देशसेवक (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देशसेवक (साप्ताहिक) १८०० च्या उत्तरार्धात गाजलेल्या देशसेवक या नागपूर येथील वृत्तपत्राचा उल्लेख केला जातो. मुळ नेमस्तांच्या हाती असलेले हे पत्र गाजले ते जहालांच्या हाती गेल्यानंतरच. अच्युतराव कोल्हटकर, गोपाळराव ओगले अश्या नामवंत ठरलेल्या संपादकांनी हे पत्र पुढे चालू ठेवून गाजविले. पत्रकारितेचे पहिले धडे या सर्वांनी या पत्रातच गिरविले हे याचे वैशिष्ट्य म्हणता येते. परंतु १९१० नंतर मात्र हे वृत्तपत्र लयास गेले.[१]

इतिहास[संपादन]

‘देशसेवक’ हे साप्ताहिक नागपूरचे प्रसिद्ध सुधारक हरी माधव पंडित व चिंतामण रामचंद्र केळकर यांनी १८९१ साली सुरू केले. परंतु याचा पहिला अंक कोणत्या दिवशी प्रसिद्ध झाला याची नोंद मात्र उपलब्ध नाही. यामध्ये या पत्रात एकाने लिहिण्याचे तर दुसऱ्याने बाकीची सर्व व्यवस्था पाहण्याचे काम पाहिले. त्यापुढील काळात ‘देशसेवक’ साप्ताहिकाचे संपादकपद व मालकी महादेव(माधवराव) कृष्ण पाध्ये यांच्याकडे आली. पाध्ये हे नागपुरातील नावाजलेले वकील व कार्यकर्ते होते. माधवराव हे ‘देशसेवक’चे काम आपला वकिलीचा व्यवसाय सांभाळूनच करीत. त्याचवेळी त्यांनी आपल्या या कार्यात मदतीसाठी मदतनीस मिळवण्याचे ठरविल्यानंतर टिळकांच्या मनात आपल्या कामगिरीने घर करून बसलेले व सार्वजनिक कार्यात कार्यरत असलेले गोपाळराव ओगले यांची लागलीच नागपूरला रवानगी करण्यात आली. तेथे गेल्यानंतर त्यांनीही देशसेवकच्या कार्यात मोलाची मदत केली.

यामध्ये काही काळ अच्युतराव कोल्हटकर याचीही लेखनाची हौस त्यांचे वडील माधवराव कोल्हटकर यांना दिसून आल्यानंतर त्यांनी देशसेवक मध्ये त्यांना लेखन करण्याची सूचना केली. त्यानुसार ते खूप काळापर्यंत लेखन करत होते. परंतु काही काळानंतर अच्युतराव यांना राजद्रोहाबद्दल शिक्षा झाल्यावर देशसेवकाची सूत्रे गोपाळराव ओगले यांच्या हाती सोपविण्यात आली. परंतु तेही टिळकांच्याच विचारांशी एकमत असल्या कारणाने सरकारवर रोष ते या माध्यमातून दाखवून देत होते. त्यामुळे त्यांच्यावरही खटला भरण्यात आला. त्यामुळे तेही तुरुंगात गेल्याने पुढील काळात शंभूराव गाडगीळ ‘देशसेवका’चे संपादक झाले. परंतु त्यांनीही आपल्या लिखाणातून अनेक शब्द सरकार विरोधी वापरले असल्या कारणाने त्यांच्यावरही खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर मात्र कुलकर्णी यांनी देशसेवकाचे संपादक पद स्वीकारले. पण तेही व्यवस्थित ते पत्र व्यवस्थित चालवू शकले नसल्याने अखेर ते पत्र बंद पडले. काही कालावधी नंतर ते पुन्हा १९१० मध्ये पुन्हा चालू करण्यात आले. परंतु जामीनकीचे सत्र सतत चालू राहिल्याने ते कायमचे बंद पडले.[२]

संपादक मंडळ[संपादन]

१. हरी माधव पंडित २. महादेव कृष्ण पाध्ये ३. अच्युतराव कोल्हटकर ४. गोपाळराव ओगले ५. शंभूराव गाडगीळ ६. कुलकर्णी

संदर्भ[संपादन]

  1. ^ लेले, रा. के. (२००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन. pp. ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२.
  2. ^ चिंचोलकर, आर. बी. "Swatryantrapurv kalatil bahujanachi varutpatre". http://shodhganga.inflibnet.ac.in:8080/jspui/handle/10603/92035. ३/५/२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)