बखर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बखर शब्दाची उत्पती अरबी शब्द खबर (बातमी, वृत्तांत) पासून झालेली आहे. मराठांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रुढ झाला आहे. अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ति व घटनांच्याविषयी असते. अनेक वेळा चरित्रकांना हुकूमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे. तथापि बखरकार एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यांचा इतिहास पक्षपतीपणे लिहिला जात असे. स्वयकीयांची स्तुती व परकीयांची निंदा असे. तरीही राजकीय स्वरुपाच्या इतिहास लेखनाची परंपराच्या दृष्टीने त्यांचे महत्व आहे. शालीवाहन बखर ही सर्वांत जुनी बखर आहे. वि. का. राजवाडे यांच्या मते इ.स १८१८ पर्यंत सुमारे अडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ७० बखरी प्रसिद्ध झाल्या आहेत.[१]
बखरलेखनाचे कालखंड
[संपादन]बखरलेखनाचे सर्वसाधारण तीन कालखंड पडतात. शिवपूर्व कालखंड, [२] शिवकाल व पेशवेकाल,[३] शिवपूर्वकालात बखर ही आख्यायिका म्हणून वावरते. शिवकालात ही बखर चरित्रकथा म्हणून अवतरते. पेशवेकालात तिला स्वतःचे स्वयंपूर्ण विकसीत स्थान मिळते.
शिवकालीन बखरी
[संपादन]सभासद बखर
[संपादन]सभासद बखर ही शिवाजी महाराजांवरील सर्वात जुनी व शिवकालात लिहिली गेलेली बखर आहे. (इ.स १६९४) हिचा कर्ता कृष्णाजी अनंत सभासद हा असून त्याने शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वतः पाहिलेला व ऐकिलेला आहे. राजाराम महाराजांच्या आज्ञेने ही बखर लिहिण्यात आली. मराठी इतिहासाच्या अभ्यासूच्या दुर्देवाने सभासदाने ही बखर फार संक्षिप्त अशी लिहिली आहे. तरीही महाराजाच्या काळातील ही बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्व आहे. बखरीत महाराजांची राज्यकारभार व्यवस्था, लप्कर अवस्था, किल्ले, खजिना, सरदार इत्यादी अनेक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे.[४]
९१ कलमी बखर
[संपादन]ही बखर ९१ कलम बखर नावाने प्रसिद्ध आहे. कारण त्यात ९१ कलमे असून मालोजी राजे भोसले यांच्या पासून शिवाजी महाराजांच्या मृत्युपर्यंतचा इतिहास कथन केला आहे. ही बखर प्रसिद्ध करण्याचे श्रेय संशोधक वि. स. वाकसकर यांच्याकडे जाते. (इ.स. १९३०) वाकसकरांच्या मते ही बखर मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यानी तयार केली. तिचा लेखनकाल इ.स १६८५ ते इ.स १७०७ दरम्यानचा असावा.
चिटणीस बखर
[संपादन]चिटणीस बखर मल्हारराव रामराव चिटणीस यानी इ.स. १८११ मध्ये दुसऱ्या शाहूंच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली. बखरकाराचे खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस शिवाजी महाराजांचे समकालीन होते. या बखरीत एकूण सात प्रकरणे आहेत. ही बखर प्रथम विविध ज्ञानविस्तार मासिकात प्रसिद्ध झाली (इ.स. १८७७). बखरकाराकडे साधनाची अनुकूलता असली तरी साधनसामग्रीचा पद्धतशीर उपभोग करण्याचे ज्ञान त्याला नव्हते. बखरीतील घटना कालानुक्रमाने दिलेल्या नाहीत.
चित्रगुप्त बखर
[संपादन]ही बखर सभासद बखरीवर आधारित आहे. हिचा कर्ता रघुनाथ यादव चित्रगुप्त (चित्रे) हा असून बखरींच्या मजकूरात अधूनमधून त्यानी आपल्या कविता घातल्या आहेत. हा बखरकारही बाळाजी आवजी चिटणीसांच्याच घराण्यातील होता. सभासद बखरीत ज्या पुरुषांची आडनावे दिली नाहीत. त्यांची आडनावे चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकात सहजासहज देऊन जातो. ही बखर इ.स. १७६५ च्या सुमारास लिहिली गेली असावी.
शिवदिग्विजय बखर
[संपादन]ही बखर इ.स.१८१८ साली लिहली गेली आहे. हिचा कर्ता अज्ञात आहे. इतिहास संशोधक नंदुरबारकर व दांडेकर यानी तिचे संपादन केले व ती इ.स.१८९५ साली प्रसिद्ध केली. इतिहासाचार्य राजवाडांच्या मते या बखरीचा मजकूर एखाद्या जुन्या बखरीवरान घेतला असावा. राजाराम महाराजांना राजपद मिळावे म्हणून राणी सोराबाईने केलेल्या कृत्यांचे वर्णन ना बखरकाराने केले आहे.
मराठी साम्राज्याची छोटी बखर
[संपादन]मराठी साम्राज्याची छोटी बखर या बखरीचा रचना इ. स. १८१७ साली झाली असावी. इतिहासकार बाळाजी जनार्दन मोडक यांनी ती 'काव्येतिहासंग्रह' या मासिकात प्रसिद्ध केली. स्थल, व्यक्ती व काल यांचा बराच विपर्यास बखरीत आहे. तरीही शिवचरित्रामधील काही नव्या बाबी या बखरीतून पुढे येतात.[५]
चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर
[संपादन]चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर मल्हार रामराव चिटणीसानेच या दोन बखरी लिहिल्या आहेत. मराठ्याच्या बाजूकडून संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची चरित्रे कळण्यासाठी याच बखरींचा उपभोग होतो. हा बखरकार संभाजी महाराजांच्या विरोधात लिहितो व राजाराम महाराजांच्या संबंधी प्रशंसेचे उद्गार काढतो.
