यांसारख्या मोठ-मोठ्या औपचारिक संस्था व प्रतिष्ठाने उदयास आली. त्यांनी अपाचे हडूप फ्रेमवर्क आणि अपाचे एचटीटीपी सर्व्हर यासारख्या सामुदायिक मुक्त स्रोत प्रणालींच्या विकासाला सहाय्य केले.
मुक्त स्रोत तत्त्व आणि मुक्त साहचार्य संकल्पना
मुक्त-स्रोत हा एक विकेंद्रीत संगणक प्रणाली विकास प्रकार आहे यात विकसकांच्या परस्पर सहकार्यास प्रोत्साहन दिले जाते, म्हणजे "प्रणालीतले कुठलेही नावीन्य किंवा उत्पादन हे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित असूनसुद्धा त्यात भाग घेणाऱ्या सभासदांच्या सहकार्यावर आधारित असते. हे सदस्य एकत्र चर्चा करून सामुदायिक प्रयत्नाने एखादे उत्पादन किंवा सेवा निर्माण करतात व आपल्या भागीदारांना तसेच इतरांनासुद्धा समान प्रकारे वाटतात." मुक्त-स्रोत प्रणाली विकसनात सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सामुदायिक उत्पादन. अश्या सामुदायिक प्रयत्नातूनच संगणक आज्ञावल्यांचे, प्रणाली आराखड्यांचे, आणि दस्तावेजांचे निर्माण होऊन ते जाहीरपणे मोफत उपलब्ध झाले आहे. मुक्त स्रोत प्रणाली ही चळवळ खाजगी मालाकीच्या प्रणालींच्या मर्यादांना पर्याय म्हणून उभी राहिली. याचाच कित्ता पुढे मुक्त-स्रोत साजेसे तंत्रज्ञान आणि मुक्त-स्रोत औषध शोध यांनी गिरवला. संगणक क्षेत्रातील मुक्त स्रोत इतर सामुदायिक मुक्त साहचार्यांना प्रेरणादायी ठरला, उदाहरणार्थ इंटरनेट मंच, मेलींग लिस्ट, आणि विविध ऑनलाइन समुदाय. किंबहुना TEDx आणि खुद्द विकिपेडिया यासारख्या वैविध्यपूर्ण सेवा मुक्त स्रोताच्याच तत्त्वावरच चालतात.