Jump to content

नैऋत्य मोसमी वारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धङकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात.

मान्सून (व्युत्पत्ती): 'मान्सून' शब्दाचा मूळ उगम अरबी भाषेत आहे(वादाचा विषय). अरबी भाषेतील 'वसामा(Wasama): शिक्कामोर्तब करणे' हा शब्द 'मौसीम(Mawsim): ऋतू 'मध्ये रूपांतरित झाला. पुढे हा शब्द पोर्तुगिसांनी जलप्रवासासाठी वाहणाऱ्या योग्य वाऱ्यांचा ऋतू, या अर्थाने 'मोनसौं(monção)' असा घेतला. सोळाव्या शतकोत्तर हा शब्द इंग्रजी भाषेत 'मान्सून(Monsoon): भारतीय उपखंडात येणार वार्षिक वर्षाकाळ' या अर्थाने असा आला. आणि तिथूनच मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये हा शब्द गोचीडासारखा चिकटला.

त्यामुळे नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस हे नाव आहे. हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो.

असा पडतो मान्सूनचा पाऊस

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यानांच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे असे म्हणतात. या वाऱ्यांपासून भारतीय उपखंडात पाऊस पडतो म्हणून या वाऱ्यांना भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नैर्ऋत्येकडून येणारे वारे समुद्रावरून प्रवास करत भारतात प्रवेशतात. मान्सून म्हणजे दुसरे तिसरे काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे. भारताची भौगोलिक रचना द्विपकल्पीय आहे. तीन बाजूने समुद्र आणि उत्तरेकडे जमीन. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते आणि तेथील दाब कमी होतो. याच काळात जमिनीवरील तापमानाच्या तुलनेत समुद्राचे तापमान कमी राहते, आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे समुद्राकडून कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात, हे वाऱ्यांत बाष्प मोठ्या प्रमाणात असते. हे बाषपयुक्त वारे जमिनीवरील समुद्रसपाटी पासून उंचावर असलेल्या भागात जातात व तेथून पुन्हा समुद्राच्या दिशेने परत फिरतात आणि एक चक्र पूर्ण होते. याच काळात जेव्हा हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरून वाहात असते, तेव्हा ती हवा थंड होते. यामुळे वाऱ्याची बाष्पयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, आणि ते पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर बरसतात. यालाच मान्सूनचा पाऊस असे म्हणले जाते. भारतीय उपखंडात ही क्रिया साधारणपणे मेच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरंतर सुरू असते. त्यामुळेच भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या काळ नैर्ऋत्य मोसमी पावसाचा म्हणून ओळखला जातो. या उलट हिवाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात हे वाऱ्याचे चक्र उलटे फिरते. या काळात जमिनीवरचे तापमान समुद्रावरील तापमानापेक्षा तुलनेत कमी असते. त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात. भारतीय उपखंडावरील मान्सूनच्या वाऱ्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्यामुळे भारतात सर्वत्र सारख्याच प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यात दर ५ ते १० किलोमीटरवर फरक पडतो. (संकलन : अजय कुलकर्णी)

मान्सूनच्या तारखा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने अनेक वर्षांच्या निरीक्षणावरून मान्सून दाखल होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम २० मेच्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. नंतर प्रवास करत तो १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. मान्सूनला दाखल होण्याला ऑनसेट ऑफ मान्सून असे संबोधतात. दरवर्षी मान्सून या ठराविक तारखेलाच येतो असे होत नाही. काही वेळा केरळात मान्सून दोन-चार दिवस आधी किवा पाच ते सहा दिवस विलंबाने दाखल होतो. यालाच मान्सून यंदा लवकर आला किंवा उशिरा आला असे म्हणले जाते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सूनच्या दृष्टीने देशाचे चार प्रमुख विभाग आणि ३६ उपविभाग केले आहेत. चार प्रमुख विभाग असे : वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व व ईशान्य भारत आणि दक्षिण भारत. आयएमडीच्या मते देशात सर्वसाधारणपणे सरासरी ८८७.५ मिमी पाऊस पडतो. वायव्य भारत विभागाची सरासरी ६१५.० मिमी, मध्यभारत विभागाची ९७५.५ मिमी, पूर्व व ईशान्य भारत १४३८.३ मिमी तर दक्षिण भारत विभागाची सरासरी ७१६.१ मिमी मानली आहे. आयएमडीने महिनेवार पावसाची सरासरी ही निश्चित केलेली आहे. त्यानुसार देशात जूनमध्ये सरासरी १६३.६ मिमी, जुलैमध्ये २८९.२ मिमी, ऑगस्टमध्ये २६१.३ मिमी तर सप्टेंबरमध्ये सरासरी १७३.४ मिमी पाऊस पडतो. विभागवार पुन्हा या पावसाचे वितरण दरवर्षी सरासरी इतकेच राहील हे मात्र निश्चित नाही. महाराष्ट्राचे चार उपविभाग केले आहेत. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. त्यानुसार त्या-त्या उपभागात पडणाऱ्या पावसाची नोंद केली जाते. आयएमडीने महाराष्ट्रातील उप विभागवार पडणाऱ्या पावसानुसार सरासरी ठरवलेली आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर या काळात कोकण व गोवा उप विभागात सरासरी २९१५ मिमी, मध्य महाराष्ट्रात ७२९ मिमी, मराठवाड्यात ६८३ मिमी तर विदर्भात ९५५ मिमी पाऊस पडतो. यानुसार त्या त्या वर्षी त्या त्या उप विभागात किती पाऊस झाला हे ठरते. (संकलन : अजय कुलकर्णी)

पर्जन्यछायेचा प्रदेश

भारतात मान्सूनच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत. एक शाखा बंगालच्या उपसागरातून कार्यरत राहते तर दुसरी शाखा अरबी समुद्राकडून. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांतील काही जिल्ह्यांना मुख्यत: अरबी समुद्रातील शाखेकडून पावसाचा लाभ होतो. तर विदर्भाला बंगालच्या उपसागरातील शाखेकडून लाभ होतो. महाराष्ट्रात सह्याद्री किवा पश्चिम घाट हा पावसाचा दुभाजक म्हणून काम करतो. या पर्वतरांगामुळे कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी होते. तर पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात त्या तुलनेत कमी पाऊस पडतो. बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगाना अडतात आणि घाटमाथा व कोकणात भरपूर पाऊस देता . मात्र पुढे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत: अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात येईपर्यंत या मोसमी वाऱ्यांतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. याची प्रचिती कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यात देखील पाहायला मिळते शिरोळ तालुक्यात जांभळी गावात तुफान पाऊस पडतो पण तोच जयसिंगपूर व शिरोळ मध्ये पावसाचा जोर कमी होतो. आश्चर्य म्हणजे जांभळी आणि जयसिंगपूर मधील अंतर हे केवळ ६ किलोमीटर इतके आहे