पेशवेकालीन बखरी
[संपादन]पेशवेकालीन बखरी इ.स. १७०७ मधील शाहूचे दक्षिणेतील आगमन ते इ.स. १८१८ मध्ये झालेला मराठी राज्याचा अस्त ना पेशवे काळाविषयी ही अनेक बखरी लिहिल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या बखरी खालीलप्रमाणे आहेत.
साष्टीची बखर
[संपादन]उत्तर कोकणातील साष्टी व वसई प्रांतावर इ.स. १७३७ ते ३९ या काळात मराठांनी स्वारी केली व ते प्रांत जिंकून घेतले. या विजयाची माहिती या बखरीत दिली आहे. ही बखर इ.स १७४२ मध्ये लिहिली गेली आहे. वसईच्या संग्रामाचे खरे श्रेय गंगाजी नाईक यांचे असून यांच्या तुलनेत चिमाजी अप्पाचे या संग्रामातील योगदान गौण असल्याचे प्रतिपादन या बखरीत करण्यात आले आहे.
श्री. शाहू महाराजांची बखर
[संपादन]श्री. शाहू महाराजांची बखर या बखरीचा कर्ता गोविंदराव खंडेराव चिटणीस आहे. या बखरीत शाहू महाराजांचा जन्म ते मृत्युपर्यंतची माहिती विस्ताराने दिली आहे. मुघलांच्या कैदेत असता शाहू महाराजांच्या परिस्थितीचे तपशीलवार वर्णन बखरकाराने केले आहे.
पेशव्यांची बखर
[संपादन]पेशव्यांची बखर या बखरीचा कर्ता कृष्णाजी सोहीनी आहे. इ.स. १७१३ ते १८१८ या काळातील सर्व घडामोडींचा तपशीलवार उल्लेख या बखरीत आढळतो. ही बखर पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा आहे. मराठांच्या इतिहासातील विविध प्रसंगाचे वर्णन त्यामध्ये केले आहे.[६]
पानिपत बखर
[संपादन]पानिपत बखर इ.स. १७६३ मध्ये रघुनाथ नादव याने पेशवा नानासाहेब यांची विधवा पत्नी गोपिकाबाई याच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली होती. रघुनाथ यादव हा पेशव्यांच्या पदरी कारकून होता. पानिपतच्या संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या महत्वाच्या व्यक्तींची यादी हे या बखरीचे विशेष वैशिष्ट आहे. पानिपतच्या संग्रामानंतर लगेचच ही बखर लिहिली गेली असल्याने यातील हकीगत खरी असावी ही सर्वसाधारण अपेक्षा मात्र खोटी ठरते. जदुनाथ सरकार तर या बखरीचे वर्णन 'अफीमबाजाचे लेखन' असे करतात.[७]
भाऊसाहेबांची बखर
[संपादन]भाऊसाहेबांची बखर पत्ररुपातील या बखरीचा लेखक शिद्यांच्या पदरी एक सेवक असावा. या बखरीत इ.स. १७६१ च्या पानिपतच्या संग्रामाविष नीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच्या विश्वसनीयतेची खात्री देता येत नाही. बखरीतील मजकूरावरून काही तत्कालीन चालीरीतीवर प्रकाश पडतो. सतीची पद्धत, पाठीवर जखम झालेल्या सैनिकाची समाजात होणारी हेटाळणी याचा उल्लेख बखरकाराने केला आहे.[८]
काशीराजाची बखर
[संपादन]काशीराज हा मराठी ब्राम्हण अवधचा नवाब शूजाउद-दौलाच्या सेवेत होता. त्याने फारसी भाषेत पानिपतच्या लढाईचा वृतांत लिहिला आहे. पानिपतच्या लढाईच्या तपशिलाविषयक हा वृतांत महत्वाचे साधन आहे.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "पहिले प्रकरण: मराठी बखर" (PDF). ir.unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 20 October 2022. 20 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "शिवकाल (१६३० ते १७०७)" (PDF). sahitya.marathi.gov.in (Marathi भाषेत). 21 October 2022. 21 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "मराठा कालखंड भाग-२ (१७०७ ते १८१८)" (PDF). sahitya.marathi.gov.in (Marathi भाषेत). 21 October 2022. 21 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Siva Chhatrapati, being a translation of Sabhasad Bakhar with extracts from Chitnis and sivadigvijaya,with notes" (PDF). Wayback Machine (English भाषेत). 20 October 2022. 20 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Maraathayaanchii Bakhar" (PDF). Wayback Machine (Marathi भाषेत). 21 October 2022. 21 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "पेशव्यांची बखर" (PDF). Wayback Machine (Marathi भाषेत). 20 October 2022. 20 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "पानिपतची बखर" (PDF). Wayback Machine (Marathi भाषेत). 20 October 2022. 20 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Bhausahebanchi bakhar". Wayback Machine (Marathi भाषेत). 21 October 2022. 21 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
अधिक वाचन
[संपादन]- मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा वेचक इतिहास : डॉ.विद्यासागर पाटंगणकर. चिन्मय प्रकाशन औरंगाबाद.
- प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप : ह.श्री. शेणोलीकर